Home » Blog » Politics on the cricket field : क्रिकेटच्या मैदानावर कुणी केला राजकीय चिखल?

Politics on the cricket field : क्रिकेटच्या मैदानावर कुणी केला राजकीय चिखल?

0 comments
Politics on the cricket field

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या काळात भारतीय खेळाडूंनी मैदानावर जे वर्तन केले, ते सरकारच्या धंदेवाईकपणाचा बचाव करणारे होते, यात तिळमात्र शंका नाही. सरकारने खेळाडूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले देशांतर्गत राजकारण साधण्याचा प्रयत्न केला. संघात विराट कोहली, रोहित शर्मा यांच्यासारखे ज्येष्ठ खेळाडू नव्हते. सूर्यकुमार यादवसारख्या नवख्या खेळाडूकडे कर्णधारपद होते. त्याच्याकडून हव्या त्या कृती करून घेतल्या. आणि सरकारवर होणा-या टीकेपासून लोकांचे लक्ष इतरत्र वळवण्याचा प्रयत्न केला. खेळाच्या मैदानावरही घाणेरडं राजकारण आणून सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखल्या जाणा-या क्रिकेटच्या मैदानावरही या सरकारनं घाण करून टाकली.

विजय चोरमारे

पहलगामचा दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरचे ऑपरेशन सिंदूर या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानसोबत सामने खेळू नये, अशी मागणी करण्यात येत होती. प्रामुख्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची ही मागणी होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून पाकिस्तानसोबत खेळायला शिवसेनेचा विरोध आहे. भारत-पाक सामन्याआधी शिवसैनिक शिशिर शिंदे यांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडून त्यावर ऑईल टाकल्याची घटना सगळ्यांना आठवत असेल. तर तीच भूमिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने यावेळीही पुढे नेली. त्यांच्या मागणीला व्यापक समर्थन मिळू लागले. सरकारवर टीका होऊ लागली. गोदी मीडिया म्हणून ओळखल्या जाणा-या हिंदी वृत्तवाहिन्यांनीही पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याच्या विरोधात सूर लावला. एकीकडे पाकिस्तान दहशतवादी कारवाया करीत असताना, आपल्या निष्पाप लोकांचे बळी घेत असताना त्यांच्याशी क्रिकेट खेळू नये, अशी ही भूमिका होती. पाकिस्तानशी संबंध ताणल्यापासून भारत आणि पाकिस्तान या देशांच्यातील मालिका बंद झाल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानात तर सामने होत नाहीतच. परंतु त्रयस्थ ठिकाणीही हे दोन्ही देश एकमेकांशी खेळत नाहीत. मात्र जेव्हा विश्वचषक किंवा आशिया चषक स्पर्धा असते तेव्हा मात्र या दोन्ही देशांना एकमेकांशी खेळावे लागते. अशा प्रकारच्या स्पर्धा होत आल्यात आणि दोन्ही देश एकमेकांशी खेळत आलेत. त्याला आजवर फारसा विरोध होत नव्हता. परंतु पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारे क्रिकेट खेळू नये, अशी मागणी होऊ लागली. या मागणीमागचे राजकारणही विचारात घेण्याजोगे आहे. एरव्ही अशी मागणी झाली नसती. परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे आयसीसीचे म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेटच्या स्पर्धा सुरळीत पार पाडणे ही त्यांची जबाबदारी आहे. त्यांची कोंडी करण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून अमित शाह यांच्यावर निशाणा साधण्यासाठी या मागणीने यावेळी जोर धरला. हे सरळ सरळ राजकारण आहे. भारतीय जनता पक्षाने गेल्या काही वर्षांत जे पेरले आहे, तेच यानिमित्ताने उगवून आले. पाकिस्तानच्या माध्यमातून भाजपने राजकारण केले. पाकिस्तानबद्दलचा द्वेष पेरला. त्यानिमित्ताने इथल्या अल्पसंख्य समाजालाही लक्ष केले. त्यांच्याविरोधात द्वेषाची पेरणी केली. त्यामुळे राष्ट्रवादाचा ज्वर वाढत गेला. आता जय शाह यांच्या निमित्ताने त्यालाच लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानविरोधात खेळू नये, अशी मागणी जोर धरू लागली. जे जय शाह यांच्यासाठी शक्य नव्हते. (Politics on the cricket field)

यादरम्यानची एक गंमत लक्षात घ्यायला हवी.

रिपब्लिकन हे अर्णब गोस्वामीचे चॅनल. धार्मिक विद्वेषाचा मुद्दा आला की त्याला चेव येतो. आशिया चषकातल्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवरही अर्णब गोस्वामी पेटला होता. तो त्याच्या खास शैलीत ओरडून ओरडून भारताच्या माजी क्रिकेटपटूंना प्रश्न विचारीत होता. राहुल द्रविड, सौरभ गांगुली वगैरेंना प्रश्न विचारीत होता. तुम्ही का तोंड उघडत नाही, असे म्हणत होता. म्हणजे सामने खेळण्याचा निर्णय़ सरकारचा होता. सरकारचे प्रमुख नरेंद्र मोदी आहेत. आणि अमित शाह दोन नंबरचे नेते आहेत. हे दोघे पाकिस्तानच्या नावावर राजकारण करीत असतात. प्रश्न मोदी-शाह यांना विचारायला हवे होते. परंतु तेवढी हिंमत त्याच्यात नसल्यामुळे तो द्रविड, गांगुली यांच्या नावाने शंख करीत होता. त्याच्यासाठी खेळाडू सॉफ्ट टार्गेट होते.

ज्येष्ठ क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी एका वाहिनीवर बोलताना स्पष्टच सांगितले. हा खेळाडूंचा प्रश्नच नाही. स्पर्धा खेळण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे त्यामुळे त्यावर खेळाडूंनी अनुकूल, प्रतिकूल प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच येत नाही.

गावसकर यांच्या बोलण्याचा दुसरा अर्थ होता की, तुम्हाला जर यासंदर्भात काही विचारायचं असेल तर तुम्ही सरकारला विचारा. क्रिकेटपटू किंवा माजी क्रिकेटपटूंची यासंदर्भात काही भूमिका असण्याचा प्रश्न नाही. (Politics on the cricket field)

देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर व्यक्त होणारा किंवा निर्माण केलेला असंतोष पाहून सरकारने खेळाडूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं पुढचं सगळं राजकारण साधण्याचा प्रयत्न केला. सूर्यकुमार यादव हा कर्णधार नवखा असल्यामुळं त्याला सरकारनं पर्यायानं बीसीसीआयनं लिहून दिलेली स्क्रिप्ट वाचण्यावाचून पर्याय नव्हता. त्यालाही हिरो बनण्याची संधी मिळाली. त्यातून मग पुढचं हस्तांदोलन न करण्यापासूनचं राजकारण थेट मैदानावर सुरू झालं. पाकिस्तानच्या काही खेळाडूंनीही आचरटपणा करून मैदानावरची तेढ वाढत राहील असे प्रयत्न केले. तोही त्यांच्या राजकारणाचा भाग होता. त्याचा शेवट अंतिम सामन्यानंतरच्या पुरस्कार वितरणातल्या नाट्यमय घडामोडींमध्ये झाला. (Politics on the cricket field)

या सगळ्या पार्श्वभूमीवर मला एक समारंभ आठवतो. भारतासाठी पहिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार कपिल देव आणि लोकसभेचे तत्कालीन अध्यक्ष पी. ए. संगमा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी पी. ए. संगमा यांनी एका वाक्यात भाषण केले होते. ते म्हणाले होते, खेळात राजकारण नको आणि राजकारणात खिलाडूवृत्ती हवी.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने त्याची आठवण आल्यावाचून राहिली नाही. कारण इथे खेळाच्या मैदानावर राजकारण दिसले. खेळाच्या मैदानावर खेळाडूंची संवेदनशीलता दिसते. आपल्या देशातील किंवा जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या एखाद्या महत्त्वाच्या घटनेसंदर्भातील प्रतिक्रिया दिसते. ती कृती व्यक्तिगत, सांघिक स्वरुपातही दिसते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंशी खुन्नसही दिसते. माजी कर्णधार विराट कोहलीची बरोबरी त्याबाबतीत कुणी करू शकत नाही. पण पाकिस्तानशी खेळताना विराटने मर्यादा ओलांडून आचरटपणा केला नाही. याउलट पाकिस्तानसोबतच्या सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये सौहार्द कसे राहील, याचा प्रयत्न तो करायचा. तेवढी समज आणि प्रगल्भता विराटकडे होती.

२०२१च्या टी-२० विश्वचषकातील एका सामन्यात पाकिस्तानने भारतावर दहा गडी राखून विजय मिळवला. तेव्हा विराटनं सलामीवीर मोहम्मद रिझवानचं दिलखुलासपणे अभिनंदन केलं. विराटच्या अभिनंदनामुळं रिझवानही लहान मुलासारखा प्रेमानं त्याला बिलगला होता. एकदा भारत-पाकिस्तान यांच्यात युद्ध सुरू असताना गावसकर, झहीर अब्बास वगैरे भारत-पाकिस्तानचे खेळाडू परदेशात एका संघातून खेळत होते. १९७१ साली भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू असताना दोन्ही देशाच्या क्रिकेट खेळाडूंनी तब्बल चार महिने ड्रेसिंग रूम शेअर केली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियात वर्ल्ड इलेव्हन विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी मालिका सुरू होती. या मालिकेत जवळपास सहापेक्षा अधिक सामने दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एका संघातून खेळले. थेट युद्ध सुरू असताना तेव्हा खेळ आणि राजकारण यांच्यात अंतर ठेवण्याची प्रगल्भता दाखवली होती. अलीकडं राजकारण्यांनी आपल्या सोयीसाठी हे अंतर मिटवत आणलंय. खेळाच्या माध्यमातून एकीकडं धंदा केला जातो आणि दुसरीकडं राजकारण खेळलं जातं. या राजकारणाचा परमोच्च बिंदू आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळाला.

भारताचे क्रिकेटपटू सय्यद किरमानी, रवी शास्त्री, कपिलदेव यांनी या ताज्या राजकारणाबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. मैदानावर जो प्रकार घडला त्याला रवी शास्त्री यांनी हास्यास्पद म्हटले आहे. सय्यद किरमानी यांनी खेळ आणि राजकारण यांची सरमिसळ होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त करून या गोष्टी खेळाला हानी पोहोचवत असल्याचे म्हटले आहे. कपिल देव यांनीही खेळाडूंना राजकारण बाजूला ठेवून खेळावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

क्रिकेटला एकेकाळी सभ्य गृहस्थांचा खेळ म्हटलं जायचं. परंतु लाइव्ह प्रक्षेपण सुरू झाल्यानंतर काही खेळाडू मैदानावर आचरटपणा करून लक्ष वेधून घेऊ लागले. हा आचरटपणा गंमतीपासून द्वेषभावना पसरवण्यापर्यंत पोहोचला. खेळाडूंना दोष देण्यात अर्थ नाही. ते कळसूत्री बाहुल्या असतात. बीसीसीआय त्यांचं करिअर संपवू शकते त्यामुळं त्यांच्याकडून आलेल्या कोणत्याही सूचनेचा ते अव्हेर करू शकत नाहीत. बीसीसीआय आणि सरकार जवळपास एकच असल्यामुळं खेळाडूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण सुरू झालंय. राजकारण्यांनी खेळाच्या मैदानावरही चिखल करून टाकलाय. बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानशी सामने खेळणं भाजपला जड गेलं असतं. त्याचमुळं खेळाडूंचा वापर करून अशा प्रकारचं राजकारण मैदानावर खेळलं गेलं.   

अशा रितीनं खेळाचं मैदान बरबटून टाकण्याऐवजी आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध न खेळण्याचा निर्णय घेतला असता तर त्यामुळं क्रिकेटची प्रतिष्ठा राखली गेली असती.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00