मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (ता. २३) लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्रिपदाची लढाई अधिक तीव्र झाली आहे. सत्ताधारी महायुतीपासून ते महाविकास आघाडीपर्यंत मुख्यमंत्रिपदासाठी अनेक दावेदारांची नावे पुढे येत आहेत. अशा परिस्थितीत विशेषतः महाविकास आघाडी सतर्क झाली आहे.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांसह ऑनलाइन बैठक घेतली. पवार आणि ठाकरे या दोघांचेही पूर्वीचे अनुभव चांगले नाहीत. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी अनेक आमदारांसह बंड पुकारल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर जुलै २०२३ मध्ये अजित पवार यांनीदेखील त्यांचे काका शरद पवार यांना धक्का देऊन राष्ट्रवादीत बंड पुकारले आणि महायुतीत सामील झाले.
शिंदे आणि अजित पवारांमुळे महाराष्ट्रात दोन नवीन पक्ष उदयास आल्याने राज्याची राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला पुन्हा अशा प्रकरची फूट पडू द्यायची नसल्यामुळे ते आपल्या आमदारांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही. मतदानानंतर आता निकालाची प्रतीक्षा आहे. याआधी मुख्यमंत्री चेहऱ्यावरून विरोधकांच्या गोटात खडाजंगी सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीपूर्वी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी आपापल्या नेत्यांची आणि उमेदवारांची ऑनलाइन बैठक घेतली असून, शनिवारी निकालानंतर सायंकाळपर्यंत मुंबईत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. दोन्ही गटांनी विजयी उमेदवारांसाठी मुंबईत राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते, की राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार स्थापन होणार आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पटोले यांची भूमिका आम्हाला मान्य नसल्याचे म्हटले. निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर घटक पक्षांशी चर्चा करून मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा ठरवू, असे राऊत म्हणाले. मुख्यमंत्रिपदावरून महायुतीमध्येही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदार आणि पक्षाचे प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, की विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावर लढली आहे. मतदारांनीही एकनाथ शिंदे यांनाच पसंती दिली आहे. त्यामुळेच शिंदे यांनाच पुढील मुख्यमंत्री होण्याचा अधिकार आहे.
किंगमेकरचा दावा
भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे केले. याशिवाय राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. निवडणुकीचे निकाल काहीही लागोत, राष्ट्रवादी काँग्रेस किंगमेकरच्या भूमिकेत राहील, असे ते म्हणाले.