मुंबई : प्रतिनिधी : अखेर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची घंटा वाजली असून दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषद निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली. घोषणेनंतर निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे. (Municipal elections announced)
२४६ नगरपालिका, ४२ नगरपंचायतीमध्ये निवडणुका
राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेची घोषणा केल्यानंतर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीची घोषणा होणार याची अटकळ बांधली होती. त्यानुसार दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे निवडणूक कार्यक्रमाची माहिती दिली. राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपांचायतीच्या निवडणूका होणार असून त्यातून ६,८५९ सदस्य आणि २८८ नगराध्यक्षांची निवड होणार आहे. (Municipal elections announced)
१० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात
निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जाणार असून एका उमेदवारलाला चार प्रभागात अर्ज दाखल करता येणार आहे. केंद्रनिहार अंतिम मतदार यादी सात नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार आहे. १० नोव्हेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात असून १७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. १८ नोव्हेंबरला छाननी होणार असून २१ नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याची तारीख असणार आहे. २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटप होणार आहे. दोन डिसेंबरला मतदान तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे. (Municipal elections announced)
दुबार मतदारांशी संपर्क साधणार
राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले की, निवडणूक आयोगाने टूल तयार केले आहे. ज्या मतदारांची दुबार नावे आहेत त्या ठिकाणी दोन स्टार्स असतील. त्या मतदाराशी संपर्क केला जाईल. त्या मतदाराला कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करायचे असून हे विचारले जाईल. त्यानंतर त्याच मतदान केंद्रावर मतदाराला मतदान करता येईल. दुबार नावे असलेल्या मतदाराला एकाच केंद्रावर मतदान करता येईल. जर त्या मतदाराने काहीही संपर्क केला नाही, तर सगळ्या मतदार केंद्रांवर डबल स्टार मतदार अशीच त्याची नोंद केली जाईल. मतदार केंद्रावर असा मतदार आल्यास त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतलं जाईल की या व्यतिरिक्त इतर मतदार केंद्रावर त्याने मतदान केलेलं नाही किंवा या मतदानानंतर दुसऱ्या ठिकाणी जाऊन तो मतदान करणार नाही. एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरपालिकेसाठी २० ते ७५ जागांसाठी निवडणूक
नगरपरिषदेच्या निवडणुकीत बहुसदस्यी पद्धती असून एका प्रभागात सर्वसाधारणपणे दोन जागा असतात. एकूण सदस्य संख्येचा विषम आकडा असलेल्या नगरपरिषदेत एका प्रभागात तीन जागा असतात. त्याचबरोबर थेट अध्यक्षपदासाठीदेखील मतदान होत असल्याने साधारणत: एका मतदाराने तीन ते चार जागांसाठी मत देणे अपेक्षित आहे. एका नगरपरिषदची एकूण सदस्य संख्या कमीत कमी २० ते ७५ पर्यंत असते. नगरपंचायतीची निवडणूक एकसदस्यीय पद्धतीने होत असली तरी नगरपंचायतीच्या मतदारानेदेखील दोन मते देणे अपेक्षित आहे. एक मत सदस्यपदासाठी; तर दुसरे मत थेट अध्यक्षपदासाठी द्यावे लागेल. सर्व नगरपंचायतीमध्ये सदस्यपदाच्या १७ जागा असतात.
नामनिर्देशनपत्रासाठी संकेतस्थळ
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांतील उमेदवारांना नामनिर्देशनपत्र व शपथपत्र दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने https://mahasecelec.in हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यावर नोंदणी करून नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना नामनिर्देशनपत्र दाखल करता येईल. एका नोंदणीद्वारे संबंधित प्रभागात एका उमेदवारास चार नामनिर्देशनपत्र दाखल करता येऊ शकतील. संकेतस्थळावर संपूर्ण नामनिर्देशनपत्र व शपथपत्र भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत (Print Out) काढून त्यावर स्वाक्षरी करावी लागेल. त्यानंतर ती प्रत विहित मुदतीत संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे दाखल करणे आवश्यक राहील.
मतदान केंद्र आणि ईव्हीएम
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार असून त्यासाठी सुमारे १३ हजार ३५५ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात १३ हजार ७२६ कंट्रोल युनिट आणि २७ हजार ४५२ बॅलेट युनिटची उपलब्धता केली आहे. अन्य निवडणुकांच्यादृष्टीनेदेखील पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.
महत्वाच्या तारखा
• नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात- १०नोव्हेंबर
• नामनिर्देशनपत्रची दाखल करण्याची अंतिम मुदत- १७ नोव्हेंबर
• नामनिर्देशनपत्रांची छाननी- १८
• अर्ज माघारीची अंतिम मुदत – २१ नोव्हेंबर •
• मतदानाचा दिवस- २ डिसेंबर • मतमोजणीचा दिवस- ३ डिसेंबर