बौद्ध धर्माचे आध्यात्मिक प्रमुख दलाई लामा ६ जुलै रोजी ९० वर्षांचे होत आहेत. दलाई लामा हे त्यांचं नाव नसून एक पद आहे. ते १४ वे दलाई लामा आहेत. त्यांचं खरं नाव आहे ल्हामो धोंडुप. (Dalai Lama’s life)
-महाराष्ट्र दिनमान ऑनलाईन डेस्क
दलाई लामा स्वतःला जरी एक सामान्य भिक्षू म्हणत असले, तरी गेल्या ६० हून अधिक वर्षांपासून ते दृढ विश्वासाने तिबेटमधील लोक आणि त्यांचे हितसंबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर जिवंत ठेवण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या या मिशनची केंद्रभूमी भारतच राहिली आहे. (Dalai Lama’s life)
दलाई लामा हे त्यांचं नाव नसून एक पद आहे. ते १४ वे दलाई लामा आहेत. त्यांचं खरं नाव आहे ल्हामो धोंडुप. १९५९ मध्ये चिनी सत्तेविरुद्ध उठाव अयशस्वी झाल्यानंतर, हजारो तिबेटींना भारतात निर्वासित व्हावं लागलं. दलाई लामा यांनीही इथेच आश्रय घेतला. त्यांनी तिबेटी जनतेसाठी स्वायत्तता आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या मागणीसाठी अहिंसक “मध्यम मार्गा”ची वकिली केली. त्यांच्या कार्यासाठी १९८९ मध्ये त्यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळवला.
त्यांची वाढती लोकप्रियता चीनला अस्वस्थ करत आली आहे. चीन त्यांना एक धोकादायक फुटीरतावादी नेता मानतो. कम्युनिस्ट पार्टीच्या एका माजी नेत्याने त्यांना “कोल्हा” आणि “पशुहृदयाचा मनुष्य” असेही म्हटले होते. (Dalai Lama’s life)
दलाई लामा रविवारी ९० वर्षांचे होतील. त्यांचा हा वाढदिवस जगभरात विशेष मानला जात आहे. त्या दिवसाकडे सगळ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण त्यांनी संकेत दिले आहेत की त्या दिवशी ते त्यांच्या संभाव्य उत्तराधिकाऱ्याची घोषणा करू शकतात. (Dalai Lama’s life)
तिबेटी परंपरेनुसार, मोठ्या भिक्षूचा आत्मा मृत्यूनंतर एखाद्या बालकात पुनर्जन्म घेतो. आणि पुढचा दलाई लामा म्हणून ओळखला जातो.
या निमित्ताने दलाई लामांना तिबेट का आणि कशा परिस्थितीत सोडावं लागलं आणि भारताने त्यांना कसा आश्रय दिला, हे जाणून घेऊया. (Dalai Lama’s life)
दलाई लामांचा जन्म १९३५ मध्ये ल्हामो धोंडुप या नावाने एका शेतकरी कुटुंबात झाला. सध्या हा भाग चीनच्या किंघई प्रांतात आहे. दोन वर्षांचे असतानाच, एका शोध पथकाने त्यांना तिबेटच्या आध्यात्मिक आणि धर्मिक नेत्याचा १४ वा अवतार म्हणून मान्यता दिली.
१९५० मध्ये चीनने तिबेटवर कब्जा केला, ज्याला त्यांनी “शांतिपूर्ण मुक्ती” म्हटले. दरम्यान किशोरवयातील दलाई लामांना राजकीय भूमिका घ्यावी लागली. ते बीजिंगला माओ त्से तुंग आणि इतर चिनी नेत्यांशी भेटायला गेले. पण ९ वर्षांनंतर, त्यांच्या अपहरणाचा धोका वाटू लागल्यामुळे तिबेटमध्ये मोठा उठाव झाला. चिनी सैन्याने ही बंडखोरी दडपून टाकली. (Dalai Lama’s life)
१० मार्च १९५९ रोजी, २३ वर्षीय दलाई लामांना एका चिनी जनरलने डान्स परफॉर्मन्ससाठी आमंत्रित केले. पण कोणत्याही अंगरक्षकांशिवाय येण्याची अट घातली. त्यामुळे तिबेटींना दलाई लामांच्या अपहरणाचा संशय आला. त्या दिवशी हजारो तिबेटी भक्त त्यांच्या महालाच्या बाहेर एकवटले आणि निषेध करू लागले. अफवा पसरल्या की चिनी सैन्य कधीही महालावर कब्जा करू शकते. (Dalai Lama’s life)
१७ मार्च १९५९ च्या रात्री, सैनिकाच्या वेषात दलाई लामा, त्यांचे कुटुंब आणि काही वरिष्ठ अधिकारी महालातून पळून गेले. त्यांनी आधीच भारताच्या ल्हासा वाणिज्यदूतांमार्फत भारताकडे शरण मागितली होती. भारताने त्यांचे उत्साहाने स्वागत केले.
भारताने नेहमीच तिबेटला एक स्वतंत्र राष्ट्र मानले होते. त्याच्याशी मजबूत व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध ठेवले होते. पण १९५४ मध्ये भारत-चीन पंचशील करारानंतर भारताने तिबेटला ‘चीनचा एक भाग’ म्हणून मान्यता दिली.
ल्हासातून निघाल्यानंतर दलाई लामा आणि त्यांच्या अनुयायांनी हिमालय व ब्रह्मपुत्र पार केली आणि २६ मार्च १९५९ रोजी भारताच्या सीमेवर पोहोचले. तेथून त्यांनी पंडित नेहरूंना पत्र लिहून शरणागती मागितली. भारताने त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था केली. त्यांचा ताफा प्रथम अरुणाचल प्रदेशातील तवांग मठात थांबला. मसूरी येथे नेहरूंशी भेटीनंतर भारताने ३ एप्रिल १९५९ रोजी त्यांना अधिकृत शरण दिली.
हिमाचल प्रदेशातील धरमशाला हे शहर आधीच अनेक निर्वासित तिबेटींचं निवासस्थान बनलं होतं. दलाई लामा तिथे स्थायिक झाले आणि निर्वासित तिबेटी सरकारची स्थापना केली. चीनने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
दलाई लामांनी चीनशी संवाद ठेवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण फारसे यश मिळाले नाही. १९८८ मध्ये त्यांनी पूर्ण स्वातंत्र्याचा आग्रह सोडून, चीनच्या अंतर्गत सांस्कृतिक आणि धार्मिक स्वायत्ततेची मागणी केली.
२०११ मध्ये त्यांनी आपली राजकीय जबाबदारी सोडून दिली ती निर्वासित तिबेटी सरकारमधील एका नेत्याकडे सोपवली. मात्र ते आजही सक्रिय आहेत. पारंपरिक केशरी वस्त्र घालून ते अनेक पाहुण्यांच्या भेटी घेत असतात. वयोमानानुसार गुडघ्यांच्या त्रासामुळे त्यांना चालण्याच्या अडचणी आहेत. तरीही ते दीर्घायुष्याची अपेक्षा बाळगून आहेत. डिसेंबरमध्ये त्यांनी रॉयटर्सशी केलेल्या संवादामध्ये, “माझ्या स्वप्नानुसार, मी ११० वर्षांपर्यंत जगू शकतो.” असे म्हटले आहे.
दलाई लामा यांना दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या शांततेच्या मार्गाने चाललेल्या लढ्यासाठी शुभेच्छा!