Home » Blog » Raj Uddhav Melava: एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे

Raj Uddhav Melava: एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी : उद्धव ठाकरे

by प्रतिनिधी
0 comments
raj uddhav Mekava

मुंबई : प्रतिनिधी : ठाकरे बंधू एकत्र कधी येणार?, असा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता, मात्र याची प्रतीक्षा आणि उत्सुकता शनिवारी (५ जुलै) ठाकरे बंधूंनीच संपवली. तब्बल वीस वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू मराठी विजय मेळाव्यात एकत्र आले. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी असे स्पष्ट संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. तर राज ठाकरे यांनी आम्ही शांत आहोत, पण गांडू नाही. महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस याबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होण्यासाठी सर्व मराठीजनांनी एकत्र यावे असे आवाहनही राज यांनी केले. (Raj Uddhav Melava)

ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने वरळी डोममधील सभागृह तुडुंब भरले होते. सभागृहाबाहेर प्रचंड गर्दी होती. व्यासपीठावर दोघांचे आगमन होताच ‘कोण आला रे कोण आला,’ अशा घोषणा देण्यात आल्या. व्यासपीठावर राज आणि उद्धव या दोघांसाठीच आसनव्यवस्था केली होती. खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, कॉ. प्रकाश रेड्डी, शेकापचे जयंत पाटील, डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्यासह ठाकरे कुटुंबातील सदस्य व्यासपीठासमोर खाली बसले होते.

जे बाळासाहेबांना जमले नाही ते फडणवीसांना जमले

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात एकमेकाचा उल्लेख करताना ‘सन्मानीय’ संबोधनाने केली. सर्वप्रथम राज ठाकरे भाषण यांनी केले. आज जवळपास वीस वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर एकत्र येत आहोत. जे माननीय बाळासाहेबांना जमले नाही, जे अनेकांना जमले नाही. आम्हाला दोघांना एकत्र आणायचे देवेंद्र फडणवीसांना जमले असा टोला राज ठाकरे यांनी लगावला. (Raj Uddhav Melava)

आमची सत्ता रस्त्यांवर

माझ्या मराठी भाषेकडे, महाराष्ट्राकडे कुणी वाकड्या नजरेने पहायचे नाही. गरज नसताना हिंदी भाषा कुठून आली, असा सवाल करत राज ठाकरे यांनी लहान मुलांवर जबरदस्ती केली जात असल्याचा आरोप  केला. सत्ता आहे, बहुमत आहे म्हणून हिंदी भाषा तुम्ही लादायला निघाला आहात. तुमच्या हातात सत्ता असेल तर ती विधानभवानात.  आमची सत्ता रस्त्यांवर आहे, असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला. महाराष्ट्रात हिंदी सक्तीचा प्रयत्न कराल तर  महाराष्ट्र कसा पेटून उठतो, हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही दिला. (Raj Uddhav Melava)

हिंदी भाषेबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, हिंदी भाषेबद्दल मला वाईट वाटत नाही. कोणतीही भाषा श्रेष्ठच असते, उत्तम असते. एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते. खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. भाषा अशाच उभ्या राहत नसतात. आणि हिंदी भाषेचे नवीन फॅड कुठून  आणले? असा प्रश्न उपस्थित केला.

कुणाची माय व्यायली आहे…

संपूर्ण भारतावर सव्वाशे वर्षे मराठ्यांनी राज्य केले, पण आम्ही कुणावरही मराठी लादली नाही. हिंदी भाषा दोनशे वर्षांपूर्वीची आहे. पण हिंदी भाषा सक्तीवरुन मुंबई स्वतंत्र करता येते का, कुणाची माय व्यायली आहे त्याने महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा, आम्ही शांत आहोत याचा अर्थ गांडू नाही आहोत, असा इशाराही दिला.

हिंदी भाषा सक्तीचा आदेश मागे घेतल्यानंतर हे प्रकरण वेगळे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता जातीपातीचे राजकारण खेळले जाईल. महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे, पण जबरदस्ती करु नका. पण त्यांनी जास्त नाटकं केली तर त्याच्या कानाखाली आवाज काढलाच पाहिजे असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. कानाखाली आवाज काढताना व्हिडिओ काढू नका, अशी सूचनाही त्यांनी केली. महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस याच्यावर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही असा इशाराही दिला. हिंदी भाषा सक्तीबाबत सर्वांनी सावध आणि सतर्क राहिले पाहिजे. पुढे काय होईल याची कल्पना नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार होण्यासाठी सर्व मराठीजनांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.

आमच्या दोघांतील अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला

उद्धव ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातील राज ठाकरे यांनी केलेल्या मांडणीबद्दल कौतुक केले. माझ्या भाषणाची गरज नाही. पण सर्वांचे लक्ष असल्याने एकत्र दिसणे महत्वाचे आहे असे ते म्हणाले. बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी व्यासपीठावर भेट झाली. आमच्या दोघांमध्ये जो अंतरपाट होता तो अनाजीपंतांनी दूर केला. अक्षता टाकण्याची त्याच्याकडून अपेक्षा नाही, असा टोला लगावत एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी असे संकेतही उद्धव ठाकरे यांनी दिले. (Raj Uddhav Melava)

हिंदी सक्तीचा नतद्रष्टांचा डाव मी आणि राजने उधळून लावला आहे. भाजप फक्त वापर करतो आणि फेकून देतो याचा अनुभव मी आणि राजने काही प्रमाणात घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे होते म्हणून तुमची ओळख झाली. पण आमच्या हिंदुत्वाबद्दल भाजपकडून शंका व्यक्त केली जाते. आमचे हिंदूत्व हे मराठी भाषेचे कडवे हिंदूत्व आहे. १९९२ च्या दंगलीत मराठी माणसाने अमराठी हिंदू माणसांना वाचवले होते याची आठवण करुनही दिली.

मराठीच्या प्रश्नांवर गुंडगिरी करणारच

उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली. मराठी भाषेवरुन कुणाचीही गुंडगिरी खपवून घेणार नाही या फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेताना होत आम्ही गुंड आहोत. मराठी भाषेच्या प्रश्नांवर आम्ही गुंडगिरी करणारच, अशा इशाराही त्यांनी दिला. मुंबईही मराठी माणसाने मिळवली आहे. मुंबई लढून मिळवली आहे. काश्मिरविषयीचे ३७० कलम हटवण्यासाठी शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. मग त्यांनी एक निशाण, एक विधानचा नारा दिला. त्यालाही आम्ही पाठिंबा दिला. ‘वन नेशन, वन इलेक्शन’नंतर ही नवीन घोषणा केली. आम्हाला हिंदू, हिंदूस्थान मान्य आहे. पण हिंदी कधीही मान्य केली जाणार नाही. तुम्ही आमची मराठी मारता, आमच्यावर सक्ती करता, आमच्यावर सक्ती केली तर शक्ती दाखवू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. (Raj Uddhav Melava)

मुंबई तोडण्यासाठी आमच्यात भांडणे लावली जात आहेत. दुसरीकडे मुंबईतील उद्योगधंदे गुजरातला पळवले जात आहेत. हे आम्ही किती दिवस सहन करायचे, असा सवाल करत आम्हाला आता एकत्र यावेच लागेल. ‘म’ मराठीचा नाही महानगरपालिकेचा आहे असा आरोप केला जातो. पण आमचा ‘म’ महानगरपालिकेचा नाही तर  महाराष्ट्राचा आहे, अशा शब्दांत विरोधकांच्या टीकेला त्यांनी उत्तर दिले.

भाजप कोणत्याही लढ्यात नव्हता अशी टीका करत उद्धव ठाकरे यांनी मुंबई दिल्लीतील बसलेल्या मित्रांच्या घशात घालत असताना आपण गप्प बसायचे का, मुंबईचे रक्षण आणि महाराष्ट्र धर्माचे रक्षण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. मराठी माणसांवर होणारी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

मेळाव्यातील क्षणचित्रे

  • एकनाथ शिंदेंवर जहरी टीका

उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता हल्ला चढविला. ते म्हणाले, ‘‘एका गद्दारानं काल जय गुजरातची घोषणा दिली. आपला मालक आल्यावर त्याच्या पायात बसणारा हा माणूस जय गुजरात म्हणतो, असा लाचार माणूस मराठीचा, शिवसेनाप्रमुखांच्या विचाराचा पाईक कसा असू शकेल?,’’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

  • दोन्ही ठाकरे कुटुंबीयांचे मनोमिलन

 या मेळाव्यातून उद्धव व राज ठाकरे यांच्याबरोबरच त्यांच्या दोन्ही कुटुंबीयांचेही मनोमिलन झाल्याचे दिसून आले. मेळावा झाल्यानंतर रश्मी ठाकरे पुत्र आदित्य व तेजस तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुत्र अमित व मुलगी यांनी व्यासपीठावर येऊन एकत्र भेटीगाठी घेतल्या. फोटोसेशन केले. आदित्य व अमित ठाकरे यांनी एकमेकांना अलिंगन देत फोटोसाठी पोज दिल्या.

  • अन्य पक्षांच्या नेत्यांची हजेरी

 विजय मेळाव्यात केवळ दोघे ठाकरे बंधूच व्यासपीठावर असले तरी महाविकास आघाडीचे काही नेतेही मेळाव्याला हजर होते. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शेकापचे जयंत पाटील, काँग्रेसचे माजी खा. भालचंद्र मुणगेकर, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी, अजित नवले, आणि मराठी भाषा विभागाचे प्रमुख दीपक पवार, आ. विनोद निकोले, महादेव जानकर आदींचा समावेश होता. सभा संपल्यानंतर राज ठाकरे यांनी सर्वांना व्यासपीठावर निमंत्रित करून मराठीच्या मुद्द्याला समर्थन दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व अन्य वरिष्ठ नेते दिल्लीत बैठक असल्याने अनुपस्थित होते, असे खा. संजय राऊत यांनी सांगितले.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00