राबात (मोरोक्को) : रस्त्यांवरील ३० लाख भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याची मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. मोरोक्को देशात ही मोहीम राबवण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. २०३० मध्ये मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगाल या तीन देशांमध्ये फिफा विश्व कपचे आयोजन केले आहे. फिफा विश्व कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर शहर सुस्थितीत दिसावे यासाठी भटक्या कुत्र्यांना मारण्यात येणार आहे. पण त्याला मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. (Stray Dogs)
मोरोक्को फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने एक रिपोर्ट बाहेर आला आहे. त्यानुसार मोरोक्कोमध्ये देश-विदेशातील फुटबॉल शौकिन सामने पाहण्यासाठी मोठ्या संख्येने येणार आहेत. त्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास होऊ नये यासाठी ३० लाख कुत्र्यांना मारण्याचे नियोजन करण्यात येत आहे. या निर्णयाला ॲनिमल राईटस् च्या कार्यकर्त्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. (Stray Dogs)
मोरोक्कोतील प्रसिद्ध ॲनिमल राईट ॲक्टिव्हिस्ट आणि वकील जेन गुडॉल यांनी कुत्री मारण्याच्या मोहिमेला ‘फिफा’चे महासचिव मॅटियास ग्राफ स्ट्रॉ यांना पत्र लिहून विरोध केला आहे. ‘या रिपोर्टमुळे मी अस्वस्थ झालो आहे. आंतरराष्ट्रीय प्राणीमित्र आणि प्राणी संरक्षण करणाऱ्या संघटना या रिपोर्टवर लक्ष ठेवून आहेत. जे फुटबॉल शौकीन प्राण्यांवर प्रेम करतात ते अशा भयानक कृत्याला सहमती देणार आहेत का?’ असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.(Stray Dogs)
जेन गुडॉल यांनी, या घटनेबाबत हस्तक्षेप केला नाही तर ॲनिमल राइटस् कार्यकर्ते मोठे पाऊल उचलतील, असा इशारा फिफाच्या महासचिवांना दिला आहे. त्याचवेळी मोरोक्कोमध्ये भटक्या कुत्र्यांना मारण्याचे काम यापूर्वीच सुरू झाले असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.