मुंबई : प्रतिनिधी : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवली येथे सावली डान्सबार सुरू असल्याचा आरोप शिवसेन ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत केला. या आरोपाने महायुती सरकारमध्ये खळबळ उडाली आहे. परब यांनी मंत्री कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्री योगेश कदम हे माजी मंत्री रामदास कदम यांचे चिरंजीव आहेत. सध्याच्या महायुती सरकारमध्ये ते राज्यमंत्री आहेत. (Paraba’s allegations)
आमदार परब यांनी राज्याचे गृह तथा महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी वाळू चोरीचा आरोप केला होता. आज अधिवेशनाच्या शेवटच्यादिवशी त्यांनी योगेश कदम यांच्या आईच्या नावाने कांदिवलीतील सावली डान्सबार सुरू असल्याचा आरोप केला आहे. विधान परिषदेत आरोप करताना आमदार परब म्हणाले की, कांदिवली येथे सावली बार आहे. तिथे मे महिन्यात पोलिसांनी धाड टाकली, त्यावेळी २२ बारबाला, २२ कस्टमर आणि चार कर्मचाऱ्यांना पकडण्यात आले. राज्यात डान्सबारवर बंदी असतानाही बार सुरू कसा आहे? असा प्रश्न उपस्थित करत अनिल परब म्हणाले की, या प्रकरणात कस्टमरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सदर ठिकामी पंचनामा केला असून त्या बारचे परमिट हे ज्योती रामदास कदम यांच्या नावे आहे. त्या गृह राज्यमंत्र्यांच्या मातोश्री आहेत, असा खळबळजनक आरोप परब यांनी केला. (Paraba’s allegations)
अनिल परब म्हणाले की, एकीकडे तुम्हाला लाडक्या बहिणीचा आशीर्वाद मिळत आहे आणि दुसरीकडे तुम्ही आया बहिणींना डान्सबारमध्ये नाचवत आहात. त्यामुळे माझी मागणी आहे की, आजच्या आज गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अजित पवार तुम्ही योग्य ती कारवाई कराल. पण आज जे मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळत आहेत, त्यांनी गृहराज्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. जर कारवाई नाही झाली तर सरकारचा पाठींबा आहे, हे सिद्ध होईल. कारण सध्या महाराष्ट्राची मान शरमेने खाली जातं आहे. आज बिहारमध्ये म्हणत आहेत की, तुमचा महाराष्ट्र बिहार झाला आहे का? जर गृहराज्यमंत्र्यांकडून कायदे तुडवले जात असतील तर मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित होतो, असे म्हणत अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. (Paraba’s allegations )