Home » Blog » आमदारांच्या ४० लाख कमिशन मागणीच्या व्हिडिओने हडकंप  

आमदारांच्या ४० लाख कमिशन मागणीच्या व्हिडिओने हडकंप  

by प्रतिनिधी
0 comments
Video of MLA Kshirsagar demanding a commission

राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या ४० लाखाच्या कमिशनचा व्हिडिओ व्हायरल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले यांनी केल्याने जिल्ह्यातच नव्हे राज्यात खळबळ उडाली आहे. हे पैसे वरपर्यंत द्यावे लागतात असे म्हटल्याने राज्य सरकारमधील वरिष्ठ मंत्रीच टारगेटवर आले आहेत.  पावसाळी अधिवेशनच्या दुसऱ्या आठवड्याच्या तोंडावर कमिशन मागणीचा व्हिडिओ आल्याने महायुती सरकारला भ्रष्टाचाराच्या आरोपाचा सामना करावा लागणार आहे.  हा व्हिडिओ वरुन क्षीरसागर- इंगवले यांच्यात टीकेचे बाण एकमेकांवर सोडले जात असताना क्षीरसागर यांनी थेट विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांच्यावर आरोप केल्याने काँग्रेसनेही या प्रकरणात उडी घेतली आहे. भ्रष्टाचारास आरोप करत हे प्रकरण धसास लावण्यासाठी  काँग्रेस, शिवसेनेने धसास मैदानात उतरली आहे. विधानभवनात याचे पडसाद कसे उमटतात याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागले आहे.  (Video of MLA Kshirsagar demanding a commission)

रविकिरण इंगवलेंचा व्हिडिओ बॉम्ब

राजेश क्षीरसागर यांनी विकासकामात ४० लाख रुपयांचे कमिशन घेतल्याचा आरोप रविकिरण इंगवले यांनी केला आहे. हा आरोप करण्यापूर्वी इंगवले यांनी तीन दिवसापूर्वी इंगवले यांनी शिवसेना जिल्हाध्यक्ष पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. तरीही त्यांनी हा व्हिडिओ व्हायरल केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इंगवले यांचे विरोधक त्यांचे चुलत बंधू नगरसेवक अजित इंगवले यांच्या वाढदिवसादिवशी आमदार क्षीरसागर यांनी केलेल्या भाषणामुळे दुखावलेल्या रवीकिरण इंगवले यांनी दुसऱ्याच दिवशी क्षीरसागर यांचा वचपा काढल्याची चर्चा आहे. यापूर्वी क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर कॅसिनोत जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ इंगवलेंनी व्हायरल केला होता. त्यावेळी  क्षीरसागरांचाही व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी  इंगवलेंनी दिली होती. ती धमकी प्रत्यक्षात इंगवले यांनी सत्यात आणून दाखवली. या स्टिंग ऑपरेशनमध्ये ठेकेदार ‘साहेबांचे पाच आणि राहूल आणि प्रशांत यांचे प्रत्येकी एक टक्का असे ४० लाख रुपये ऑफिशिअली ट्रान्सफर केले आहेत असे म्हणत आहे.  त्यावर क्षीरसागर ठेकेदाराला म्हणाले, आम्ही दुसऱ्याकडून काम काढून तुम्हाला दिले आहेत. जो व्यवहार आहे तो पाळला पाहिजे. याबाबत तुम्ही मला भेटून सांगायला हवे होते’ असे क्षीरसागर म्हणाले होते. या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

ऋतुराज क्षीरसागर यांचे प्रत्युत्तर

रवीकिरण इंगवले हे ब्लॅकमेलर आहेत. आम्ही त्याला भीक घालत नाही, असे प्रत्युत्तर आमदार क्षीरसागर यांचे चिरंजीव नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर यांनी दिले. हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आमदार सतेज पाटील यांचाच हात आहे असा आरोप त्यांनी केला. महानगरपालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हा व्हिडिओ प्रसिद्ध करुन त्यांनी मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्र्याकडे चौकशीची मागणीही केली होती. राजेश क्षीरसागर यांचा यामध्ये कोणताही संबध नसल्याचे सिद्ध झाले आहे. इंगवले यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असा इशाराही त्यांनी दिला.   

व्हिडिओ व्हायरलची सर्वत्र चर्चा

रवीकिरण इंगवले यांनी व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू झाली. क्षीरसागर यांच्या समर्थकांनी हा व्हिडिओ एआय असल्याचा दावा केला होता. विरोधी पक्षाकडून हा व्हायरल जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावा यासाठी प्रयत्न केले. राज्यपातळीवरही या व्हिडिओची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही आपल्या एक्स वरुन क्षीरसागर यांचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनीही क्षीरसागरांवर टीका केली आहे. कॉमन मॅन संघटनेचे बाबा इंदुलकर यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या कामात कॉन्ट्रक्टरकडून ४० लाखाहून अधिक रक्कमेची लाच मागणे हे आमदारांसाठी लांच्छनांस्पद आहे अशी टीका केली.   (Video of MLA Kshirsagar demanding a commission)

सतेज पाटील यांनी केली खुलाश्याची मागणी

या व्हिडिओबाबत आमदार सतेज पाटील यांनी मिडियाला प्रतिक्रिया दिली. व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा याचा खुलासा संबधित आमदारांनी करावा, अशी मागणी त्यांनी  केली. एकाद्या लोकप्रतिनिधीचा अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल होणे चुकीचे आहे. व्हिडिओमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे सिद्ध होते असेही आमदार पाटील म्हणाले. या संभाषणात गोदरेज कंपनीचे नाव समोर येत आहे. त्यामुळे शहरातील कोणत्या कामाचा ठेका या कंपनीला दिला आहे हे आम्ही सत्तेत नसल्याने माहित नाही. जर व्हिडिओमध्ये तथ्य असेल तर या प्रकरणाच चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.

मनसेकडून क्षीरसागर यांच्या राजीनाम्याची मागणी

कोल्हापुरच्या जनतेचा विकास टक्केवारीच्या चिखलात बरबटलेला आहे. यांचे ज्वलंत उदाहारण म्ह्णजे राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर आहेत, असा आरोप मनसेचे संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला. त्यांनी क्षीरसागर यांच्या अटकेची मागणी केली.

आमदार क्षीरसागरांचा सतेज पाटील यांच्यावर हल्लाबोल

व्हिडिओ व्हायरल रविकिरण इंगवले यांनी केला असतानाना आमदार राजेश क्षीरसागर यांनी आमदार सतेज पाटील यांच्यावर पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. सतेज पाटलांनी बदनामीचे षडयंत्र थांबवून स्वतःच्या निष्क्रियतेचे आत्मपरीक्षण करावे अशी टीका केला.  व्हायरल झालेला ‘तो’ व्हिडीओ पूर्णपणे एडिटेड आणि व्हॉईस डबिंग केलेला; संबंधित व्यक्तीनेच दिले लेखी पत्र आणि पुरावे दिले आहेत असा खुलासा केला.  काचेच्या महालात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत; अनेकांच्या कौटुंबिक कुंडल्या माझ्याकडे तयार आहेत, असा इशाराही क्षीरसागर यांनी सतेज पाटील यांना दिला. (Video of MLA Kshirsagar demanding a commission)

व्हाईस डंबिग आणि एडिट केलेला व्हिडिओ

आमदार क्षीरसागर म्हणाले, “ब्लॅकमेलर काहीही बोलत असला, तरी त्याचा खरा बोलविता धनी आमदार सतेज पाटील हेच आहेत, हे कोल्हापूरची जनता चांगल्या प्रकारे जाणून आहे,” माझ्या नावावर जो व्हिडीओ प्रसारित केला जात आहे, तो पूर्णपणे व्हॉईस डबिंग करून आणि जाणीवपूर्वक एडिट करून तयार करण्यात आला आहे. मुळात तो कोणताही शासकीय व्यवहार नव्हता. ज्या व्यक्तीने गैरसमजातून तो व्हिडीओ बनवला होता, त्याने नंतर माझी प्रत्यक्ष भेट घेतली. त्याची अडचण समजून घेऊन मी त्याला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. हा व्हिडीओ यापूर्वी आमदार सतेज पाटील यांनी १४ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसारित केला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी १५ जानेवारीला त्या व्यक्तीने स्वतःहून माझ्याशी संपर्क साधला आणि या व्हिडीओचा गैरवापर केला जात असल्याचे तसेच ‘या प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही’ असे मला लेखी लिहून दिले आहे.

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या ऐन प्रचाराच्या शेवटच्या दिवशी हा एडिटेड व्हिडीओ व्हायरल करून पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे चौकशीची मागणी केली होती आणि तसे ई-मेलही पाठवले होते. मग आज इतके दिवस झाले, तरी माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी याची चौकशी केली का? याची माहिती घेण्यासाठी सतेज पाटलांना आजपर्यंत वेळ मिळाला नाही का? असा सवालही त्यांनी केला.

व्हिडिओ खरा की खोटा याचे उत्तर द्या.

टक्केवारीच्या व्हायरल व्हिडिओवरील लक्ष विचलित करण्यासाठी आमदार क्षीरसागर आमदार सतेज पाटील यांच्यावर टीका करत आहेत असा आरोप महानगरपालिकेतील विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केला. काळी कृत्ये, भ्रष्टाचार, दादागिरी आणि मग्रुरी तुम्ही करायची आणि खापर आमदारावर फोडायचे हे काँग्रेस सहन करणार नाही असा इशाराही लाटकर यांनी दिले. हा व्हिडिओ खरा की खोटा यासाठी केशवराव भोसले नाट्यगृहासमोर चर्चेला या असे आव्हानही त्यांनी दिले.

केशवराव भोसले नाट्यगृहातील कामाची टक्केवारी

केशवराव भोसले नाट्यगृह उभारणीचे २५ कोटींचे काम सुरू आहे. व्हिडिओमध्ये याच कामातील टक्केवारीचा उल्लेख आहे. हा निधी जनतेचा असल्याने त्यावर खुली चर्चा झाली पाहिजे, अशी मागणी राजेश लाटकर यांनी केली. हा व्हिडिओ एआयचा आहे तर संबधितांकडून माफीनामा का घेतला असा सवाल महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते इंद्रजीत बोंदे यांनी केला.

शिवसेनकडूनच व्हिडिओ व्हायरल

आमदार क्षीरसागर यांच्या भष्टाचाराचा व्हिडिओ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी व्हायरल केला आहे. या व्हिडिओची जबाबदारी आम्ही स्वीकारतो. टक्केवारीतील पैसे ट्रान्सफर्म झाल्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत, असा दावाही शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांनी  केला.  शिवसेनेच्यावतीने सोमवारी पोलिस अधीक्षक निलोत्पल यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली. तसेच विधानसभा अधिवेशनात या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे मोदींनी सांगितले.

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून क्षीरसागरांचा बचाव …

क्षीरसागर यांना अडचणीत आणण्याचे षढयंत्र रचले आहे असा आरोप उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. क्षीरसागर यांना राजकीयदृष्ट्या सामान्य मार्गाने मागे ढकलता येत नसल्याने त्यांना अशा पद्धतीने अडचणीत आणण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. महानगरपालिका निवडणुकीआधी असे प्रयत्न झाले होते. पण त्याचा कोणताही परिणाम झाला नव्हता. क्षीरसागर हे खमके नेतृत्व आहे अशा शब्दात पाटील यांनी क्षीरसागर यांचे कौतुक केले.

महायुती क्षीरसागर यांच्या पाठीशी

आमदार क्षीरसागर यांच्या पाठीशी महायुतीतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष पाठीशी राहिले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी प्रदेश सचिव महेश जाधव, जनसुराज्यचे उपमहापौर अक्षय जरग, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे गटनेते आदिल फरास यांच्यासह महायुतील नगरसेकांनी आमदार क्षीरसागर यांच्या पाठीशी असल्याचे आणि त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत, अशा पोस्टही केल्या आहेत.  (Video of MLA Kshirsagar demanding a commission)

You may also like

error: Content is protected !!