Home » Blog » भाजपाकडून युगपुरुषांना पळविण्याचा प्रयत्न;  खासदार राऊत यांचा  हल्लाबोल

भाजपाकडून युगपुरुषांना पळविण्याचा प्रयत्न;  खासदार राऊत यांचा  हल्लाबोल

by प्रतिनिधी
0 comments
BJP is trying to hijack the great historical figures

जमीर काझी : मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे, मराठी माणसाचे आणि हिंदवी स्वराज्याचे आराध्य दैवत आहेत. भाजपाने आजवर अनेक युगपुरुषांना पळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे, तसे महाराजांना गुजरातला पळविण्याचा प्रयत्न करू नका, शिवाजी महाराजांनी सुरत लुटून दणादाण उडवली होती, हा इतिहास कोणी विसरू शकत नाही, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी भाजपावर केला.

केंद्रीय जलशक्ती मंत्री के. सी. पाटील यांनी सुरतमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते, असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. राज्यात महापालिका निवडणुकीचा प्रचार रंगात येत असताना त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.  विरोधकांनी त्यांच्यावर कडाडून हल्ला चढविला आहे. याबाबत  संजय राऊत म्हणाले,’ भाजपाने आजवर सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि रवींद्रनाथ टागोर अशा अनेक युगपुरुषांना पळविण्याचा प्रयत्न करूनदेखील फायदा झाला नाही. आता गुजरातला छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी आधी अरबी समुद्रातील शिवस्मारक पूर्ण करा. मग शिवाजी महाराजांची जात काढा. महाराजांना जात लावू नका. हे असे विषय काढून मराठी माणसासह महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रकार सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी पळविली. आता बाळासाहेब ठाकरे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना पळवायला लागले आहेत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत तुम्ही पळवत आहात. तुमच्याकडे काही दैवत नाही का, गुजरातमध्ये कोणी महान नेते जन्मालाच आलेले नाहीत का, म्हणून तुम्हाला आमची दैवतं पळवण्याचा बकासुरू आनंद घ्यायचा का”, असा टोला त्यांनी भाजपा नेत्याला लगावला. (BJP is trying to hijack the great historical figures)

याबाबत काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते म्हणाले,’ “महापुरुषांचा इतिहास वेगळ्या पद्धतीने लोकांच्या समोर सांगायचा, हे भारतीय जनता पक्षाचं कारस्थान आहे. मागच्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळाबाबत भाजपाकडून वक्तव्य झाले त्यातून महापुरुषांच्या इतिहासाबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ही मंडळी करत आहेत. तुम्ही-आम्ही पाठ्यपुस्तकातून इतिहास वाचला आहे. या पुढच्या पन्नास वर्षात डिजिटल पद्धतीनं इतिहास वाचला जाईल. महापुरुषांबद्दल जाणून-बुजून अशी वक्तव्य करायची. तेच डिजिटल फुटप्रिंटच्या माध्यमातून लोकांसमोर आणायचं. जेणेकरून लोकांना तेच खरे वाटलं पाहिजे, हे कारस्थान आहे. हा पुढील शंभर वर्षांचा प्लॅन आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा मलीन करण्याचं हे कारस्थान आहे”, असा आरोप त्यांनी केला. (BJP is trying to hijack the great historical figures)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00