Home » Blog » देशभरातील विमानतळांवर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती

देशभरातील विमानतळांवर रेल्वे स्टेशनसारखी स्थिती

by प्रतिनिधी
0 comments
Railway station-like situation at airports across the country

दिल्लीः प्रतिनिधी :  देशभरातील महत्वाच्या अनेक मोठ्या विमानतळांवरून चिंताजनक बातम्या येत आहेत. प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट होताना दिसत असून अनेक प्रवासी अगतिकपणे विनवण्या करताहेत. अनेक प्रवाशी हताश झालेले दिसत आहेत.  इंडिगोच्या काऊंटरवरची दृश्यं विलक्षण आहेत. तिथले कर्मचारीही हतबल झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

इंडिगो कंपनीला मोठ्या ऑपरेशनल अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेकडो विमानांना उशीर होत आहे. किंवा उड्डाणं रद्द होत आहेत. हजारो प्रवासी विमानतळांवर अडकून पडले आहेत. विमानतळावर दिसणारं नेहमीचं चैतन्यदायी आणि उत्साहवर्धक वातावरण कुठंच दिसत नाही. अगदी सणासुदीच्या काळात रेल्वे स्टेशनवर दिसतं, तशी दृश्यं विमानतळावर दिसताहेत.

विमानतळांवरचा हा गोंधळ संसदेपर्यंत

विमानतळांवरचा हा गोंधळ संसदेपर्यंत पोहोचलाय. संसदेच्या अधिवेशनात शुक्रवारी विरोधकांनी हा मुद्दा जोरदारपणे  मांडला. नागरी उड्डयनमंत्री स्वतः परिस्थितीचा अभ्यास करीत असल्याचे सरकारने सांगितले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले असून, उद्योगातील एकाधिकारशाही जोपासल्याचे हे परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Railway station-like situation at airports across the country)

अराजकतेमागचे मुख्य कारण काय?

  इंडिगो कंपनीच्या विमानांबाबत ही परिस्थिती निर्माण झाली आहे. “अनपेक्षित ऑपरेशनल अडचणींमुळे” ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे इंडिगो कंपनीने म्हटले आहे. या अनपेक्षित अडचणींमध्ये- किरकोळ तांत्रिक समस्या, हिवाळ्यातील वेळापत्रकातील बदल, प्रतिकूल हवामान, वाढती हवाई वाहतूक आणि नवीन क्रू रॉस्टरिंग नियम (एफडीटीएल ) लागू होणे या बाबींचा समावेश असल्याचे म्हटले आहे. अर्थात यातला सर्वात मोठा मुद्दा आहे तो नवीन क्रू रॉस्टिंग नियमांचा म्हणजे एफडीटीएल नियमांचा.

एफडीटीएल म्हणजे काय?

  जानेवारी २०२४ मध्ये डीजीसीए ने फ्लाइट क्रूसाठी नवीन नियम लागू केले. पायलट आणि केबिन क्रूना अधिक विश्रांती मिळावी आणि प्रवासी सुरक्षा वाढावी यासाठी हे नियम लागू केले. या बदलांनुसार: साप्ताहिक विश्रांती वाढवली. रात्रीच्या ड्युटीचे तास कमी केले. रात्रीच्या लँडिंगला मर्यादा ठेवली. शिवाय पायलट, क्रूना एका रॉस्टरमध्ये फक्त दोन वेळा रात्रीची शिफ्ट द्यायची ठरले. जी आधी सहा वेळा होती. नियम लागू झाल्यानंतरही अनेक एअरलाइन्स आपल्या जुन्या शेड्यूलवरच चालत राहिल्या. त्यामुळे उड्डाणांना उशिर होण्याचे तसेच उड्डाणे रद्द होण्याचे प्रमाणही वाढले. (Railway station-like situation at airports across the country)

लोकसभेत राहूल गांधींचा आरोप

राहुल गांधी यांचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्सवर लिहिले आहे की,  “इंडिगोची ही स्थिती म्हणजे सरकारच्या एकाधिकार मॉडेलचा परिणाम आहे. त्याची शिक्षा सामान्य भारतीयांना भोगावी लागत आहे. विमानांना उशीर होणे, उड्डाणे रद्द होणे आणि परिणामी प्रवाशांना लाचार व्हावे लागत आहे.देशात बऱ्याच क्षेत्रांमध्ये एकच कंपनी वर्चस्व गाजवत आहे, आणि त्याचे अनिष्ट परिणामही आता दिसू लागले आहेत. (Railway station-like situation at airports across the country)

बहुतेक देशांतर्गत मार्गांवर इंडिगोचे नियंत्रण आहे. विमानतळांचे व्यवस्थापन अदानी समूहाकडे आहे.एअर इंडिया टाटा समूहाकडे गेले आहे.

इंडिगो नवीन नियमांपासून पळ का काढत आहे?

 डीजीसीए  आणि इंडिगो यांच्यात एक बैठक झाली. त्या बैठकीत एअरलाइनने मान्य केले की एकडीटीइल  चा अचूक अंदाज आला नाही. शिवाय खराब नियोजनाचाही फटका बसला आहे. नवीन नियम लागू झाल्याने क्रू उपलब्धतेत कमालीची घट झाली.

इंडिगोने डीजीसीए  कडे — ए३२० विमानांसाठी रात्रीच्या ड्युटी आणि लँडिंगवरील मर्यादांना तात्पुरती सूट द्यावी, अशी विनंती केली आहे. डीजीसीए  ने अद्याप परवानगी दिलेली नाही, पण काही प्रमाणात सवलत मिळण्याची शक्यता आहे. एअरलाइनला काही अतिरिक्त निर्देशही दिले आहेत. त्यामध्ये दर पंधरा दिवसांनी प्रगती अहवाल सादर करावयाचा आहे. नवीन क्रू भरती योजना जाहीर करायची आहे.  परिस्थिती हाताळण्यासाठी सविस्तर योजना सादर करावयाची आहे.

 इंडिगोवर सर्वाधिक परिणाम का?

भारतातील बहुतेक देशांतर्गत उड्डाणे इंडिगोची आहेत. इंडिगो कंपनीच्या दररोज २२०० पेक्षा जास्त फ्लाइट्स — देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर उड्डाण करतात. ही संख्या एअर इंडियापेक्षा जवळपास दुप्पट आहे. इतक्या मोठ्या नेटवर्कमध्ये जर १० ते २० % उड्डाणांचे गणित  बिघडले, तर त्याचा परिणाम— सुमारे दोनशे ते चारशे फ्लाइट्सवर आणि हजारो प्रवाशांवर होतो. त्यातही पुन्हा इंडिगोची बहुतेक उड्डाणे रात्रीची असल्याने नवीन नियमांचा सर्वाधिक फटका इंडिगोला बसतो.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00