Home » Blog » श्रीपतराव बोंद्रे दादा: समाजसुधारक राजकारणी

श्रीपतराव बोंद्रे दादा: समाजसुधारक राजकारणी

by प्रतिनिधी
0 comments
Shripatrao Bondre: Social reformer and politician

३० सप्टेबर २००० रोजी कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते,माजी मंत्र्यांनी आपल्या श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन  श्रीपतराव बोंद्रे दादा यांचे निधन झाले.या दुःखद घटनेला आज सव्विस वर्षे होत आहेत. सर्वप्रथम कै.दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!! (Shripatrao Bondre: Social reformer and politician)

                    कै. श्रीपतराव बोंद्रे दादा यांनी, सार्वजनिक जीवनात अत्यंत सचोटीने आपले कर्तव्य निभावाले. त्यांच्या बालपणापासून त्यांच्यावर श्रमाचे संस्कार झाले होते. शेती,शेतातील पीके, जनावरे यांच्याशी त्याचा लहानपणापासून संबंध आला. इतकेच नव्हे तर  कोल्हापूरातील कपिततीर्थ मार्केटमध्ये यांनी भाजी विक्रीही केली. त्यामुळेच गोरगरीब, शेतकरी कष्टकरी समाजाशी त्यांची नाळ जुळली होती.त्यांच्या सुखदुःखाशी ते एकरूप झाले होते. अगदी कळत्या वयात त्यांच्या  जाणिवा प्रगल्भ  झाल्या होत्या. त्यामुळेच ऐन तारुण्याच्या काळात त्यांनी  समाज पर्यायाने देशासाठी कर्तव्य बजावण्याचा निर्णय घेतला. वयाच्या वीस-बावीसाव्या वर्षी भूमिगत  चळवळीत कार्यरत असणाऱ्यांना  निरोप पोहचविणे, भाकरी नेऊन देणे अशा बाबीतीत ते रममाण झाले.त्या काळाच्या  आठवणी सांगताना कै.दादा रमून जायचे. त्यांचा अनेक स्वातंत्र्य सैनिकाशी संबंध आला होता.१९४२ साली गांधीनी गवालिया टैंक मैदानावरून ‘चले जाव’ची घोषणा केली. यावेळी आपण उपस्थित होतो हे दादा अभिमानाने सांगत. त्यानं आपण देशाच्या  स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होतो याचा गर्व होता.

महात्मा फुले हौसिंग सोसायटी… फुलेवाडी….

                      कै.दादांच्या दृष्टीने १९५० चे दशक खूपच महत्वपूर्ण ठरले. ऐन पंचविशीत त्यांच्या समोर अनेकांचा आदर्श होता. विशेषत: माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. चव्हाण साहेब स्वातंत्र्य लढ्याचे सेनानी होते. त्यांनी तारुण्यातच तुरुंगवास भोगला होता. स्वाभाविकपणे महाराष्ट्रातील अन्य तरुणा-सारखे दादाही त्यांच्या विचाराने भारावले होते.त्या काळात  स्वातंत्र्यासह सहकाराचाही विचार प्रबळ होता. दादांनी धाडस केले आणि देशातील पहिली सह‌कारी तत्वावरील हौसिंग सोसायटी  फुलेवाडी येथे सुरु झाली.  हे क्रांतिकारक पाऊल होते. एकमेकांच्या हातात हात घालून नवे विश्व निर्माण होत होते. दादांनी या सोसायटीला महात्मा  फुले यांचे नाव  देऊन आपल्यावरील सत्यशोधकी संस्कार जगापुढे ठेवला. दादा एवढ्यावर थांबले नाहीत तर फुलेवाडीच्या फोंड्या माळावर सहकारी तत्वावरील नळपाणी योजना सुरू  करून परिसराला  समृध्दता बहाल केली.मला एक गोष्ट जाणवते की नेता आणि नेतृत्व एका दिवसात तयार होत नाही. त्यासाठी खस्ता खाव्या लागतात.  लोकांसाठी समर्पण वृत्तीने काम करावे लागते. दादांना ऐन तारुण्यात लोकप्रियता मिळाली. ते लोकमान्य अर्बन बँकेसह नगरपरिषदेचे सदस्य झाले. इतकेच नाही तर आपल्या राजकीय कौशल्य आणि संघटन चातुर्याच्या बळावर केवळ एक सदस्य असतानाही काँग्रेसचे नगराध्यक्ष बनण्याचा त्यांना मान मिळाला. हे आपसूक घडले नाही. दादांची परिश्रम करण्याची वृत्ती आणि गोरगरिबांचा कळवळा दिखाऊ नव्हता. तर त्यामध्ये तळमळ होती. त्यामुळे हे शक्य झाले. (Shripatrao Bondre: Social reformer and politician)

यशवंतराव चव्हाणांच्या विनंतीवरुन निवडणुकीतून माघार

  दादांच्या निधनाला २६ वर्षे झाली पण त्यांनी सार्वजनिक जीवनात जपलेली नैतिकता समजून घेतली तर आजही ऊर भरून येतो.१९६२ च्या महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकीची तयारी सुरु होती. दादांनीही फॉर्म भरण्यासाठी जुळवा जुळव सुरू केली होती. आणि आकस्मात यशवंतराव चव्हाण साहेब कोल्हापूरात आहे. त्यांनी दादांना सोबत घेतले. आणि जीपमधून पन्हाळा परिसरात फेरफटका मारला. त्यावेळी चव्हाण साहेबांनी दादांना फॉर्म नका असे सांगितले. पुढच्याच क्षणी सर्व तयारी थांबली.कार्यकर्ते नाराज  झाले. पण कोणीही द‌गाफटका केला नाही. पाच वर्षांनंतर १९६७  साली पुन्हा निवडणूकीचे वारे सुरु झाले. महा‌राष्ट्रभर काँग्रेस पक्षाची तयारी सुरु होती. निवडणुकीचा  आढावा घेण्यासाठी चव्हाण साहेबानी कराड मध्ये मिटींग बोलाविली. तेथे करवीर- कोल्हापूर मधून तिकीट कोणीच मागितले नसल्याने समजले. चव्हाण साहेबांनी तत्काळ दादांना निरोप दिला. तासा दोन तासात दादा पोहोचले. चहाण साहेबानी ‘फॉर्म का भरला नाही’ असे विचारले. तेव्हा दादा म्हणाले, पाच वर्षापूर्वी तुम्ही फॉर्म भरू नका असे सांगितले. आतापर्यंत तरी फॉर्म भरा, असं कुठ सांगीतलय… चव्हाण साहेब हे ऐकून सद्गदित झाले. त्यांनी दादांना जवळ बोलावले, आलिंगन दिले. आणि फॉर्म भरण्यास सांगितले.

त्यावेळच्या आठवणी सांगून दादा सध्याच्या म्हणजे त्याच्या हयातीच्या काळातील राजकारणा संदर्भात नाराजी व्यक्त  करायचे. दादांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना आपला नेता मानले. त्यांच्या  सूचना,  मार्गदर्शनाने आपले सार्वजनिक    जीवनातील  कर्तव्य पार पाडले. येथे एका गोष्टीचा उल्लेख करावासा वाटतो  की, ‘ जसा गुरू तसा शिष्य ‘ या उक्तीप्रमाणे दादांनीही चव्हाण साहेबांसारखीच  सार्वजनिक जीवनात  राजकीय सामाजिक सभ्यता पाळली. राजकारण करतानाही सामान्य  लोकांच्या हितासाठी निर्णय घेतले. आपल्या सार्वजनिक जीवनातीत निर्णय प्रक्रियेवर सत्ता आणि अहंकार यांची सावली  पडू नये याची दक्षता घेतली.      

कार्यकर्त्यांना वेळ देणारे दादा

                      दादा पाचवे‌ळा आम‌दारपदी निवडुन आले. शरद पवार यांच्या मंत्रिमंडळान मंत्री झाले. पण या संपूर्ण काळात आपल्या मतदारसंघातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी जनतेला  विसरले नाहीत. ते’दादा’ होते. दादा म्हणजे मोठा भाऊ.मोठ्या भावाच्या आस्थेने त्यांनी सर्वांची काळजी घेतली. दत्त आणि अंबाबाईचे दर्शन हा त्यांच्या जीवनाचा परिपाठ होता. परमेश्वरावरील हिच श्रध्दा  त्यांना नैतिकतेचे  पालन करण्यास उद्युक्त करत असे.दादांनी करवीर तालुक्यासह राधानगरी व कोल्हापूर शहराचे नेतृत्व केले. हा संपूर्ण भाग म्हणजे दादांचे कुटुंब होते.त्या काळात  मोबाईल नव्हता. फोनची सुविधाही मर्यादित होती. त्यामुळे  भागातील लोक वेळी अवेळी  भेटायला यायची. दादा कोणालाही नाराज करायचे नाहीत. येणाऱ्यांना चहा दिला जायचा. दादा स्वतः  त्यांच्या घरची चौकशी करायचे. त्यावेळी लोकप्रतिनिधीचा मोठा दरारा होता.  लोकांनी सांगितलेली कामे झटकन व्हायची. येणारी माणसे दादांच्या पायावर डोके ठेवून माघारी परतायची.

समाजकारणासाठी राजकारण बाजूला पडले

                      मी कै.दादांच्या अखेरच्या काळात त्यांना वर्तमानपत्र वाचून दाखवित असे. तास-दोन तासांचा वेळ त्यांच्या सानिध्यात असे. त्यावेळी दादा, अनेक गोष्टी बोलायचे. त्यांची  स्मरणशक्ती तीव्र होती. एखाद दुसरे नाव विसरायचे पण संदर्भ बरोबर असायचे. त्यावेळी त्यांच्या सार्वजनिक जीवनाचा संपूर्ण पट उलगडायचे. काळ बदलला राजकारणाचे स्वरूपही बदलले.  सेवेपेक्षा सत्तेला महत्त्व प्राप्त झाले. पैशाचा वापर होऊ लागला आणि समाजकारणासाठी राजकारण हे सूत्र बाजूला पडले. पैशाने सत्ता आणि सत्तेतून पैसा अशा वृत्तीने लोकांमधील सेवाभाव मागे पडला.दादांशी संवाद साधताना या बाबीसंद‌र्भातील त्यांची नाराजी स्पष्टपणे जाणवायची. एखादे वेगळे मत मांडले तर शत्रुत्व निर्माण होते याची त्यांना खंत होती.त्यावेळी ते त्यांच्या राजकीय विरोधकांशी कसे  वागायचे याचे उदाहरण द्यायचे. विजयी झाल्यानंतर पराभूत  उमेदवारही अभिनंदन करायचा ही संस्कृती नष्ट झाल्याची खंत दादा व्यक्त करायचे.

                       आयुष्याच्या अखेरच्या काळात दादा समाधानी  होते. १९९५ नंतर त्यांनी निवडणूकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. पंच्याहत्तरी नंतर शरीर थकले होते पण घरातील पुढच्या पिढीचे काय चालले आहे याची  त्यांना उत्सुकता असायची. सुदैवाने माझ्याशी संवाद होताना त्यांना बरीचशी माहिती मिळायची. अगदी अखेरच्या काळापर्यंत त्यांना चंद्रकांतदादा, पी.एन. साहेब यांच्या राजकीय भविष्याची काळजी वाटायची. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे कामकाज कसे चालले आहे याचीही ते अधूनमधून चौकशी करायचे. आता दादांना जाऊन २६, वर्षे होत आहेत. आजही त्यांच्या सहवासात क्षण आठवतात. त्यांनी ‘गुरुजी’ म्हणून घातलेली साद मनाला हळवे करते. आज दादांना आठवताना एक गोष्ट सांगावीशी वाटते की, अनेक नेते मंडळी झाली आणि पुढील काळात होतीलही. पण समाजमनाशी जुळलेले, मातीशी नाते सांगणारे, सर्वसामान्यांना ‘दादा’ या नात्याने आधार देणारे श्रीपतराव बोंद्रे दादा  यांच्यासारखे व्यक्तिमत्व अपवादाने आढळेल. त्यांच्या कार्याचे स्मरण हीच त्यांना आदरांजली.! (Shripatrao Bondre: Social reformer and politician)

लेखक  प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय कोल्हापूर

You may also like

Leave a Comment

error: Content is protected !!