कोल्हापूर : प्रतिनिधी : भाई माधवराव बागल पुरस्कार महाराष्ट्र दिनमानचे मुख्य संपादक, ज्येष्ठ विचारवंत, राजकीय समीक्षक व निर्भिड पत्रकार विजय चोरमारे यांना जाहीर झाला आहे. गुरुवारी २८ मे रोजी राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाल, फेटा, गौरवपत्र, स्मृती चिन्ह, रोख पाच हजार रुपये, माधवराव बागल चरित्र प्रत असे पुरस्काराचे स्वरुप आहे. (Madhavrao Bagal Award Announced for Dr. Vijay Chormare)
भाई माधरावजी बागल विद्यापीठाचे अध्यक्ष अड अशोकराव साळुंखे, कार्याध्यक्ष टी.एस. पाटील यांनी पत्रकार परिषदेत पुरस्काराची माहिती दिली. गुरुवारी २८ मे रोजी भाई माधवराव बागल यांची १३० वी जयंती आहे. शाहू मिल चौकातील भाई बागल यांच्या पुतळ्याला सकाळी साडेनऊ वाजता अभिवादन करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता भाई माधवराव बागल पुरस्काराचे वितरण होणार आहे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. विजय चोरमारे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.डॉ. चोरमारे यांचा वृत्तपत्रसृष्टीतील प्रदीर्घ अनुभव असून ते चौफेर लिखान करत आहेत. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक या विषयांवर त्यांनी सडेतोड लिखान केले आहे. दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, दैनिक प्रहार, दैनिक महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रात त्यांनी काम केले आहे. स्वतंत्र बाण्याचे महाराष्ट्र दिनमानचे ते संपादक आहेत. राजकीय, सामाजिक विषयावर ते निर्भिडपणे आपली मते व्यक्त करतात. (Madhavrao Bagal Award Announced for Dr. Vijay Chormare)
पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांना १९९२ पासून दरवर्षी पुरस्काराचे वितरण केले जाते. यापूर्वी कॉ.संतराम पाटील, चित्रकार गणपतराव वडणगेकर, प्रा. एन.डी.पाटील, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ.गोविंद पानसरे, कॉ. यशवंत चव्हाण, दलितमित्र बापूसाहेब पाटील, पद्मश्री कुमार केतकर, क्रांतीसिंह नागनाथअण्णा नायकवडी, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, निळू फुले, डॉ. आ.ह.साळुंखे, प्रा. डॉ. सुनीलकुमार लवटे, पद्मश्री लक्षण माने, आचार्य शांतराम गरुड, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, सुरेश शिपुरकर, उल्का महाजन, शमशुद्दीन मुश्रीफ, किशोर बेडकीहाळ, पुष्पा भावे, डॉ. भारत पाटणकर, कॉ. आनंद मेणसे, प्रसाद कुलकर्णी, लोकमतचे वसंत भोसले, निरंजन टकले आनंदराव बहिर्जी पाटील यांना आजवर बागल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. (Madhavrao Bagal Award Announced for Dr. Vijay Chormare)
डॉ. विजय चोरमारे यांचा परिचय
विजय चोरमारे हे गेली चार दशके पत्रकारितेमध्ये आहेत. केसरी, सकाळ, लोकमत, प्रहार, महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमधून वार्ताहरापासून संपादकापर्यंत विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. सध्या ते ‘महाराष्ट्र दिनमान’ या यू ट्यूब आणि वेब पोर्टलचे संपादक आहेत. राजकीय विश्लेषक म्हणून मराठी, हिंदीतील नामवंत वृत्तवाहिन्यांवरून आपली मते ठोसपणे व्यक्त करीत असतात. गेल्या काही वर्षांमध्ये प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे होत असताना पत्रकारितेमध्ये ठाम भूमिका घेऊन काम करणारे मोजके पत्रकार आहेत, त्यामध्ये विजय चोरमारे यांचा समावेश होतो. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेशी बांधिलकी मानून काम करणारे पत्रकार-साहित्यिक आणि कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. कोल्हापूरसह महाराष्ट्रातील तळागाळातील घटकांच्या, उपेक्षितांच्या लढायांना पाठबळ देण्यामध्ये अग्रेसर असतात. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या माध्यमातून गेली वीस वर्षे या परिसरातील साहित्य चळवळ पुरोगामी विचारधारेने प्रवाही ठेवण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
त्यांचे चार कवितासंग्रह प्रकाशित आहेत. भाई माधवराव बागल विद्यापीठासाठी त्यांनी ‘कोल्हापूरः आर्थिक प्रवाह’ ( नाना गद्रे स्मृतिग्रंथ) आणि ‘स्वातंत्र्योतर महाराष्ट्रातील परिवर्तन’ (बाबूराव धारवाडे गौरव ग्रंथ) या दोन ग्रंथांचे संपादन केले आहे. याशिवाय चार कवितासंग्रह, एक अनुवादित कवितासंग्रह प्रकाशित आहे. ‘कर्तृत्ववान मराठा स्त्रिया’, ‘महाराष्ट्राचे राजकारणः नवे प्रवाह’, ‘शरद पवार आणि महाराष्ट्र हे संपादित ग्रंथ आहेत. ‘संभ्रमित काळाच्या नोंदी’ हे मोदीकाळातील घटनांच्या विश्लेषणाचे पुस्तक प्रसिद्ध आहे. अभिनेते चंद्रकांत मांडरे, शाहीर पिराजीराव सरनाईक, डॉ. डी. वाय. पाटील आणि प्रा. एन. डी. पाटील यांच्या आत्मचरित्रांचे शब्दांकन करून महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दस्तावेजीकरणाचे महत्त्वाचे काम केले आहे. ‘बाबूराव पेंटर यांचे भारतीय चित्रपटाच्या विकासातील योगदान’ या विषयावर त्यांना सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची पीएच. डी. मिळाली आहे. पत्रकारितेसाठी तसेच कवितेसाठी त्यांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार तसेच फेलोशिप मिळाल्या आहेत.