नवी दिल्ली : अमेरिका आणि इराणमध्ये युद्धबंदी जाहीर झाली असून त्यामध्ये पाकिस्तानने मध्यस्ती केली आहे. अमेरिका आणि इराणनेही पाकिस्तानचे आभार मानले आहेत. पाकिस्तानच्या मध्यस्तीचे पडसाद भारतात उमटले असून विरोधी पक्षांनी भाजपवर टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानला मध्यस्तीचे श्रेय मोदींमुळे मिळाले अशी टीका केली आहे. (Pakistan received the credit for mediation because of Modi)
खासदार राऊत म्हणाले, “अमेरिका इराण यांच्यामधील युद्धात मध्यस्ती करण्याचे श्रेय हे पाकिस्तानला गेले आहे. हे श्रेय महाविश्वगुरू नरेंद्र मोदींनी घ्यायला हवे होते. हे श्रेय भारताला मिळायला हवे होते. पण असे का झाले नाही? कारण महाविश्वगुरुंना कोणती भूमिकाच नाही. एकीकडे जगात युद्ध सुरु आहे, तर इकडे मोदी केरळ, पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू राजकीय विरोधकांवर शब्दांचे बॉम्ब टाकत होते. यांची हत्यारे म्हणजे निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, देशाचे उपराष्ट्रपती यांच्या माध्यमातून लोकशाहीचा विध्वंस करण्याचे काम महाविश्वगुरू करत होते. (Pakistan received the credit for mediation because of Modi)
जागतिक युद्ध थांबवण्याचे श्रेय चीन आणि पाकिस्तानने घेतले आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे जे इस्लामाबाद ताब्यात घेणार होतात, तिथेच इराण आणि अमेरिकेमध्ये शांती बैठक घेण्यात येणार आहे.” असे म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. तसेच, भारतासाठी, पंतप्रधान मोदींसाठी आणि त्यांच्या सरकारसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. पाकिस्तानला जी प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे त्यासाठी नरेद्र मोदी आणि त्यांचे सरकार जबाबदार असल्याचे म्हणत हल्लाबोल केला. (Pakistan received the credit for mediation because of Modi)