लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘वोट चोरी’संदर्भात आणखी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचं सांगितलं आहे. त्यांनी म्हटलं की, यापूर्वीच्या ‘वोट चोरी’च्या ‘अणुबॉम्ब’नंतर आता ‘हायड्रोजन बॉम्ब’ येणार आहे, जो त्यापेक्षा कितीतरी पटींनी शक्तिशाली असेल. याचा अर्थ आधीपेक्षा खूप मोठा गौप्यस्फोट असेल. बिहारमधील ‘वोटर अधिकार यात्रे’च्या समारोपावेळी राहुल यांनी ही घोषणा केली. त्यामुळे या नव्या गौप्यस्फोटाबाबत उत्कंठा लागून राहणे स्वाभाविक आहे. (The excitement of the ‘hydrogen bomb’)
डॉ. विजय चोरमारे
राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष सातत्याने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘वोट चोरी’चा आरोप करत आहेत. सर्व विरोधी पक्षांनी त्यांच्या या आरोपांना समर्थन दिले आहे. आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी बिहारमध्ये वोटर अधिकार यात्रा काढली. १७ ऑगस्टला बिहारच्या सासारामपासून सुरू झालेली यात्रा २५ जिल्ह्यांमधून तेराशे किलोमीटरचा प्रवास करत एक सप्टेंबरला पाटणाच्या गांधी मैदानात संपली. मतदार यादीतील गोंधळ आणि ‘वोट चोरी’विरोधात जनजागृती करण्यासाठी या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते, तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रात वोट चोरी करून महायुती सरकार सत्तेवर आल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर बिहारमधल्या समारोपाच्या सभेत महाराष्ट्रातून शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडही सहभागी झाले होते. विशेष म्हणजे बिहारमधील या समारोप सभेच्या आयोजनाची प्रमुख जबाबदारी महाराष्ट्र विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांच्याकडे होती.( The excitement of the ‘hydrogen bomb’)
बिहारमधून ‘क्रांती’चा संदेश घेऊन दिल्लीपर्यंत पोहोचण्याचा निर्धार करीत वोटर अधिकार यात्रेचा समारोप झाला.
राहुल यांनी सात ऑगस्ट २०२५ रोजी दिल्लीत पत्रकार परिषदेत ‘वोट चोरी’चे पुरावे ‘अणुबॉम्ब’ असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी दावा केला की, कर्नाटकच्या बेंगलुरू ग्रामीण आणि महाराष्ट्रात मतदार यादीत गोंधळ आढळून आला. आम्ही सहा महिने तपास केला. आमच्याकडचे शंभर टक्के विश्वासार्ह पुरावे आहेत. हा ‘अणुबॉम्ब’ फुटला की निवडणूक आयोगाला लपण्याची जागा मिळणार नाही.”
राहुल यांनी प्रामुख्याने महाराष्ट्राचा दाखला दिला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला यश मिळालं, पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पाच महिन्यांत एक कोटी नवे मतदार जोडले गेले, जे सर्व भाजपच्या बाजूने गेले. निवडणूक आयोगाने हे आरोप ‘बिनबुडाचे’ ठरवत राहुल यांच्याकडे ठोस पुरावे किंवा शपथपत्र मागितलं आहे. आयोगाने असंही म्हटलं की, जर राहुल आपले दावे सिद्ध करू शकले नाहीत, तर त्यांनी देशाची माफी मागावी. ( The excitement of the ‘hydrogen bomb’)
बिहारमधल्या मतदार अधिकार यात्रेला अशी सगळी पार्श्वभूमी होती.
पाटण्यातील समारोपासाठी मोठी सभा होणार होती. परंतु त्यासाठी गांधी मैदानात परवानगी न मिळाल्याने मिरवणूक काढण्याचा निर्णय घेण्यात आला. राहुल गांधींनी गांधी मैदानात कार्यकर्त्यांसह रात्री थांबण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण सुरक्षा कारणांमुळे त्यालाही नकार देण्यात आला. स्थानिक प्रशासनाने मात्र हे दावे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी त्यांनी सांगितलं की, बिहारमधूनच क्रांती सुरू होते आणि आता मतदारांच्या अधिकाराची लढाई येथूनच सुरू झाली आहे, जी देशभर पसरणार आहे. ही यात्रा आंबेडकर आणि गांधींच्या संविधानाला वाचवण्याची लढाई असल्याचं त्यांनी म्हटलं.
काँग्रेसला नवी ऊर्जा
राहुल यांनी यात्रेदरम्यान सामान्य लोकांशी संवाद साधत काँग्रेसला नवी ऊर्जा दिली. त्यांनी सामान्य लोकांना समजावून सांगितलं की, बिहारमध्ये एकाही मताची चोरी होऊ नये यासाठी ही यात्रा आहे. त्यांनी थेट प्रात्यक्षिकाद्वारे दाखवलं की, निवडणूक आयोग जिवंत लोकांना मृत घोषित करत आहे, आणि याला त्यांनी ‘वोट चोरी’ असं नाव दिलं. त्यांच्या या यात्रेमुळे वोट चोरी हा शब्द लोकांच्या ओठावर रुळला आहे. (The excitement of the ‘hydrogen bomb’)
यापूर्वी राहुल यांचा ‘चौकीदार चोर’ ही घोषणा दिली होती, ती फारशी यशस्वी झाली नाही, पण यावेळी त्यांनी बिहारमधील यात्रेतून आपली बाजू प्रभावीपणे मांडली. यामुळे निवडणूक आयोगाला वारंवार खुलासे करावे लागले. भाजपलाही आयोगाच्या बचावासाठी पुढे यावे लागले. यात्रेच्या दरम्यान सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कथितपणे शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला. त्याद्वारे विषयाला वेगळे वळण देऊन यात्रेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला. काँग्रेसच्या सदाकत आश्रमावर भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी हल्लाही केला.
राहुल यांनी गावात रात्र काढली, दलित वस्त्यांमध्ये चहा प्यायले, लोकांच्यात मिसळून तेजस्वी यादव यांच्यासोबत मोटरसायकलवरून प्रवास केला. यामुळे सामान्य लोकांना त्यांच्याशी जवळीक वाटली. एकदा त्यांची बहीण, खासदार प्रियांका गांधी, त्यांच्या मोटरसायकलवर बसल्या, आणि ही छायाचित्रे खूप व्हायरल झाली.
तरुणांची गर्दी
राहुल यांनी वोट चोरीबरोबरच जातीय जनगणना आणि आरक्षणाचा मुद्दाही उपस्थित केला. त्यांनी सांगितलं की, त्यांच्या दबावामुळे मोदी सरकारने जातीय जनगणना जाहीर केली, पण ती नीट होणार नाही. इंडिया आघाडी सत्तेत आल्यास जातीय जनगणना करून ५०% आरक्षणाची मर्यादा हटवली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. त्यांनी पंतप्रधान मोदींवर उद्योगपती मित्रांसोबत मिळून देशाची संपत्ती लुटल्याचा आरोप केला. तसेच अग्निवीर योजनेचा मुद्दा उपस्थित करून तरुणांशी जोडण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सभांमध्ये तरुणांची मोठी उपस्थिती दिसली.
यात्रेच्या पहिल्या दिवशी महागठबंधनातील सर्व पक्षांचे नेते एका व्यासपीठावर होते. लालू प्रसाद यांचं छोटं पण प्रभावी भाषण चर्चेचा विषय ठरलं. तेजस्वी यादव यांची लोकप्रियता वाढली, आणि सीपीआय-एमएलचे दीपंकर भट्टाचार्य यांच्या कॅडरच्या उपस्थितीने यात्रेला बळ मिळालं. व्हीआयपीचे मुकेश सहानीही यात्रेत सहभागी झाले. तेलंगणा आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्रीही यात्रेत सहभागी झाले, पण भाजपने त्यांच्यावर बिहारविरोधी असल्याचा आरोप केला.
यात्रेचा परिणाम :
राहुल यांनी यात्रेच्या पहिल्या दिवशी निवडणूक आयोगावर गरीबांची मते चोरल्याचा आरोप केला. हाच रोख त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवला. त्यांनी सांगितलं की, बिहार, महाराष्ट्र, बंगाल आणि आसाममध्ये मतांची चोरी पकडून जनतेसमोर आणली जाईल. निवडणूक आयोगाने शपथपत्र मागितलं, तेव्हा राहुल यांनी भाजपच्या आरोपांवर आयोग शपथपत्र का मागत नाही, असा प्रश्न उपस्थित केला.
यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस आणि महागठबंधनने वोट चोरीचा मुद्दा लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला. बिहारमधील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीसारख्या मोठ्या मुद्द्यांवर अद्याप विरोधकांनी हल्ला सुरू केलेला नाही. त्या पातळीवरील हल्लाही सुरू होईल. परंतु वोट अधिकार यात्रेच्या माध्यमातून राहुल आणि तेजस्वी यांनी जोरदार मुसंडी मारली आहे. देशातील क्रांतीची सुरुवात बिहारमधून होते आणि ही क्रांतीची सुरुवात असल्याचा त्यांचा दावा आहे. बघूया निवडणुकीपर्यंत ते कसे पुढे जातात. शिवाय राहुल गांधी यांचा हायड्रोजन बाँब काय असेल, याचीही उत्कंठा आहेच.