Home » Blog » Indian Media coverage: वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियावर युद्धउन्माद

Indian Media coverage: वृत्तवाहिन्यांसह सोशल मीडियावर युद्धउन्माद

0 comments
Indian Media coverage

टीव्हीचे अँकर आणि सोशल मीडियावर बंधने घालून, युद्ध ही जल्लोष करण्याची गोष्ट नाही, हे सांगण्याची गरज आहे, असे भारतीय नौदलाचे माजी प्रमुख ॲडमिरल लक्ष्मीनारायण रामदास यांनी म्हटले आहे. (Indian Media coverage)

-विजय चोरमारे

भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर नंतर सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवर जो उन्माद सुरू आहे, तो पाहिल्यावर ॲडमिरल लक्ष्मीनारायण रामदास यांच्या वक्तव्याची खात्री पटते. देशभक्तीच्या नावावर टीआरपी मिळवण्याचा धंदा या वृत्तवाहिन्यांनी सुरू केला आहे.

लोकांना मूर्ख बनवण्याचे काम वृत्तवाहिन्या करीत आहेत. या संघर्षात काही भारतीय लोकांनाही प्राण गमावावे लागले आहेत. परंतु त्याच्याशी या कुणाला देणेघेणे नाही. मोदींचा उदोउदो करण्याचे काम सुरू आहे. (Indian Media coverage)

युद्धाच्या काळात देशातील प्रत्येक नागरिकाने एकजुटीने लष्कराच्या मागे उभे राहण्याची गरज असते. ही गोष्ट खरीच आहे. परंतु याचा अर्थ चुकीच्या आणि खोट्या गोष्टींचा प्रसार करणे नव्हे. खोट्या बातम्या, खोटे व्हिडिओ, खोटे फोटो पसरवून लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. देशासाठीच्या अत्यंत गंभीर परिस्थितीमध्ये अत्यंत बेजबाबदार वर्तन केले जात आहे. त्याला देशप्रेमाचे लेबल लावले जात आहे. आणि या उन्मादाला प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. (Indian Media coverage)

पहेलगामच्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्त्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने सहा आणि सात मेच्या रात्री पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. या हल्ल्यांनंतर देशात युद्धज्वर वाढला आहे. आणि काही मंडळी सोशल मीडियावर आग, स्फोट वगैरे जुने फोटो व्हिडिओ शेअर करून ते हल्ल्याचे म्हणून सांगितले जात आहे. हिंदी आणि मराठी वृत्तवाहिन्याही त्यात मागे नसल्याचे आढळून आले आहे. वृत्तवाहिन्यांनी तर पुरते ताळतंत्र सोडले असून युद्ध सुरू झाले आहे, अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जात आहेत.

सोशल मीडियावर ऑपरेशन सिंदूरचा म्हणून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात भीषण आग दिसते. पाकिस्तानमधील सियालकोटचा हा व्हिडिओ असल्याचे म्हटले जाते. भारताने केलेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तान जळत असल्याचे सांगितले जाते. ऑल्ट न्यूजने या व्हायरल व्हिडिओचा शोध खेतला असता इंडोनेशियातील एका मार्केटमध्ये लागलेल्या आगीचा हा फोटो असल्याचे आढळून आले. तो २२ ऑगस्ट २०२४ चा आहे.

३१ जानेवारीला फिलाडेल्फियात विमान कोसळल्याची घटना आहे. त्याचा व्हिडिओ आयएनएस विक्रांतने कराची बंदर उद्ध्वस्त केले म्हणून प्रसारित केला जात आहे. (Indian Media coverage)

पाकिस्तानने अमृतसरच्या सैन्य तळावर हल्ला केल्याचा दावा करून त्याच्या पुष्ट्यर्थ एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. प्रत्यक्षात हा व्हिडिओ चिलीमधला आहे. चिली मीडिया आऊटलेटकडून चार फेब्रुवारी २०२४ रोजी अपलोड केलेला हा जुना व्हिडिओ आहे. अमृतसरवर पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ म्हणून भारत आणि पाकिस्तानातील अनेक लोक सोशल मीडियावर तो शेअर करीत आहेत.

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सियालकोटवर क्षेपणास्त्र डागल्याचा म्हणून एक व्हिडिओ अनेक लोकांनी शेअर केला. रस्त्यावर काही बस, ट्रक उभे आहेत तिथे मोठा स्फोट होतो. बीआरएसचे नेते वाय सतीश रेड्डी यांच्यासह अनेक लोकांनी तो शेअर केला होता. परंतु गफलत लक्षात आल्यानंतर रेड्डी यांनी तो डिलीट केला. परंतु तोपर्यंत तो अठरा लाख लोकांनी पाहिला होता. ऑल्ट न्यूजने याची पडताळणी केली असता मुंबईच्या धारावीत झालेल्या सिलिंडर स्फोटाचा हा व्हिडिओ आहे.  २४ मार्चला नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एका गाडीला आग लागली आणि पाठीमागे उभा असलेला सिलिंडरने भरलेला ट्रक आगीच्या कक्षेत आला. त्यामुळे झालेल्या स्फोटाचा हा व्हिडिओ आहे, तो सियालकोटवरील हल्ल्याचा म्हणून व्हायरल करण्यात आला होता.

दोन ऑक्टोबर २०२४ला इराणी क्षेपणास्त्रांनी इस्राएलवर केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ दूरदर्शनने त्यावेळी प्रसारित केले होते. तेच व्हिडिओ आता काही लोकांनी पाकिस्तानने भारतावर केलेल्या हल्ल्याचे व्हिडिओ म्हणून प्रसारित केले आहेत.

देशाच्या सीमेवरील सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पूंछ, उरी, उधमपूर आदी भागात पाकिस्ताननं हल्ले केले आहेत. त्यामुळं सीमेवरील गावांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरं पडली आहेत. लोक जखमी झाले आहेत. सीमेवरील गावे ओस पडली आहेत. जखमी लोकांना दूरवरच्या दवाखान्यात न्यावं लागलं आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यात अनेक भारतीयांना प्राण गमावावे लागले आहेत. यावरून तरी लक्षात घ्यायला हवं की युद्ध ही जल्लोष करण्याची गोष्ट नाही. परंतु आयपीएललाच खरं क्रिकेट मानणाऱ्या या जनरेशनला युद्ध आणि आयपीएलचे सामने यात काही फरकच वाटेनासा झाला आहे. आयपीएलचा सामना मधेच थांबवावा लागला आणि काही सामने अन्यत्र हलवावे लागले यावरून परिस्थितीचं गांभीर्य लक्षात यायला हवं. (Indian Media coverage)

ट्विटरवर अनेक जबाबदार लोक बेजबाबदारपणे चुकीच्या गोष्टी शेअर करताना दिसतात. त्यांना तीच देशभक्ती वाटते. दुसरीकडं अजित डोवाल वगैरे नावाने खोटी अकौंट्सही आहेत. आणि त्याद्वारे खोटी माहिती पसरवली जात आहे.

भारतीय सैन्य थेट पाकिस्तानात घुसलं, कराची बंदर उद्ध्वस्त केलं, लाहोर ताब्यात घेतलं  वगैरे प्रकारच्या बातम्या भारतीय वृत्तवाहिन्या देत आहेत. आजतक, नवभारत, टीव्ही ९ भारत, रिपब्लिकन वगैरे त्यात आघाडीवर आहेत. मराठी वृत्तवाहिन्यांनाही युद्धज्वर चढलाय. तो स्वाभाविक आहे. परंतु त्यामुळं सध्याच्या परिस्थितीचं वस्तुनिष्ठ चित्रण लोकांच्यासमोर येत नाही. बीबीसीसारख्या एखाद्याच माध्यमातून आपल्यापर्यंत बऱ्यापैकी वस्तुनिष्ठ माहिती पोहोचत आहे.

सोशल मीडियावर अत्यंत बेजबाबदारपणे गोष्टी सुरू असताना वृत्तवाहिन्यांनी खरेतर जबाबदारीने आणि संयमाने सध्याच्या परिस्थितीचे चित्रण दाखवायला पाहिजे होते. परंतु युद्ध म्हणजे व्हिडिओ गेम असल्यासारखे हे लोक वागत आहेत. भारतीय सैन्य पाकिस्तानमध्ये घुसल्याचे सांगून काही वेळातच पाकिस्तानवर कब्जा मिळवला जाईल वगैरे चित्र उभे केले जात आहे. वैशिष्ट्य म्हणजे वस्तुनिष्ठ माहिती देणारी एकही वृत्तवाहिनी सध्या भारतात नाही, अशी स्थिती आहे. आपलं हे कर्तृत्व म्हणजे देशभक्ती आणि सैन्याला प्रोत्साहन आहे असा त्यांचा भलता गैरसमज आहे. परंतु याला केवळ आणि केवळ बेजबाबदारपणा म्हणतात. खरेतर काळ मोठा कठीण आहे. परिस्थिती संवेदनशील आहे. आपण सर्वांनी अत्यंत जबाबदारीने वागण्याची गरज आहे.

हेही वाचा :
पाकिस्तानच्या हल्ल्यात घाटकोपरचा जवान शहीद
द्वेषपूर्ण भाषणे देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00