Home » Blog » Rijiju on Lama: दलाई लामा हेच उत्तराधिकारी ठरवू शकतात : रिजिजू

Rijiju on Lama: दलाई लामा हेच उत्तराधिकारी ठरवू शकतात : रिजिजू

by प्रतिनिधी
0 comments
Rijiju on Lama

नवी दिल्ली : केवळ दलाई लामा आणि त्यांनी स्थापित केलेल्या परंपराच त्यांचा उत्तराधिकारी ठरवू शकतात, अशी स्पष्ट भूमिका केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी गुरुवारी (३ जुलै) जाहीर केली. यानिमित्ताने भारताने पहिल्यांदाच आपली अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. (Rijiju on Lama)

‘‘दलाई लामांचे अनुयायी असलेल्या सर्वांना वाटते की अवतार हा स्थापित परंपरा आणि दलाई लामांच्या स्वतःच्या इच्छेनुसार ठरवला पाहिजे. त्यांच्या आणि विद्यमान परंपरांशिवाय इतर कोणालाही तो ठरवण्याचा अधिकार नाही,’’ असे रिजिजू म्हणाले.

तिबेटी बौद्धांचे आध्यात्मिक प्रमुख दलाई लामा यांच्या पुढील अवताराची वैधता आणि उत्तराधिकारी नियुक्तीच्या मुद्द्यावर भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली. केवळ सध्याचे दलाई लामा (त्या परंपरेत १४ वे) आणि त्यांनी स्थापित केलेल्या परंपराच पुढील अवतार निश्चित करू शकतात, असे म्हटले आहे.(Rijiju on Lama)

केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री, किरेन रिजिजू स्वतः बौद्ध आहेत. त्यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे भारताने चीनच्या भूमिकेला स्पष्टपणे विरोध दर्शवल्याचे मानले जात आहे.

‘‘दलाई लामा ही बौद्धांसाठी सर्वांत महत्त्वाची आणि परिभाषित संस्था आहे,’’ असे ते म्हणाले.(Rijiju on Lama)

बुधवारी (२ जुलै) दलाई लामा यांनी, दलाई लामांची संस्था सुरू राहील आणि त्यांच्या भविष्यातील पुनर्जन्माला मान्यता देण्याचा अधिकार फक्त गादेन फोडरंग ट्रस्टलाच असेल, असे म्हटले होते. ६ जुलै रोजी येणाऱ्या दलाई लामांचा ९० वा वाढदिवस आहे. त्यांचा  उत्तराधिकारी निवडण्याच्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर हे विधान करण्यात आले. विशेषतः तिबेटवरील नियंत्रणामुळे चीनने उत्तराधिकारी घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. तथापि, दलाई लामांची संस्था त्यांच्यासोबतच संपेल किंवा चीनला पुढील अवतार ठरवण्याची मोकळीक असेल या अटकळींना दलाई लामांच्या विधानाने पूर्णविराम दिला आहे.

दलाई लामा यांच्या विधानावर चीनने संताप व्यक्त केला आहे. चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी असे म्हटले की दलाई लामांचा पुनर्जन्म परंपरेनुसार ‘‘सोन्याच्या कलशातून चिठ्ठ्या काढून निवडला पाहिजे आणि (चीनच्या) केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली पाहिजे.’’

तिने असेही म्हटले की, ‘‘धार्मिक श्रद्धेच्या स्वातंत्र्याचे धोरण राबवणाऱ्या’’ चीन सरकारला ‘‘धार्मिक बाबींवर आणि तिबेटी जिवंत बुद्धांच्या पुनर्जन्माचे व्यवस्थापन करण्याच्या पद्धतींवर नियम’’ लादण्याचा अधिकार आहे.(Rijiju on Lama)

श्री. रिजिजू यांचे विधान चीनच्या भूमिकेचे खंडन करणारे आहे. ते दलाई लामा यांच्या वाढदिवसाच्या समारंभाला उपस्थित राहणार आहेत. बिहारमधील खासदार असलेले त्यांचे कॅबिनेट सहकारी राजीव रंजन सिंग ‘लल्लन’ हेही या समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा :
ल्हामो धोंडूपचा दलाई लामा कसा झाला?
भारतीय पासपोर्टच्या प्रतिष्ठेची कहाणी

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00