मुंबई : मुंबईतील कुर्ला परिसरात सोमवारी (दि. ९) रात्री बेस्ट बसच्या भीषण अपघातात सात जण ठार तर चाळीसहून अधिक लोक जखमी झाले. या अपघातामुळे बारा वर्षांपूर्वी स्वारगेट परिसरात एस.टी. बस चालकाकडून घडलेल्या प्रकाराला उजाळा मिळाला आहे. स्वारगेट परिसरातील त्या अपघातात नऊ जण ठार झाले होते. त्या अपघातप्रकरणी बसचालक संतोष माने यास न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. (Kurla Bus Accident)
पुण्याच्या अपघातात ९ बळी
संतोष माने याने २५ जानेवारी २०१२ रोजी स्वारगेट एस.टी. आगारातून बस चोरली आणि पुणे शहरात अक्षरशः थैमान घातले. स्वारगेट बस स्थानकातून सकाळी सव्वा आठ वाजता एस.टी. बस काढल्यानंतर संतोष माने याने पूल गेटवरुन सेव्हन लव्ह चौक ते निलायम रस्ता अशा जवळपास २५ किलोमीटरच्या प्रवासात नऊ जणांना चिरडले होते. या अपघातात तीसहून अधिक लोक जखमी झाले होते, तसेच ४५ वाहनांचे नुकसान झाले होते. घटना घडली त्यावेळी संतोष मानेचे मानसिक संतुलन ढळल्याचा दावा करण्यात आला. डॉ. दिलीप बुरटे यांनी त्याचे मन:स्वास्थ्य ठीक नसल्याची साक्ष दिली होती. मात्र. घटना घडली त्यापूर्वी आणि नंतर दोन दिवस मानेची मन:स्थिती सामान्य असल्याचे नमूद करून न्यायालयाने डॉ. बुरटे यांच्यावर ताशेरे ओढले होते. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. के. शेवाळे यांनी मानेला फाशीची शिक्षा सुनावली. खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, गंभीर जखमी करणे आणि शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या गुन्ह्यांसाठी मानेला न्यायालयाने दोषी ठरवले.
कुर्ल्यात काय घडले?
कुर्ला पश्चिम येथील महापालिकेच्या एल विभाग कार्यालयाजवळ सोमवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास बेस्ट बसचा थरार पाहायला मिळाला. ही बस कुर्ला पश्चिम येथून अंधेरीकडे निघाली होती. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने रस्त्यावरून जाणाऱ्या काही खासगी वाहनांसह रिक्षा आणि अनेक पादचाऱ्यांना धडक दिली. एका भिंतीवर आदळून बस थांबली. अपघातात सात जण ठार झाले तर ४९ जण जखमी झले.
आमदार दिलीप लांडे यांनी अपघातासंदर्भात माहिती देताना सांगितले की, कुर्ला स्थानकाहून निघालेल्या बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. घाबरलेल्या चालकाने ब्रेकच्या जागी एक्सलेटरवर पाय दिला. परिणामी बसचा वेग आणखी वाढला आणि नियंत्रणाबाहेर जाऊन काही वाहनांना धडकली. (Kurla Bus Accident)
झोन ५ चे पोलीस उपायुक्त गणेश गावडे यांनीही, चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याचे प्राथमिक दर्शनी समजले असल्याचे सांगितले.
हेही वाचा :
- सोनिया गांधीः चावीची बाहुली ते सरकारचा रिमोट
- सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी राज्य शासन ठाम उभे
- सोशल मीडियावरून रिलस्टारचा देहविक्री व्यवसाय