कोल्हापूर : प्रतिनिधी : राज्यातील शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाची ओळख प्रत्यक्ष करुन देण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यासदौरे ही योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन पुणे कृषी आयुक्तालय तंत्र अधिकारी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे. (Woman Farmer’ tour)
महिलांचे शेतीतील अमूल्य योगदान लक्षात घेता यावर्षीच्या २०२५-२६ या वर्षात महिला शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्याची संधी मिळावी, या उद्देशाने या योजनेत महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात युरोप, इस्राईल, चीन, जपान, मलेशिया, व्हिएतनाम, फिलीपाईन्स व दक्षिण कोरिया या देशांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत २०२५-२६ करिता शेतकरी निवडीच्या निकषांमध्ये शेतकरी किमान १२ वी पास व वयोमर्यादा वय वर्षे २५ ते ६० असावी, हे प्रमुख निकष होते. राज्यस्तरीय समिती बैठकीत कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या निकषांत बदल करण्यात आले असून किमान शिक्षणाची अट व कमाल वय ६० साठ वर्षे हि अट रद्द करण्यात आली आहे. सन २०२५-२६ करिता दौरा देश या बाबींमध्ये बदल केल्यामुळे २०२४-२५ मधील करण्यात आलेली शेतकरी निवड रद्द करण्यात आली आहे. तथापि, ज्या शेतकऱ्यांची पूर्वी निवड झालेली होती ते नव्याने अर्ज करु शकतात व पात्रतेनुसार त्यांचाही विचार या योजनेंतर्गत निवडीसाठी केला जाईल, असे पत्रकात म्हटले आहे. (Woman Farmer’ tour)