वाळवा : प्रतिनिधी : पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णा नायकवडी हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याने २०२४-२०२५ या वर्षासाठी उसाला उच्चांकी दर जाहीर केला आहे. यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रति मेट्रिक टनासाठी ३३०८.२४ रुपये दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन वैभवकाका नायकवडी यांनी केली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या ऊस पट्टयात हुतात्मा साखर कारखान्याने उच्चांकी ऊस दर जाहीर करुन आघाडी घेतली आहे.
कारखान्याची ४५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे चेअरमन वैभवकाका नायकवडी यांचे अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेमध्ये विषय पत्रिकेवरील व ऐनवेळीचे सर्व विषय एकमताने मंजूर करणेत आले.
यावेळी बोलताना सभेचे अध्यक्ष व कारखान्याचे चेअरमन वैभवकाका नायकवडी म्हणाले, साखर उद्योग हा मोठ्या आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. एफ.आर.पी.व एम.एस.पी.मधील जो फरक आहे तो कमी होणे गरजेचे आहे. ऊस बिल व इतर देणी देणेसाठी नवीन कर्जे काढावी लागत आहेत. साखर उद्योगाच्या दृष्टीने ही अत्यंत चिंतेची बाब आहे. यातून बाहेर पडणेसाठी साखरचे एम.एस.पी. ही किमान ४५०० रुपये प्रती क्विंटल होणे अत्यावश्यक आहे. या सर्व आर्थिक अडचणीवर मात करुन, मार्ग काढून हुतात्मा कारखान्याने गेल्या २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी उसाला उच्चांकी प्रति मेट्रीक टन ३३०८.२४ रुपये दर देणार आहे. कारखान्याने यापूर्वी.३२०४ रुपये दर ऊस पुरवठादारांना आदा केले असून राहिलेले प्रति मेट्रिक टन १०४.२४ रुपये दिवाळीपूर्वी देणार आहे अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
मंत्री समितीच्या निर्णयानुसार आपले कारखान्याचा येणारा गळीत हंगाम २०२५-२६ कधी सुरु करायचा त्याबाबतचे धोरण ठरवू. क्षारपड निर्मुलन व निचरा प्रणाली कामात सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. याबाबत कारखाना ऊस विकास विभागाचे मार्गदर्शन घ्यावे व आपले क्षारपड क्षेत्र उत्पन्नाखाली आणावे.
ते पुढे म्हणाले, कार्यक्षेत्रातून किमान चार लाख मेट्रिक टन ऊस गळीतास येणेसाठी सर्वांनी प्रयत्न करावा. ऊसाचे उत्पादन वाढविणेसाठी ए.आय.सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा व ठिबक सिंचनाचा वापर करावा. आपले शेतात ए.आय.तंत्रज्ञान, निचरा प्रणाली, ठिबक सिंचन करणेसाठी कार्यरत रहावे. कारखान्यातील ऑफ सिझनची ओव्हरहॉलिंग मेन्टेन्सची कामे अंतिम टप्प्यात आहेत. येणाऱ्या सिझनमध्ये स्टॉपेजेस येऊ नयेत म्हणून ऑफ सिझन मेन्टेन्सचे कामे काळजीपूर्वक करावीत. खोडव्याची वाढ पुर्ण क्षमतेने झाली नाही त्यामुळे येणारा सिझन कमी दिवसाचा आहे तरी पूर्ण क्षमतेने ऊस पुरवठा व गाळप होणेसाठी शेती व तांत्रिक विभागानी कार्यरत रहावे. केलेल्या कामाची चाचणी घ्यावी, चाचणीमध्ये येणाऱ्या दुरुस्त्या काळजीपूर्वक दुरुस्त्या कराव्यात. येणाऱ्या गळीत हंगामामध्ये सहा लाख मेट्रिक टनाचे उद्दिष्ठ आहे ते पूर्ण करणेसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा.पद्मभूषण क्रांतिवीर डॉ.नागनाथअण्णांच्या स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पुतळा तयार करणेचे काम चालू आहे.
यावेळी सभासद, शेतकरी, कार्यकर्ते, कारखान्याचे व्हा.चेअरमन, सर्व संचालक, माजी चेअरमन, माजी संचालक, हुतात्मा शिक्षण व उद्योग समुहातील सर्व संस्थांचे आजी माजी चेअरमन, सर्व आजी माजी संचालक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी वर्ग, कारखान्यातील खाते प्रमुख,अधिकारी कर्मचारी वर्ग, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक शिवाजी पाटील यांनी विषय पत्रिकेनुसार विषयांचे वाचन केले. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी स्वागत केले.