Home » Blog » नवतंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे भारताची नवी वाटचाल: डॉ. प्रकाश पवार

नवतंत्रज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे भारताची नवी वाटचाल: डॉ. प्रकाश पवार

by प्रतिनिधी
0 comments
India's progress towards a technology-based manufacturing sector

कोल्हापूर : प्रतिनिधी :  केंद्रीय अर्थसंकल्पात देशाने विज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राकडे लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट होत असून, संगणक क्षेत्राच्या पुढे जाऊन आता नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योग विकसित होण्याच्या दिशेने भारताच्या विज्ञान क्षेत्राची वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. प्रकाश पवार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रातर्फे आज ‘प्रा. नरहर विष्णू कारेकर व्याख्यानमाले’अंतर्गत डॉ. पवार यांचे ‘भारताचे विज्ञान धोरण’ या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख होते.

जुन्या ज्ञानव्यवस्थेच्या जागी नव्या तंत्रज्ञानाधारित ज्ञाननिर्मिती सुरू

भारताच्या विज्ञान धोरणाचा व्यापक आढावा घेताना डॉ. प्रकाश पवार म्हणाले, यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून देशाच्या विकासाचा नवा टप्पा अधोरेखित झाला आहे. विज्ञानाधारित उत्पादन क्षेत्राला पुन्हा प्राधान्य देत भारत आता संगणक व सेवा क्षेत्राच्या पुढे जाऊन नव्या तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन उद्योगांच्या उभारणीकडे वळत असल्याचे दिसते आहे. जागतिकीकरणानंतर जुन्या ज्ञानव्यवस्थेच्या जागी नव्या तंत्रज्ञानाधारित ज्ञाननिर्मिती सुरू झाली असून औद्योगिक क्रांतीपासून संगणकीकरण, डिजिटल तंत्रज्ञान यांच्या मार्गे आता कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतचा हा प्रवास भारताच्या विज्ञान क्षेत्राला नवे परिमाण प्राप्त करून देत आहे. (India’s progress towards a technology-based manufacturing sector)

नेहरुंचा दूरदृष्टीमुळे भारतात विज्ञानवादाची मजबूत पायाभरणी

डॉ. पवार यांनी भारताच्या विज्ञान धोरणाचा ऐतिहासिक प्रवास स्वातंत्र्यपूर्वकालीन आधुनिकतावादाचा काळ, स्वातंत्र्योत्तर काळातील वैज्ञानिक संस्थांची उभारणी आणि १९९० नंतरच्या जागतिकीकरणोत्तर तंत्रज्ञानप्रधान युगाचा कालखंड असा तीन टप्प्यांत मांडला. ते म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात महात्मा फुले, लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी स्वीकारलेला आधुनिकतावादी दृष्टिकोन हा वैज्ञानिक विचारांचा पाया ठरला. स्वातंत्र्योत्तर काळात पंडित नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे आयआयटी, भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्र, एन.पी.एल., एन.सी.एल. यांसारख्या शैक्षणिक व वैज्ञानिक संस्थांची उभारणी झाली आणि भारतात विज्ञानवादाची मजबूत पायाभरणी झाली. १९५१ मध्ये खरगपूर येथे पहिली आयआयटी स्थापन झाल्यानंतर मुंबई, कानपूर, दिल्ली आदी ठिकाणी या संस्था उभारण्यात आल्या. त्या काळात ३,७०३ संशोधक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते आणि ५९,९६५ विद्यार्थी या संस्थांत शिक्षण घेत होते. एका नव्या आधुनिक पर्वाची नांदी ठरणारा असा हा कालखंड होता. भारताच्या भावी वैज्ञानिक विकासाची पायाभरणी या पर्वाने केल्याचे त्यांनी नमूद केले. (India’s progress towards a technology-based manufacturing sector)

अध्यक्षीय मनोगतात अधिष्ठाता डॉ. देशमुख म्हणाले, विज्ञान आणि मानव्यविज्ञानामधील परस्परसंबंध हा फार महत्त्वपूर्ण आहे. भारताच्या वैज्ञानिक वाटचालीविषयी बोलत असताना डॉ. पवार यांनी भारतीय ज्ञानपरंपरेचा अत्यंत साकल्याने वेध घेतला आहे. सर्वसामान्य माणसाचे राहणीमान उंचावणे हे विज्ञानाचे उद्दिष्ट असते. त्या दृष्टीने जास्त लोकसंख्या असलेल्या देशाचा प्राधान्यक्रम रोजगारनिर्मिती असतो. अशा स्वावलंबी मनुष्यबळाच्या विकासामधूनच देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुकर होणार आहे. तंत्रज्ञान, विज्ञान आणि मानव्यविज्ञान या तिहेरी संगमातूनच विकसित भारताची उभारणी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नेहरू अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी प्रास्ताविक केले. मयुरेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर आकाश ब्राह्मणे यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सुखदेव उंदरे, भारत शास्त्री, डॉ. आलोक जत्राटकर यांच्यासह संशोधक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (India’s progress towards a technology-based manufacturing sector)

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00