कोल्हापूर : प्रतिनिधी : शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिस महासंचालकांना लिहिलेल्या पत्रानुसार ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. आमदार गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. पण आंबी यांनी तक्रार देऊनही पोलिसांनी आमदार गायकवाड यांची चौकशी केली नाही. आणि दुसरीकडे आमदार गायकवाड यांच्या मागणीनुसार आंबी यांची चौकशी सुरू केल्याने ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असा कारभार सुरू असल्याची प्रतिक्रिया जनमानसातून उमटत आहेत. (Police question the publisher of the book ‘Shivaji Kon Hota’)
शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक आंबी यांना आमदारांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला म्हणून फोनवरुन अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली होती. आमदार गायकवाड यांच्या वागणुकीवर राज्यात आणि शिवप्रेमीमध्ये संतापाची लाट उसळली होती. आंबी यांनी आमदार गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी कोल्हापूर आणि पुण्यात पोलिस ठाण्याची पायरी चढूनही पोलिसांकडून गायकवाड यांच्यावर कारवाई झाली नाही.
आंबी यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी
त्यानंतर आमदार गायकवाड यांनी पोलिस महासंचालकांकडे पत्र लिहून आंबी यांची चौकशी करुन मालमत्ता जप्त करण्याची मागणी केली. पुस्तक प्रकाशन परवानगीबाबतही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. पुस्तक छापण्यासाठी कोणत्या जिहादीने मदत केली याची चौकशी करण्याची मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे. आमदार गायकवाड यांच्या मागणीनंतर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिसांनी प्रशांत आंबी यांची चौकशी सुरू केली आहे. ही चौकशी बेकायदेशीर असल्याचे प्रशांत आंबी यांनी म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कागदपत्रे मागितली तर देणार नाही पण न्यायालयाने मागितली तर कागदपत्रे सादर करणार असल्याचे आंबी यांनी म्हटले आहे. (Police question the publisher of the book ‘Shivaji Kon Hota’)
आमदार गायकवाड यांनी दिल्या होत्या आंबी यांना शिव्या
जेष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी १९८८ मध्ये लिहिलेल्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या लाखो प्रती विकल्या गेल्या आहेत. या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी असून पुस्तकाच्या शीर्षकावरुन आमदार गायकवाड यांनी मध्यरात्री फोन करुन प्रशांत आंबी यांना शिव्याची लाखोली वाहिली होती. आठ मिनिटाच्या संभाषणात ३६ शिव्या दिल्या होत्या. गायकवाड यांचा कॉल व्हायरल झाल्यावर गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी झाली होती. (Police question the publisher of the book ‘Shivaji Kon Hota’)