कोल्हापूर : प्रतिनिधी : मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते स्वर्गीय अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित माहितीपट “पप्पा सांगा कुणाचे?” याचा प्रीमियर शो कोल्हापुरात रविवारी२२ जून रोजी होणार आहे. कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे सभागृहात सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. (Arun Sirnaik)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत, खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. यावेळी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ पालकमंत्री, प्रकाश आबीटकर, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत. या प्रिमियर शोसाठी सर्व रसिकांना विनामूल्य प्रवेश असल्याची माहिती सरनाईक यांच्या कन्या डॉ. सविता नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रणजीत नाईक नवरे आणि नील नाईकनवरे यांचीही उपस्थिती होती. (Arun Sirnaik)
कोल्हापूर ही अरुण सरनाईक यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी होती. ४ ऑक्टोबर १९३५ रोजी मंगळवार पेठेत जन्मलेल्या सरनाईक यांचा २१ जून १९८४ रोजी एका अपघातात दुर्दैवी निधन झाला. सत्तरच्या दशकात त्यांनी रंगभूमी आणि सिनेसृष्टीत मोठे योगदान दिले.
‘शाहीर परशुराम’ या चित्रपटातून त्यांच्या अभिनयाची सुरुवात झाली. ‘मुंबईचा जावई’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘केला इशारा जाता जाता’ अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. अभिनयाबरोबरच ते तबला, ढोलकी, पेटी, तंबोरा या वाद्यांचे उत्तम वादक होते, तसेच त्यांना गायनाचाही उत्तम अभ्यास होता. (Arun Sirnaik)
या माहितीपटात अरुण सरनाईक यांचे बालपण, शिक्षण, सिनेसृष्टीतील पदार्पण, त्यांच्या नाट्य आणि चित्रपट कारकिर्दीतील वाटचाल, मित्रपरिवाराच्या आठवणी, त्यांच्या आवडत्या भूमिका आणि त्या काळातील मराठी सिनेसृष्टीचे चित्रण यांचा समावेश आहे.
डॉ. संतोष पाठारे यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे तर संकल्पना विशाखा तुंगारे देशपांडे यांची आहे. ७५ मिनिटांच्या या माहितीपटात सरनाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण आविष्कार मांडण्यात आला आहे.
कोल्हापुरातील प्रीमियरनंतर हा माहितीपट चित्रपट अभ्यासक, फिल्म संस्थाआणि विविध चित्रपट महोत्सवांमध्ये सादर करण्याचा मानस आहे. मराठी कलाजगतात अमूल्य ठसा उमटवणाऱ्या अरुण सरनाईक यांच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा हा चित्रमय आलेख रसिकांसाठी नक्कीच स्मरणरंजन आणि प्रेरणादायक ठरणार आहे.