Home » Blog » Raj Thackeray’s opposition to tree cutting : उद्योगपतींच्या घशात जमीन घालण्याचा संधीसाधूपणा करु नका : राज ठाकरे

Raj Thackeray’s opposition to tree cutting : उद्योगपतींच्या घशात जमीन घालण्याचा संधीसाधूपणा करु नका : राज ठाकरे

by प्रतिनिधी
0 comments
Raj Thackeray's opposition to tree cutting

मुंबई : प्रतिनिधी : नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी साधुग्राम निर्माण करण्यासाठी तपोवनमधील १८०० झाडे तोडण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावर नाशिककर, पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी एकवटले आहेत. अभिनेते सयाजी शिंदेही झाडे वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. काल शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही टीका केली होती. आता मनसेही वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी सरसावली असून मनसे प्रमख राज ठाकरे यांनी सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये, अशी टीका केली आहे.

कुंभमेळ्यासाठी झाडे का तोडताय?

राज ठाकरे यांनी सोशल मिडियावर एक्स पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की,  आगामी कुंभमेळ्यासाठी सरकारने १८०० झाडं तोडण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिकमध्ये कुंभमेळा हा काही पहिल्यांदा होत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महापालिकेच्या सत्ताकाळात पण कुंभमेळा झाला. त्यावेळेला आम्ही भरपूर पायाभूत सुविधा उभारल्या. त्यावेळच्या नगरसेवकांचा आणि प्रशासनाचा उत्तम संवाद होता, त्यामुळे कामं करताना जनतेला काय हवं आहे याचा विचार केला गेला.  एकूणच नियोजन इतकं उत्कृष्ट होतं की तेव्हाच्या महापौरांचा,नगरसेवकांचे प्रतिनिधी म्हणून  आणि तत्कालीन आयुक्तांचा, प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून, थेट अमेरिकेत सत्कार झाला होता. आम्हाला या पायाभूत सुविधा उभ्या करताना कुठली झाडं तोडावी लागली नाहीत. मग आत्ता या कुंभमेळ्यासाठी झाडं का तोडावी लागत आहेत ? (Raj Thackeray’s opposition to tree cutting)

उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करतायेत मंत्री

बरं ही झाडं तोडून त्याची भरपाई म्हणून दुसरीकडे झाडं लावली जातील, असली पोकळ आश्वासनं सरकारने देऊच नयेत कारण असं कधी होत नाही. आणि सरकारकडे जर दुसरीकडे पाचपट झाडं लावायला जागा आहे तर मग तिकडेच साधुग्राम करा. सरकारने साधूंच्या नावाखाली उद्योगपतींच्या घशात काहीतरी टाकण्याचा संधिसाधूपणा करू नये. आणि काही कोटी झाडं लावल्याची घोषणा भाजप सरकारने काही वर्षांपूर्वी केली होती, जी झाडं कुठे दिसली नाहीत. असो. आज कुंभमेळ्याचं कारण दाखवून झाडं तोडायची, साधूंच्या नावाने ती जमीन सपाट करून घ्यायची आणि मग नंतर पुढे ती आपल्या लाडक्या उद्योगपतीला दान करायची ! इतकाच विचार या सरकारचा असणार ! नाहीतरी सध्या महाराष्ट्रात दुसरं काय सुरू आहे ? जमिनी गिळणं नाहीतर उद्योगपतींचे दलाल म्हणून काम करणं हेच सध्या सत्ताधारी मंत्री, आमदार , त्यांचे नातेवाईक आणि त्यांची वर्तुळं करताना दिसतायत ! (Raj Thackeray’s opposition to tree cutting)

नाशिककरांच्या पाठीशी मनसे ठाम राहणार

 नाशिककरांचा या वृक्षतोडीला तीव्र विरोध आहे. नाशिकरांना माझं आवाहन आहे की तुम्ही ठाम रहा, तुमच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी राहील. यामध्ये खरतर कोणतेच राजकारण नाही , या आत्ता होणाऱ्या निवडणुकांनंतर देखील आमचा या वृक्षतोडीला विरोधच राहील ! माझं सरकारला आवाहन आहे की उगाच संघर्ष वाढवू नका. लोकांचं काय म्हणणं आहे त्याचा कधीतरी आदर राखला जाईल असं पहा. तरीपण सरकारने संघर्षाची भूमिका घेतली तर जनतेच्या बरोबर या लढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहेच आणि असेलच, असे आश्वासनही राज ठाकरे यांनी दिले आहे. (Raj Thackeray’s opposition to tree cutting)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00