जमीर काझी : मुंबई : महायुती सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ दिल्याने , शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार प्रहार केला आहे. “महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीचीच असेल,” अशी गर्जना करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या त्या घोषणेचे ‘म्यांव’ का झाले? असा बोचरा सवाल करीत मराठीच्या मुद्द्यावर तडजोड करणे महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्यासारखे असल्याची टीका त्यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. (Sanjay Raut criticizes Fadnavis)
परप्रांतीय चालकांना खडे बोल सुनावताना ते म्हणाले की, “तुम्ही या शहरात रोजीरोटी कमवण्यासाठी येता. रिक्षात बसणारा बहुतांश प्रवासी हा मराठी असतो, त्यामुळे संवाद साधताना गैरसमज होऊन वाद किंवा मारामाऱ्या टाळण्यासाठी तुम्हाला मराठी येणे तुमच्याच सोयीचे आहे. पण या मुद्द्यावर सरकारला आव्हान देणारी भाषा करणे म्हणजे थेट महाराष्ट्राला आव्हान देण्यासारखे आहे.” सरकारने याबाबत एक मे पासूनच कडक नियम बनवून ज्यांना मराठी येत नाही त्यांना सहा महिन्यांची मुदत द्या, पण सक्ती मागे घेऊ नका. मराठी ही अत्यंत सोपी, सरळ आणि रसाळ भाषा आहे, ती शिकणे कठीण नाही, असेही त्यांनी नमूद केले. (Sanjay Raut criticizes Fadnavis)
मराठीच्या प्रश्नावर जर सरकार एक पाऊल मागे हटत असेल, तर ज्या मंत्र्यांनी हा विषय सुरू केला त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे. जर हे मंत्री खरोखर स्वाभिमानी आणि मराठी प्रेमी असतील, तर प्रताप सरनाईक यांनी लाज बाळगत सी.डी. देशमुखांप्रमाणे पदाचा त्याग करून मराठीसाठी लढायला हवे,” असे आव्हान देत राऊत यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही राऊत यांनी निशाना साधताना केईएम रुग्णालय काही लोढांनी बांधले नाही, ते केवळ आरएसएसचा अजेंडा पुढे रेटत असल्याचा गंभीर आरोप केला. (Sanjay Raut criticizes Fadnavis)