बार्शी : प्रतिनिधी : शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात जवळपास ६० हजार कोटी रूपयाचा ढपला या प्रकल्पात पाडणार असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. शक्तीपीठ महामार्गास समांतर रत्नागिरी -नागपूर हा महामार्ग अस्तित्वात असताना राज्यातील जनतेवर एक लाख कोटीच्या कर्जाचा बोजा टाकून बागायती जमीन, पर्यावरण, गौणखनिज, वन्यजीव, महापूर कंत्राटदार धार्जिण यासारख्या संकटामध्ये राज्यातील जनतेला लोटले जात असल्याची टीकाही शेट्टी यांनी केली. बार्शी येथे झालेल्या शक्तीपीठ विरोधी राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते.
गोव्याला जाण्यासाठी दुसरा रस्ता करण्याचा कुटील डाव
सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गास कडाडून विरोध केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महामार्गाचा मार्ग बदलण्याची घोषणा केल्यानंतर बार्शी येथे राज्यातील शक्तीपीठ विरोधी पदाधिकाऱ्यांचे एकदिवसीय अधिवेशन घेण्यात आले. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले कि, राज्यातील उर्वरित १० जिल्ह्यातून शेतकऱ्यांचा या महामार्गास कडाडून विरोध होत आहे. यामुळे आता सोलापूर -माण -खटाव -साता-यातून चंदगड मार्गे गोव्याला जाण्याचा दुसराच रस्ता करण्याच कुटिल डाव रचला जात आहे. हा महामार्ग जनतेवर लादण्यासाठी ज्यांच्या जमीनी या प्रकल्पासाठी जाणार नाहीत अशा लोकांना माझ्याकडे पाठवून शेतकऱ्यांचे समर्थन असल्याची दिशाभुल केले जात आहे. (A scam of 60,000 crore rupees in the Shaktipeeth Highway project)
प्रकल्पाचा खर्च वाढवला
मुळातच केंद्र सरकारने गेल्या आठवड्यात घोषणा केलेल्या नाशिक ते अक्कलकोट या ३७४ किलोमीटर रस्त्यासाठी भुसंपादनासह १९ हजार कोटी रूपये खर्च येणार असल्याचे जाहीर केले आहे म्हणजेच प्रतिकिलोमीटर ५१ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत असलेल्या ८०३ किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गा एक लाख कोटी रूपये खर्च येणार असल्याचे सांगितले आहे. याचाच अर्थ शक्तीपीठ महामार्गाचा प्रतिकिलोमीटर १२४ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या प्रकल्प खर्चाची तुलना करता प्रतिकिलोमीटर जवळपास ७३ कोटी रूपये याप्रमाणे जवळपास ६० हजार कोटी रूपयाचा ढपला या प्रकल्पात पाडणार असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. (A scam of 60,000 crore rupees in the Shaktipeeth Highway project)
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉम्रेड गिरीष फोंडे होते. स्वागत व प्रास्ताविक गणेश घोडके यांनी केले. यावेळी शिवाजी कांबळे, दिनकर पाटील, गजेंद्र येळकर, हणमंत जाधव, दिलीप भिसे, अनिल ब्याले यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग बाधित १२ जिल्ह्यातील पदाधिकारी या अधिवेशनास उपस्थित होते. (A scam of 60,000 crore rupees in the Shaktipeeth Highway project)