जमीर काझी : मुंबई : महानगरपालिका निवडणुकीत मतदानाच्या एक दिवस आधीपर्यत उमेदवारांना मतदाराच्या घरी जाऊन पैसे बाटण्यासाठी निवडणूक आयोगाने सवलत दिली आहे का? असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी केला. त्याचबरोबर ईव्हीएम मशीन बरोबर जोडल्या जाणाऱ्या ‘पाडू’ मशीनबाबत राजकीय पक्षाना का माहिती दिली नाही, असा सवाल करीत निवडणूक हरलेल्या सरकारला जिंकण्यासाठी आयोग सर्व काम करीत आहे, असा अत्यंत गंभीर आरोपही केला.
मुंबईसह राज्यातील २९ महापालिकासाठी गुरुवारी मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधुनी आज मकरसंक्रांतीनिमित्त आपल्या कुटूंबियासह मुंबादेवीचे दर्शन घेतले.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणूक आयोगाच्या कामाबद्दल तीव्र आक्षेप घेतला.सरकारला अनुकूल काम करत असल्याचा ठपका ठेवत मनसैनिक आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (Raj Thackeray’s question to the Election Commission)
आयोगाच्या मतदानाच्या एक दिवस आधी मतदारांच्या भेटीगाठी घेण्याबाबतच्या नवीन नियमावर प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले की, आम्ही जेवढ्या निवडणुका पाहिल्या त्यात प्रचार संपला की दुसरा दिवस रिकामा असतो आणि तिसऱ्या दिवशी मतदान होते. मात्र आता निवडणूक आयोगाने नवीनच काढली आहे, की दुसऱ्या दिवशी पाच वाजेपर्यंत मतदारांना भेटता येईल, मात्र पत्रके वाटता येणार नाहीत. असा नियम कशासाठी? याचा अर्थ तुम्ही पैसे वाटू शकता असा होतो का?” निवडणूक आयोगाचा हा जुना नियम असेल तर हा नियम लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत का नव्हता? केवळ यावेळी नियम का बदलले जात आहेत, असा प्रश्न विचारला.
पाडू मशिनबाबत राज ठाकरेंकडून संशय
‘पाडू’ (PADU) मशीन बाबत राजकीय पक्षांना सांगितले नाही. मतमोजणीत तांत्रिक बिघाड झाल्यास वापरल्या जाणाऱ्या यंत्रणेवर राज ठाकरेंनी संशय व्यक्त केला. ते म्हणाले,”पाडू नावाचे मशीन आणले आहे, पण ते कोणत्याच राजकीय पक्षाला दाखवलेले नाही. हे मशीन नेमके काय आहे, ते कसे काम करते, हे सांगण्याची तसदीही आयोगाने घेतलेली नाही”, याबाबत स्पष्टीकरण मागण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे, मात्र आयोगाकडून प्रतिसाद मिळालेला नाही. या मशीनमुळे मतदानात गडबड होणार नाही, याची खात्री कोण देणार?
कार्यकर्त्यांना सतर्कतेचा आदेश
राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि युतीमधील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आपल्या बूथमध्ये आणि प्रभागात काय सुरू आहे, याकडे कार्यकर्त्यांनी बारकाईने लक्ष द्यावे. “निवडणूक आयोग सरकारला जे हवे ते करून देण्यासाठी काम करत आहे का? रोज कायदे बदलणे हा काय प्रकार आहे? हारलेली निवडणूक जिंकण्यासाठी सरकारला मदत करण्यासाठी निवडणूक आयोग काम करत असल्याचा आरोप करत ही ‘बेबंदशाही’ असल्याची टीकाही त्यांनी केली.
मतमोजणीप्रसंगी अडचण आली तरच ‘पाडू’चा वापर:आयोगाचा खुलासा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या (बेल) मतदान यंत्राद्वारे झालेल्या मतदानाची मोजणी करताना काही तांत्रिक अडचण आल्यास ‘पाडू’ (Printing Auxiliary Display Unit) या यंत्राचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र पाडूचा वापर सरसकट केला जाणार नाही. तांत्रिक अडचणीच्या प्रसंगी अत्यंत अपवादात्मकरीत्या त्याचा वापर केला जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
ही यंत्रे केवळ बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठीच वापरली जात आहेत. ही यंत्रे भारत निवडणूक आयोगाची असून ती ‘एम3ए’ या प्रकाराची आहेत. त्यात झालेल्या मतदानाची मतमोजणी कंट्रोल युनिटला (सीयू) बॅलेट युनिट (बीयू) जोडूनच करावी, फक्त तांत्रिक अडचण आली तरच अत्यंत अपवादात्मकरीत्या पाडूचा वापर करावा, असे आदेश आयोगाने दिले आहेत. मुंबईत 140 ‘पाडूं’ची उपलब्धता करून देण्यात आली आहे. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत मतमोजणीसाठी पाडूची गरज भासल्यास बेल कंपन्याच्या तंत्रज्ञांच्या उपस्थितीत त्याचा वापर करावा. त्याचबरोबर पाडूच्या वापराबाबत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना या यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्याबाबत आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना प्रात्यक्षिक दाखविले असल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले आहे. (Raj Thackeray’s question to the Election Commission)