Home » Blog » ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची राज्यभर निदर्शने

ज्ञानेशकुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसची राज्यभर निदर्शने

by प्रतिनिधी
0 comments
Congress protests against Gyanesh Kumar in Kolhapur

मुंबई : प्रतिनिधी : केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या विरोधात महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष रस्त्यांवर उतरला आहे.  पक्षाच्यावतीने राज्यातील पुणे, नागपूर, कोल्हापूरसह सर्व जिल्ह्यात तीव्र निदर्शने करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. (Congress protests against Gyanesh Kumar in Kolhapur)

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी विजय राठोड यांना निवेदन देण्यात आले.

दोन्ही सहकाऱ्यांना अंधारात ठेवत ज्ञानेशकुमारांचे हुकुमशाही निर्णय

निवेदनात असे म्हटले आहे की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे एकतर्फी निर्णय घेत असल्याचे त्यांचे सहकारी दोन निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांनी सांगितल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेस या दैनिकात प्रसिद्ध झाली आहे. गेल्या १० महिन्यांत वरील दोन निवडणूक आयुक्तांनी किमान १४ वेळा ज्ञानेकुमार यांच्या निर्णयावर अधिकृतपणे आक्षेप नोंदवले आहेत. ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (एसआयआर) प्रक्रियेबाबत, नवीन मतदारांची अनधिकृतपणे केलेली नोंदणी, नावे वगळणे आणि निवडणूक आयोगाच्या आयटी (आयटी) प्रणालीचे केलेले केंद्रीकरण यांचा यात समावेश होता मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) यांनी हे निर्णय दोन्ही सहकाऱ्यांना अंधारात ठेवून घेतले. हे निर्णय हुकूमशाही पद्धतीचे आहेत. (Congress protests against Gyanesh Kumar in Kolhapur)

देशद्रोही ज्ञानेशकुमारांना बरखास्त करुन अटक करा

पश्चिम बंगालमध्ये ९२ लाख मतदारांची नावे वगळली, बिहारमध्ये लाखो नावे वगळली, महाराष्ट्र विधानसभा निवडमूक २०२४ च्या वेळी ४७ लाख बोगस मतदार वाढवले असे अनेक घोटाळे करण्यात आले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगातील घोटाळ्याची पोलखोल पुराव्यासह केली होती. सत्ताधारी भाजपला अनुचित लाभ मिळवून देण्यासाठी निवडणूक यंत्रणेवर ताबा मिळवून त्यात फेरफार केले जात आहेत, असा इशाराही त्यांनी देशाला सातत्याने दिला होता. इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीने यावर शिक्कामोर्तबच केले आहे. निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांची कृती देशद्रोहाची आहे, त्यांनी लोकशाही व संवैधानिक मूल्ये पायदळी तुडवली आहेत, लोकशाहीची हत्या केली आहे. देशातील लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी देशद्रोही ज्ञानेशकुमार यांना त्यांच्या पदावरून बरखास्त करून अटक करणे गरजेचे आहे, अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.

आंदोलनात काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रविण केसरकर, माजी आमदार राजूबाबा आवळे, महानगरपालिका काँग्रेस गटनेते इंद्रजित बोंद्रे, विरोधी पक्षनेते राजू लाटकर, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस शशांक बावचकर, विनायक घोरपडे, जिल्हा काँग्रेस सचिव संजय पोवार-वाईकर यांच्यासह काँग्रेसचे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी सहभागी झाले होते. (Congress protests against Gyanesh Kumar in Kolhapur)

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!