लखनऊ; वृत्तसंस्था : बहराइच परिसरात दुसऱ्या दिवशीही हिंसाचाच्या घटना घडल्या असून एका विशिष्ट समुदायाला लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या ५० हून अधिक घरांची तोडफोड करण्यात आली आहे. पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे. बाधित भागात आधार कार्ड पाहूनच प्रवेश दिला जात आहे. दुसऱ्या दिवशीही इंटरनेट बंद आहे. दोन दिवसांच्या जाळपोळ आणि हिंसाचारानंतर बहुतांश घरांत फक्त महिला आहेत. पुरुष एकतर पळून गेले आहेत किंवा इतरत्र लपले आहेत. (Yogi Adityanath)
हिंसाचारात मारल्या गेलेल्या राम गोपाल यांच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट घेऊन सांत्वन केले. दंगल झालेल्या भागात राज्य राखीव दल दाखल झाले आहे. पोलिसांचे लक्ष सध्या शांतता व सुव्यवस्था राखण्यावर आहे. व्हिडीओ फुटेजच्या आधारे पोलिसांनी जाळपोळ करणाऱ्यांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे पोलिस महासंचालक अमिताभ यश यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी सध्या बहराइचमध्ये तळ ठोकून आहेत.
बहराइचमधील प्रत्येक चौकात पोलिसांनी रात्रभर गस्त घातली. येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येत आहे. बसप प्रमुख मायावती यांनी बहराइच हिंसाचाराबाबत ‘एक्स’वर दोन पोस्ट केल्या आहेत. त्यात लिहिले आहे की, बहराइच जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे आणि नियंत्रणाबाहेर आहे, हे चिंताजनक आहे. अशा स्थितीसाठी शासन व प्रशासनाचा हेतू व धोरण पक्षपाती नसावे. ते पूर्णपणे कायदेशीर असले पाहिजे जेणेकरून संबंधित प्रकरण गंभीर नसून येथे शांतता व सुव्यवस्था राखली जाईल. तसेच सण-उत्सव कोणत्याही धर्माचा असो, शांतता व सुव्यवस्था राखणे ही सरकारची पहिली जबाबदारी आहे. अशा प्रसंगी विशेष व्यवस्था करणे आवश्यक आहे. अशी जबाबदारी पार पाडली असती, तर बहराइचची घटना कधीच घडली नसती. सरकारने सर्व परिस्थितीत शांतता आणि लोकांच्या जीवनाची, मालमत्तेची आणि धर्माची सुरक्षा सुनिश्चित केली पाहिजे. (Yogi Adityanath)
हेही वाचा :
- सांगली : व्यापारी पेठेत स्वच्छतागृहांच्या उभारणीसाठी काँग्रेसचे आंदोलन
- काँग्रेसच्या वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती
- तिसरी आघाडी, मनसेचा कोणाला होणार फायदा?