मुंबई : प्रतिनिधी : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींचा केंद्रात उदय झाल्यानंतर अदानीचा विस्तार झाला आहे. त्यानंतर अदानींना अनेक गोष्टी मिळू लागल्या आहेत, असा दावाही राज ठाकरेंनी केला. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईला हलवून मुंबई विमानतळाचा भाग विकायची योजना करायची आहे, असा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे मोठे कारस्थान सुरू असल्याचा पुनरुच्चार ठाकरेंनी केला.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात राज ठाकरेंनी मोदी, अदानीवर टीका केली. खासदार संजय राऊत आणि चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी ठाकरे बंधूंची मुलाखत घेतली. (Raj Thackeray criticizes Modi and Adani)
मुलाखतीच्या दुसऱ्या भागात महाराष्ट्राचा भाग गुजरातला जोडणार असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला. त्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिले. नवी मुंबईत नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले आहे. मुंबईतील हक्काच्या विमानतळवरील सगळी कार्गो नवी मुंबईत हलवणार आहेत. हळहळू मुंबईतील देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईमध्ये हलवणार आहेत. सध्या विमानतळ अदानीकडे आहे. सध्याच्या विमानतळाचे क्षेत्रफळ बघितले तर किमान ५० शिवाजी पार्क मैदाने या विमानतळावर बसतील इतके मोठे आहे. मुंबईतील विमानतळ नवी मुंबईला हलवून इथल्या विमानतळाचा सर्व भाग विकायला काढायचा प्लॅन त्यांचा आहे, असा आरोपही राज ठाकरेंनी केला. (Raj Thackeray criticizes Modi and Adani)
मोदी सत्तेवर येण्यापूर्वी अंबानी मोठे उद्योगपती होते. पण मोदी सत्तेवर आल्यावर अदानी मोठे उद्योगपती झाले. अदानींचा विस्तार मोदी मोठे झाल्यानंतरचा आहे. मोदी ज्यावेळेस गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा अदानीला मुंद्रा पोर्ट मिळाला. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानींना अनेक गोष्टी मिळू लागल्या असा दावाही राज ठाकरेंनी केला. जर देशात भाजपऐवजी काँग्रेस किंवा कोणत्याही पक्षाचे सरकार असते आणि एकाच उद्योगपतीवर अदानीप्रमाणेचे मेहरबानी केली असती तर भाजपची भूमिका कशी असते असा सवालही त्यांनी केला. (Raj Thackeray criticizes Modi and Adani)