नवी दिल्ली : हिंदी सक्तीवरुन महाराष्ट्राविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांना मराठा खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेराव घातला. ‘पटक, पटक के मारेंगे’ असे का बोलला असा जाब विचारताच दुबेंनी ‘जय महाराष्ट्र’ म्हणत काढता पाय घेतला. (MPs surround Dubey)
काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी झालेल्या प्रसंगाची माहिती दिली. बुधवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या सुमारास मराठी खासदार संसदेच्या लॉबीत निशिकांत दुबे यांना जाब विचारण्यासाठी त्यांना शोधत होते. भाजपचे खासदार मनोज तिवारी यांना खासदार गायकवाड यांनी निशिकांत दुबे कुठे आहेत? असे विचारले असता दुबे स्वत: महाराष्ट्र खासदारांच्या दिशेने आले. यावेळी खासदार गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांच्या अन्य खासदारांनी दुबे यांना महाराष्ट्राविरोधात केलेल्या विधानाबाबत जाब विचारला. महिला खासदारांनी रौद्ररुप धारण करत त्यांनी दुबे यांना ‘तुम्ही कोणाला आपटून, आपटून मारणार?’ असे विचारले. अचानक खासदारांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने दुबे हैराण झाले. ते आपल्या वक्तव्याचा बचाव करु लागले. त्यानंतर त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ बोलून तिथून काढता पाय घेतला. ‘जय महाराष्ट्र’ ची घोषणा ऐकून इतर खासदारही तिथे जमले. त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती घेतली. (MPs surround Dubey)
महाराष्ट्रातील खासदार विशेष करुन महिला खासदारांचे या कृतीबद्दल स्वागत होत आहे. खासदार संजय राऊत यांनी आमच्या महिला खासदारांनी दुबे यांना जाब विचारला. तुम्ही काय केले. दुबेला अडवले? तुमच्यात हिंमत आहे का? असा सवाल राऊत यांनी करुन महायुती सरकारवर निशाना साधला. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही काँग्रेसच्या खासदार गायकवाड यांचे कौतुक केले. पक्षभेद विसरुन मराठी म्हणून आपण एकत्र येतोय, महिला खासदारांनी मराठी म्हणून स्वाभिमानाने दुबेला जाब विचारला त्यांचे आम्ही स्वागत करतो. (MPs surround Dubey)