कोल्हापूर : प्रतिनिधी : जिल्ह्याच्या राजकारणात कट्टर विरोधक असलेले आमदार सतेज पाटील, आमदार अमल महाडिक जिल्हाधिकारी कार्यालयावर रस्त्यांच्या प्रश्नांवर एकत्र आलेले चित्र पहायला मिळाले. नेर्ली तामगाव येथील जिल्हा प्रशासनाने बंद केलेला रस्ता नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी सतेज पाटील, अमल महाडिक आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली. (Nerli tamgav road)
जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगामाची बैठक होती. या बैठकीला लोकप्रतिनिधी उपस्थित होते. नेर्ली तामगाव रस्ता नागरिक आणि वाहनधारकांसाठी पुन्हा सुरू करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री आबिटकर यांना ग्रामस्थांनी दिले. यावेळी आबिटकरांकडे विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, भाजपचे आमदार अमल महाडिक आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी यांच्याशी चर्चा केली. नेर्ली तामगाव रस्ता पूर्वतत सुरू ठेवा अन्यथा, यापुढे आमची भुमिका सरकार विरोधी राहील, असेही माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी स्पष्ट केले. सतेज पाटील आणि अमल महाडिक यांनीही नेर्ली तामगाव रस्ता पूर्वतत सुरू ठेवण्याची मागणी केली. (Nerli tamgav road)
विमानतळ सुरक्षिततेच्या कारणास्तव उजळाईवाडी नेर्ली तामगाव रस्ता बंद करण्यात आला आहे. मात्र या रस्त्याला पर्यायी मार्ग होईपर्यंत हा मार्ग बंद करु नये, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री प्रकाश आबीटकर आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे केली. याबाबत, जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात बैठक देखिल झाली. या बैठकीत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी नागरिकांच्या वतीन, तीव्र भावना व्यक्त केल्या. नेर्ली तामगावं मार्गाचा वापर उजळाईवाडी आणि कोल्हापूर परिसरातील नागरिक हुपरी आणि एमआयडीसीकडे जाण्यासाठी करीत आहेत. हा मार्ग बंद केल्यान आणि पर्यायी मार्ग नसल्यान हुपरी, तसचं एमआयडीकडे जाण्यासाठी दूरच्या अंतरावरुन जावे लागणार आहे. तर तामगावमधील नागरिकांना राष्ट्रीय महामार्गाकडे येण्यासाठी दुसऱ्या मार्गाचा वापर करताना गैरसोय होणार आहे. विमानतळ परिसर नजीकच्या गावातील पाणंद रस्ते, गाव रस्ते आणि नवे डी.पी. रोड बाबत धोरण ठरवण्यासाठी बराच कालावधी लागणार असल्याने तामगाव, उजळाईवाडी आणि गोकुळ शिरगाव परिसरातील नागरिकांची गैरसोय मोठ्या प्रमाणात होणार आहे. जिल्हा प्रशासनाने उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्त्याला पर्यायी मार्ग उपलब्ध होईपर्यंत आणि त्याबाबतचा निर्णय मार्गी लागेपर्यंत उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव रस्ता बंद न करता पूर्ववत चालू ठेवावा. अशी मागणी माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी बैठकीत केली. (Nerli tamgav road)
दरम्यान या बैठकीत नेर्ली तामगाव येथिल नागरिकांनी आम्ही जमिनी दिल्या आणि आता ‘जनता गयी भाड मे’ अशा प्रकारे शासन वागत आहे. अशा तीव्र व्यक्त केल्या. पालकमंत्री आबीटकर यांनी १५ मे रोजी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत चर्चा करुन, किमान या मार्गावरून हलकी वाहने सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ. अस आश्वासन दिलं. यावेळी कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणचे संचालक अनिल शिंदे, प्रभारी पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, गोकुळचे संचालक प्रकाश पाटील, गोकुळ शिरगाव सरपंच चंद्रकांत डावरे सातापा कांबळे विकास पाटील राजू माने रणजीत पाटील, लक्ष्मण हराळे, विश्वास तरटे, यांच्यासह उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव ग्रामस्थ उपस्थित होते.