जमीर काझी : मुंबई : चंद्रपुरमध्ये महापौरपदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने घोडेबाजार करून विजय मिळवला आहे. शिवसेना (उबाठा) ने चंद्रपुरात जी भूमिका घेतली त्याचे परिणाम राज्यात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. परभणीत काँग्रेसने आता अशीच भूमिका घ्यायची का? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. (Sapkal’s reaction on Chandrapur Mayor election)
चंद्रपूर महापौर निवडणुकीत भाजपाने शिवसेना ठाकरे गटाच्या सहा नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे सत्ता स्थापन केली. तर उपमहापौरपद ठाकरे गटाला देण्यात आले. याबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ म्हणाले की,’ काँग्रेसचे सर्वाधिक ३१ सदस्य असताना शिवसेना (उबाठा) महाविकास व इंडिया आघाडीतील पक्ष असल्याने काँग्रेसला पाठिंबा द्यायला हवा होता पण त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला तर एमआयएमने तटस्थ राहून भाजपला मदत केली. आमचा नवा मित्र पक्ष वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक मतदानाला गैरहजर राहिल्याने भाजपाचा उमेदवार १ मताने विजयी झाला. भाजपा व एमआयएमची अदृष्य युती आहे याचा अंजनगाव सुर्जी, अकोट, अचलपूर नंतर चंद्रपुरातही प्रत्यय आला आहे. चंद्रपूर महापौर पदाच्या निवडणुकीत तटस्थ राहून एमआयएमने भाजपाला मदतच केली आहे, भाजपा व एमआयएम एकाच नाण्याचा दोन बाजू आहेत हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने वंचितला सोबत घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, त्यांनी काँग्रेसला मदत केली असती तर काँग्रेसचा महापौर झाला असता. त्यासाठी विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर या नेत्यांना एकत्र बसवण्याचा प्रयत्न केला व त्यांनी एकत्र येऊन कामही केले. काँग्रेसमध्ये कोणतीच फाटाफुट झालेली नाही. या निवडणुकीचा अहवाल पक्ष निरिक्षकांकडून मागवण्यात येईल व नंतर त्यावर सखोल चर्चा केली जाईल,असेही त्यांनी सांगितले. (Sapkal’s reaction on Chandrapur Mayor election)