कोल्हापूर शहरातील ग्रामीण तोंडावळा असलेल्या कसबा बावड्यात शैक्षणिक संस्था स्थापन करुन तिचा विस्तार कोल्हापूर, पुणे, मुंबईसह देशभरात करणाऱ्या पद्मश्री, बिहाराचे माजी राज्यपाल डॉ. डी.वाय. पाटील यांचा निधनाने शोककळा पसरली आहे. ज्ञानगंगेतील या उपासकांने आयुष्याच्या अखेरपर्यंत बहुजन समाजातील मुलांनी उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, वैद्यकीय शिक्षण घेऊन देशसेवा करावी यासाठी कार्यरत राहिले. या महान ज्ञानोपसकांचा आपण जीवन परिचय ….
सतीश घाटगे
डॉ. डी.वाय.पाटील यांचे नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील. डी.वाय.दादा ही त्यांची ओळख. त्यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९३५ मध्ये अंबप गावात झाला. त्याचे वडील यशवंतराव भाऊराव पाटील हे नामवंत शेतकरी होते. त्यांच्या घराण्याला वारकरी साप्रंदायाची परंपरा आहे. कसबा बावड्यात तुकाराम महाराजांचे मंदिर आहे. ग्रामीण तोंडावळा असलेल्या कसबा बावड्यात यशवंतरावांनी १९४६ मध्ये राजाराम हायस्कूलची उभारणी करत कसबा बावडा आणि परासरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी चांगली सोय उपलब्ध करुन दिली. (The life story of D.Y. Patil)
वडिलांना शिक्षणांचे महत्व माहित असले तरी शेती आणि अभ्यास याचे गणित जमवत डी.वाय.पाटील यांनी एम.ए. एलएलबी, पीएच.डी. ची पदवी संपादन केली. डी.वाय. पाटील यांना आजची पिढी डीवाय दादा या नावाने ओळखते. डी.वाय.दादांची शेगावच्या श्री संत गजानन महाराज आणि महादबा पाटील धुळगांवकर यांच्यावर मोठी श्रध्दा होती. वडीलांचा अध्यात्म, शेती, सहकार, शिक्षण क्षेत्रातील वारसा डी.वाय.दादांनी यशस्वीपणे पुढे नेला.
१९ व्या वर्षी श्रीराम सोसायटीचे अध्यक्ष
एकीकडे शिक्षण, शेतीची आवड असताना कसबा बावड्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही त्यांनी भरीव काम केले. वयाच्या १९ वर्षी त्यांनी श्रीराम को ऑपरेटिव्ह सेवा संस्थेचे अध्यक्षपद भूषवले. त्यावेळी कोल्हापूर नगरपालिका होती. १९५७ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले. शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर नगरपालिकेत ते एकमेव काँग्रेसचे नगरसेवक होते.
पन्हाळा बावडा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार
डी.वाय.पाटील यांनी त्यानंतर काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. काँग्रेसमध्ये त्यांनी अनेक पदे भूषवली. कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे ते अध्यक्ष होते. १९६७ मध्ये पन्हाळा बावडा या मतदार संघात ते आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी विधानसभेत शेतकरी, कष्टकरी, आणि मागास घटकांचे प्रश्न मांडले. त्याकाळात ते कोल्हापूर जिल्हा कमिटीचे सरचिटणीस होते.
शिक्षण क्षेत्राची गोडी
१९६४ मध्ये डी.वाय.दादा कसबा बावडा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष झाले. १९७५ मध्ये ते गारगोटी येथील प्रसिद्ध मौनी विद्यापीठाचे अध्यक्ष झाले. सलग १९ वर्षे अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली. त्या काळात त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रमांना मान्यता मिळवून दिली. १९८३ मध्ये रामराव अदिक एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. ते मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य होते. (The life story of D.Y. Patil)
डॉ. डी.वाय पाटील एज्युकेशन सोसायटीची स्थापना
डी.वाय.दादांनी १९८६ मध्ये डॉ. डी.वाय.पाटील एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. शिक्षणाचा व्यापक प्रसार करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश होता. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर, मुंबई, पुणे येथे इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेजची उभारणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणांची संधी मिळवून दिली. या संस्थेतून हजारो इंजिनिअर आणि डॉक्टर घडले आणि ते देशसवेत कार्यरत आहेत. १९८९ ते १९९१ काळात ते पुणे विद्यापीठाचे तर १९९० ते १९९३ या कालावधीत ते शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सिनेट सदस्य होते. १९९१ मध्ये त्यांनी डॉ.डी.वाय.पाटील एज्युकेशन अकॅडम् मुंबई या संस्थेची स्थापना केली. १९९४ ते १९९९ या कालावधीत ते अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद पश्चिम विभागाचे चेअरमन होते. डॉ. डी.वाय.पाटील संस्थेचा देशभर विस्तार झाला आहे. १८३ शैक्षणिक संस्था सध्या कार्यरत आहेत. तीन अभिमत विद्यापीठे, ५ स्टेट प्रायव्हेट विद्यापीठात एक लाख ५३ हजार विदयार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेचे पाच लाख दोन हजार माजी विद्यार्थी असून २६ हजार स्टाफ आहे.
पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती १९८९ ते १९९४ या कालावधीत ते अध्यक्ष होते. त्यांच्या काळात देवस्थानच्या १५० मंदिरांचा जीर्णोद्धार झाला. अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरात भाविकांना सुविधासाठी त्यांनी काम केले.
कोल्हापूरात यशस्वी मराठी साहित्य संमेलन
सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापुरात १९९२ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्यांच्या नेतृत्वाखाली होते. ज्येष्ठ साहित्यीक रमेश मंत्री संमेलनाचे अध्यक्ष होते. कसबा बावडा येथे अतिशय चोख नियोजन डी.वाय.दादांनी केले. कोल्हापूरच्या इतिहासात यशस्वी साहित्य संमेलन म्हणून नोंद झाली.
त्रिपुरा, बिहारचे राज्यपाल
डॉ. डी.वाय.पाटील यांच्या उत्तुंग कार्याची दखल घेऊन त्यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून निवड झाली. २७ नोव्हेंबर २००९ ते २०१३ या कालावधीत ते राज्यपाल होते. ९ मार्च २०१३ मध्ये ते बिहारचे राज्यपाल झाले. ते २६ नोव्हेंबर २०१४ पर्यंत राज्यपाल होते. ३ जुलै ते १७ जुलै २०१४ या कालावधीत पश्चिम बंगालच्या राज्यपाल पदाचा कार्यभारही त्यांच्याकडे होता. (The life story of D.Y. Patil)