मधल्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या चर्चेतून बाजूला फेकला गेलेला कोकण आणि त्यातही विशेषतः सिंधुदूर्ग जिल्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण विरुद्ध राणे कुटुंबीय असा संघर्ष तिथे उफाळून आलाय. या संघर्षाला राणे कुटुंबातील भाऊबंदकीची फोडणी मिळाल्यामुळे कोकणात ख-या अर्थाने शिमगा सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळते.
विजय चोरमारे
कोकणातील ही गोष्ट सुरू होते लोकसभा निवडणुकीपासून. रत्नागिरी मतदारसंघातून भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्यावर सोपवली. रवींद्र चव्हाण हे मूळचे सिंधुदूर्ग जिल्ह्यातील. सावंतवाडी तालुक्यातले केसरी हे त्यांचे मूळ गाव. त्यामुळं त्यांचा सिंधुदुर्गावर विशेष जीव. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेले रवींद्र चव्हाण एका जिल्ह्यात तीन तीन दिवस मुक्काम ठोकतात, असे जे आमदार निलेश राणे म्हणतात, यावरून त्याची कल्पना यावी.
लोकसभा निवडणुकीपासून राणे, चव्हाण गटात कुरबुरी
तर लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रत्येक जागेसाठी मोठा फंड उपलब्ध करून दिला होता. आपल्याला आठवत असेल की रत्नागिरीत अखेरच्या आठवड्यापर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विनायक राऊत यांच पारडं जड होतं. पण अखेरच्या आठवड्यात चित्र बदललं. भाजपच्या ताकदीपुढं विनायक राऊत टिकू शकले नाहीत. आता त्याचे आकडे वेगवेगळे सांगतात. कोण म्हणतं साठ कोटी. कोण म्हणतं पन्नास कोटी. (Rane vs Chavan)
तर हे सगळं नियोजन रवींद्र चव्हाण यांच्या हातात होते. जे वाटप करायचं त्या गाडीत त्या त्या भागातले राणे समर्थक असायचे. त्यांच्या सूचनेनुसार वाटप व्हायचं. पण सगळे अधिकार रवींद्र चव्हाण यांच्याकडे होते. याचा अर्थ काय तर पक्षाकडून आलेला निधी राणेंच्या हातात दिला नाही. तिथून कुरबुरी सुरू झाल्या असं म्हणतात. रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचा आदेश मानून राणेंसाठी मनापासून काम केलं. नारायण राणे निवडून आले. पण नंतर त्यांना मंत्रिमंडळात घेतले नाही, हीसुद्धा वस्तुस्थिती.
नारायण राणे ज्या पक्षात जातात तिथं त्यांचे कार्यकर्ते आणि मूळचा पक्ष अशी काहीशी दुफळी असतेच. भाजपमध्येही असंच सुरू राहिलं. रवींद्र चव्हाण समर्थक आणि राणे समर्थक असे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचे दोन गट तयार झाले. (Rane vs Chavan)
राणे कुटुंबाची सबुरी
लोकसभा निवडणुकीच्या वेळी तेढ वाढली होती. परंतु नारायण राणेंच्या दोन्ही मुलांना विधानसभा लढवायची होती. त्यामुळे राणे कुटुंबीयांनी सबुरीने घेतले. नितेश राणे यांची कणकवलीतील तिसरी टर्म होती. त्याचवेळी निलेश राणे यांनाही उमेदवारी हवी होती. परंतु घराणेशाही विरुद्ध बोंब मारणा-या भाजपसाठी ते अडचणीचे होते. त्यामुळे निलेश राणे यांना एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पाठवून घराणेशाहीची तीव्रता कमी करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीत नितेश आणि निलेश दोन्ही राणे बंधू निवडून आले. मात्र सरकार स्थापनेनंतर शिंदे सेनेचे बुरे दिन सुरू झाले. एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेले मुख्यमंत्रिपद मिळाले नाही. उपमुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर त्यांची सतत उपेक्षा करण्यात आली. एकनाथ शिंदे यांचे रुसवे फुगवे, दिल्लीवा-या यातून त्याचे दर्शन घडू लागले.आणि या सगळ्याचे पडसाद एकत्रितपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटले.
सिंधुदुर्ग जिल्हयात भाजप, शिवसेनेचे फाटले
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड या सगळ्या ठिकाणी महायुती आहे. तिथे भाजपने कमी जागा घेऊन तडजोड केली आहे. भाजपने कमीपणा घेऊन महायुती केली आहे. शिंदे सेनेला जागा सोडल्या आहेत. मात्र सिंधुदुर्गमध्ये पक्षाचे धोरण बदललेले दिसते.
सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले या नगरपरिषदा आणि कणकवली नगरपंचायत या सगळ्या ठिकाणी महायुतीचे फाटले आहे. कणकवली नगरपंचायतीच्या १७ जागा. तिथे वेगळाच प्रयोग – नितेश राणे आणि भाजप विरोधात सर्वपक्षीय शहर विकासआघाडी. त्यात ठाकरे आणि शिंदेसेनेसह सगळे पक्ष एकत्र आले आहेत. सगळे लढणार शहर विकास आघाडीच्या नावाखाली, तेही भाजप विरोधात.मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ल्यात सगळे पक्ष वेगवेगळे लढत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती न होण्यासाठी रवींद्र चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. प्रचंड आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत, पण एरव्ही माध्यमांसमोर येऊन बोलणारे नारायण राणे अद्याप तरी गप्प आहेत. (Rane vs Chavan)
केसरकरांची चुपकी
यात आणखी एक गंमत म्हणजे दीपक केसरकर हे शिंदे सेनेचे आघाडीचे प्रवक्ते होते. अगदी शिवसेनेतल्या फुटीपासून. परंतु सिंधुदुर्गात भाजपने केलेल्या राजकारणाबद्दल केसरकरांनी अद्याप तोंड उघडलेले नाही. केसरकर धूर्त असल्यामुळे त्यांनी भविष्यातले राजकारण ओळखले असावे. नजिकच्या काळात त्यांची पावले भाजपकडे वळली तर आश्चर्य वाटायला नको, असं सिंधुदुर्गातले लोक म्हणतात.
निलेश राणेंकडून थेट रवींद्र चव्हाण टार्गेट
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्यावतीने एकटे निलेश राणे भाजपला अंगावर घेताहेत. थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना टार्गेट करताहेत. त्यातूनच भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावरील धाडीचा प्रकार घडला.
निलेश राणे थेट केनवडेकर यांच्या घरी शूटिंग करीतच पोहोचले. थेट बेडरूम पर्यंत. तिथे पैशांची बॅग सापडली. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. रवींद्र चव्हाण यांनी हे पैसे पोहोचवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी पोलीस आणि निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे. रवींद्र चव्हाण येऊन जातात तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
ज्याच्या घरात निलेश राणेंना मोठी रक्कम सापडली, त्याच्याच घरी नितेश राणे गेले. पैसे व्यवसायाचे असू शकतात असे सांगून त्यांनी भावाचा दावा खोडून काढला. ‘हमाम में सब नंगे’ असल्याचे सांगितले. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
इथे मात्र नितेश राणे यांनी निलेश राणे यांच्यावर थेट टीका करणे टाळले. मात्र जिथे निलेश गेले तिथेच नितेश यांना पाठवण्याची खेळी भाजपकडून खेळण्यात आली, हेही इथे लक्षात घ्यायला पाहिजे.एकूण चित्र पाहिल्यानंतर कोकणातील राजकीय संघर्ष गंभीर वळणावर पोहोचल्याचे दिसून येते.
राणे कुटुंबाची भाऊबंदकी चव्हाट्यावर
हा संघर्ष एकीकडे रवींद्र चव्हाण विरुद्ध राणे कुटुंबीय यांच्यातला आहेच. शिवाय नारायण राणे यांच्या कुटुंबातील भाऊबंदकीही यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे.नितेश राणे गेल्या काही काळात जोमात आहेत. हिंदुत्वाची अतिरेकी भूमिका घेऊन धार्मिक विद्वेष पसरवण्याचे काम करतात. देवेंद्र फडणवीस त्यांना प्रोत्साहन देत आहेत. आपल्या प्रगतीचा हाच राजमार्ग असल्याचे त्यांना वाटत आहे. परंतु नारायण राणे यांना भाजपने उद्धव ठाकरे यांच्याविरोधात शस्त्रासारखे वापरून घेतले. आता त्यांची अवस्था भाजपने काय करून टाकली आहे, याचे भान त्यांना दिसत नाही.
महायुतीची बोट सिंधुदुर्ग समुद्रात बुडणार?
या सगळ्या गदारोळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे विधान चर्चेत आहे. जळगाव दौ-यावर असलेल्या रवींद्र चव्हाण यांना निलेश राणे यांनी केलेल्या आरोपांबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर बोलताना, मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची आहे. त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही. मी नंतर यावर भाष्य करेन, असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं आहे.
त्यामुळे दोन डिसेंबरनंतर भाजपकडून महायुतीची बोट सिंधुदुर्गच्या समुद्रात बुडवली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयातील जानेवारीत होणा-या सुनावणीशी त्याचा संदर्भ असल्याचे बोलले जाते.बघूया काय काय होतं.