बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. काही दिवसांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना नागपूरच्या प्रशांत कोरटकरने शिविगाळ केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमानास्पद वक्तव्य केले. चित्रलेखाचे माजी संपादक ज्ञानेश महाराव यांना एकट्याला घेरून त्यांच्याकडून माफी वदवून घेण्यात आली. आणि आता प्रवीण गायकवाड यांना काळे फासून त्यांना मारहाण, धक्काबुक्की करण्यात आली. सरकारी संरक्षणाची खात्री झाल्यावर विध्वंसक शक्ती कोणत्या थराला जातात, हे या घटनांवरून दिसून येते.( Praveen Gaikwad)
डॉ. विजय चोरमारे
उल्लेख केलेल्या घटनांमधील साम्य म्हणजे इथे ज्यांच्यावर हल्ला झाला आहे, ते सगळे मराठा समाजाचे लोक आहेत. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे भाजपचे पदाधिकारी होते. त्या घटनेचा संदर्भ थोडा वेगळा होता. परंतु बाकी तिन्ही गोष्टींमधले साम्य म्हणजे इंद्रजित सावंत, ज्ञानेश महाराव आणि प्रवीण गायकवाड हे तिघेही मराठा समाजाचे असले तरी परिवर्तनाचा व्यापक विचार घेऊन पुढे जाणारे सामाजिक चळवळींचे नेते आहेत. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर निष्ठा असलेले या विचारधारेचे अनुयायी आहेत. त्यांच्यावरील हल्ला हा जसा मराठा समाजावरील हल्ला आहे, तसाच तो विचारधारेवरील हल्लाही आहे. सत्तेच्या सावलीत फोफावलेल्या प्रवृत्ती कायदा हातात घेऊन गुंडगिरी करीत आहेत. तिन्हीमधील आणखी एक साम्य म्हणजे हल्ला करणारे तिन्ही घटक भारतीय जनता पक्षाशी किंवा त्यांच्या शीर्षस्थ नेत्यांशी संबंधित आहेत. (Praveen Gaikwad)
‘हे’ सगळे भाजपशी संबंधित
प्रशांत कोरटकरची संभावना चिल्लर अशी केली असली तरी तो देवेंद्र फडणवीस यांचा निकटवर्ती होता. महाराव यांच्यावर दादागिरी करणारा भाजपचा माजी नगरसेवक होता. आणि आता प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे भाजपचाच पदाधिकारी आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते जाहीरपणे त्यांच्या कृत्याचा निषेध करीत असले तरी ते त्यांच्याशी संबंधित आहेत. आणि भाजपशी संबंधित असल्यामुळेच वर्षावर आपला बॉस बसला आहे आपले कुणी वाकडे करू शकत नाही, याची खात्री वाटत असल्याने असले धाडस करण्यास धजावले आहेत. त्यामुळे कायदेशीर मार्गाने लढाईच्या कितीही गप्पा मारल्या तरी या हल्लेखोरांवर कारवाई होणार नाही. उलट बंद खोलीत त्यांचा सत्कारच केला जाईल. आणि भविष्यात त्यांनी असाच पराक्रम गाजवावा यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे कायदेशीर मार्गाने नव्हे, तर योग्य मार्गाने, ब्रिगेडच्या पद्धतीने त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. तो कसा करायचा हे प्रवीण गायकवाड आणि त्यांच्या संघटनेला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. वेळीच बंदोबस्त केला नाही, तर ही कीड समाजाला पोखरत जाईल. (Praveen Gaikwad)
‘अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ हे ठीक आहे. पण त्या नादात तुमच्या शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राचा मुलुख तुमच्या ताब्यातून निसटत चालला आहे, हे लक्षात घ्यायला हवे. महाराष्ट्र नासला आणि तो हातातून निसटला तर अवघा मुलूख काय करायचा, असा प्रश्नही स्वतःला विचारण्याची आवश्यकता आहे.
अक्कलकोटमध्ये काय घडले?
प्रवीण गायकवाड अक्कलकोट येथील फत्तेसिंह शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रमासाठी जात असताना एका टोळक्याने त्यांना रस्त्यावर अडवून काळे फासले. आणि धक्काबुक्की केली. यात त्यांचे कपडेही फाटले. आरोपींनी गायकवाड यांच्या गाडीची तोडफोडही केली. (Praveen Gaikwad)
‘संभाजी ब्रिगेड’ हे संघटनेचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजी ब्रिगेड’ असे नाव करावे, अशी मागणी काही कार्यकर्ते अनेक दिवसांपासून करीत होते. त्याच मागणीसाठी ही शाईफेक करण्यात आल्याचा दावा आरोपींनी केला आहे. हल्ला केल्या प्रकरणी मारहाण करणे, दंगल करणे, गाडीची मोडतोड करणे, बेकायदेशीर जमाव जमवणे याप्रकरणी दीपक काटे यांच्यासह सात जणांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५, १८९, १९१, १९० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर प्रवीण गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले, ‘‘हे सरकार कुणाचे आहे बघा. हा एक विचार संपवण्याचा प्रयत्न आहे. हल्लेखोरांचा मला ठार मारण्याचा कट होता.’’ यामागे मोठे षङ्यंत्र असल्याचा आरोपही गायकवाड यांनी केला आहे.
संभाजी ब्रिगेडनेही एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, ‘‘संभाजी ब्रिगेड संघटना २८ वर्षांपासून कार्यरत आहे. संघटनेच्या नावातून कोणत्याही प्रकारे एकेरी उल्लेख होत नाही. महापुरुषांचे नाव संघटनेला, पक्षाला, शहराला, गावाला दिल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्या भ्याड व्यक्तीने हा हल्ला केला त्या व्यक्तीच्या संघटनेचे नाव ‘शिव धर्म फाउंडेशन’ असे आहे, मग हे नाव एकेरी आहे की आदरार्थी हा प्रश्न त्या भ्याड हल्लेखोराने आधी स्वतःला का विचारला नाही.’’ (Praveen Gaikwad)
संभाजी ब्रिगेडची महत्त्वाची आंदोलने
मराठा इतिहासाच्या माध्यमातून रुजवलेल्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करण्यासाठी संभाजी ब्रिगेडने वेळोवेळी आक्रमकपणे आंदोलने केली आहेत.
संभाजी ब्रिगेडने पुण्यातील लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्याची मागणी केली. त्यासाठी आंदोलने केली. अखेर महापालिकेला तो पुतळा हटवावा लागला. संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनानंतर दादोजी कोंडदेवांचा छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचा उल्लेख पाठ्यपुस्तकातून काढून टाकण्यात आला होता. दादोजी कोंडदेव यांच्या नावाने देण्यात येणारा क्रीडा क्षेत्रातील प्रशिक्षकासाठीच्या पुरस्काराचेही नाव बदलण्यात आले. (Praveen Gaikwad)
जेम्स लेन या पाश्चिमात्य संशोधकाने छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ महासाहेब यांचे चारित्र्यहनन करणारे लेखन केले होते. त्याविरोधातही संभाजी ब्रिगेडने आंदोलने केली. त्यातूनच पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर महाराष्ट्राला जेम्स लेनच्या पुस्तकातील मजकुराचे गांभीर्य लक्षात आले.
ब्रिगेडची चळवळ बहुजनांना अर्थकारणाकडे नेण्याची
प्रवीण गायकवाड हे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून कार्यरत होते. बहुजन तरुणांना मराठा इतिहासाबाबत सजग करण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली दीर्घकाळ सुरू आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रारंभीचे आक्रमक संघटना हे स्वरूप त्यांनी बदलले. कायदेशीर कचाट्यात न अडकता बहुजनांच्या मुलांना अर्थकारणाकडे नेण्याची चळवळ ते चालवतात. ‘अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ या मोहिमेतून त्यांनी तरुणांना जगभरातील पन्नासहून अधिक देशांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. (Praveen Gaikwad)
डोक्यात शिवाजी, खिशात गांधीजी असा त्यांचा संकल्प आहे. या चळवळीच्या माध्यमातून तरुणांना नोकरीसह उद्योजक होण्यासाठीचे मार्गदर्शन ते करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळी त्यांनी एक संकल्पना मांडली होती, ती म्हणजे “अहद तंजावर तहद पेशावर, अवघा मुलुख आपला !” तंजावर हे ठिकाण भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील तामिळनाडू राज्याच्या टोकाला असून पेशावर हे ठिकाण पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळ आहे. थोडक्यात तंजावरपासून पेशावर पर्यंतचा मुलुख आपला असावा असे महाराजांना वाटत होते. त्यामागे महाराजांची फार मोठी दूरदृष्टी होती.
याच संकल्पनेतून बहुजनांच्या मुलांना उद्योजक होण्यासाठी आणि क्षमता ओळखून परदेशात जाण्यासाठी ‘अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ ही मोहीम २०१५ पासून सुरू करण्यात आली. मराठा आरक्षणाची मागणी गेल्या तीन दशकांपासून होत असली, तरी त्यामध्ये कायदेशीर अडथळे आहेत. आंदोलनातून होणारी ससेहोलपट आणि त्यातून होणारा करिअरवर परिणाम पाहता ‘अहद ऑस्ट्रेलिया, तहद कॅनडा, अवघा मुलुख आपला’ मोहिमेला गती देण्याचा निर्धार प्रवीण गायकवाड यांनी केला.
बहुजनांच्या पोरांनीही ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात मुलूखगिरी करावी. तिथं जाऊन नोकरी, उद्योग आणि व्यवसायाच्या संधी हेराव्यात, त्यातून आपले अर्थकारण मजबूत करावं आणि जगभर आपली कम्युनिटी फार्मिंग करावी अशी संभाजी ब्रिगेडची भूमिका आहे. आज हा विचार पेरला तर निदान भविष्यात तरी आपले लोक समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील असा त्यांचा विश्वास आहे.
विधायक चळवळीकडे वळल्यामुळे स्वाभाविकपणे सामाजिक पातळीवर जी आक्रमक आंदोलने करीत होते, त्यात खंड पडला. त्याचवेळी प्रतिगामी शक्ती बळावल्या. त्यांचे धाडस वाढले. उपद्रव वाढले. संभाजी ब्रिगेडचा सामाजिक पातळीवरील आक्रमकपणा कमी झाल्यामुळेच प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला असावा.
अवघ्या बहुजनांवर दहशत निर्माण करण्याचा डाव
प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामागची आणखी काही कारणे आहेत. ते मराठा समाजातील आहेत. ते प्रकृतीने धडधाकट आहेत. राजकीय क्षेत्रात त्यांचे वजन आहे. शरद पवार यांचे ते निकटवर्ती आहेत. आणि ते आर्थिकदृष्ट्याही भक्कम आहेत. मराठा समाजातील अशा सर्वार्थाने बलदंड नेत्यावर हल्ला केला तर दहशत निर्माण होऊ शकेल, असाही उद्देश असावा. केवळ मराठाच नव्हे, तर संपूर्ण बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याची त्यांची भूमिका असते. त्याअर्थाने पुरोगामी चळवळीलाही इशारा देण्याचा उद्देश असू शकतो. हल्लेखोर दीपक काटे याचे संभाजी भिडे यांच्यासोबतचे अनेक फोटो, व्हिडिओ समाजमाध्यमांवर पाहावयास मिळतात. यावरून या हल्ल्यामागच्या विचारधारेची कल्पना येऊ शकते. शिवाय काटे हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या काळजाचा तुकडा असल्याचेही दिसून येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्याचा संवाद दिसतो. फडणवीसांना अशी उपद्रवी मंडळी आपल्या ताफ्यात हवी असतात. त्यामुळे नजिकच्या काळात तो फडणवीसांचा खास माणूस म्हणून दिसला तरी आश्चर्य वाटायला नको.
तूर्तास मराठी मुलूख सांभाळा. महाराष्ट्रात विकृतांना मोकळं रान देऊन मुलुखगिरी करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्र सांभाळला तरच अवघा मुलूख पादाक्रांत करता येईल.
हेही वाचा :
संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याने संतापाची लाट
शिवसेना निवडणूक चिन्हावर ऑगस्टमध्ये सुनावणी