अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीत अवघ्या अडीच दिवसात भारताने दणदणीत विजयाची नोंद केली. भारताने एक डाव १४० धावांनी विजय मिळवत पहिली कसोटी खिशात घातली. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे. फलंदाजीत शतकी खेळी करणाऱ्या रवींद्र जडेजाने कमालीची गोलंदाजी करताना चार गडी बाद केले. मोहम्मद सिराजने तीन तर कुलदीप यादवने दोन गडी बाद केले. (India’s big win)
नितीश रेड्डीचा अफलातून झेल
आज तिसऱ्या दिवशी खेळ सुरू होण्यापूर्वीच भारताने पहिला डाव ५ बाद ४४८ धावांवर डाव घोषीत केला. वेस्ट इंडिजची सुरुवातही खराब झाली. सिराजने आठव्या षटकात तेजनारायण चंदरपॉल बाद झाला. नितीश रेड्डीने हवेत झेपावून झेल घेतला. त्यानंतर भारताच्या फिरकीची कमाल सुरू झाली. जडेजाच्या गोलंदाजीवर शॉर्ट लेखवर कॅम्पबेल बाद झाला. वेस्ट इंडिजने दोन बाद २४ धावा केल्या होत्या. जडेजाने वैयक्तिक दुसरा आणि संघाचा तिसरा बळी मिळवला. के.एल. राहूलने स्लीपमध्ये झेल टिपला. (India’s big win)
कुलदीपकडून कर्णधार चेस क्लिन बोल्ड
त्यानंतर आलेल्या कुलदीप यादवने कर्णधार रोस्टन चेसला माघारी धाडले. कुलदीपच्या दुसऱ्या षटकात चेस क्लीन बोल्ड झाला. शे होप चांगले फटके मारत होता. जडेजाच्या गोलंदाजीवर मारलेला फटका जैस्वालने पुढे पडलेला झेल डाईव्ह मारत टिपला. जडेजाचा हा तिसरा बळी होता. अवघ्या ४५ धावात वेस्ट इंडिजने पाच गडी गमावले. उपहाराला खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजची धावसंख्या ५ बाद ६६ होती. एथेनेजने २७ तर ग्रीव्हस १० धावांवर खेळत होता. (India’s big win)
सिराजचे लागोपाठ दोन धक्के
उपहारानंतर वॉशिंग्टन सुंदरने एथेनेजला आपल्या गोलंदाजीवर परतीचा झेल देण्यास भाग पडले. ३७ व्या षटकात मोहम्मद सिराजने सलग दोन गडी बाद करत वेस्ट इंडिजला धक्के दिले. चौथ्या चेंडूवर ग्रीव्हसला पायचित पकडलं तर अखेरच्या चेंडूवर उप कर्णधार वॅरिकन झेलबाद झाला. आठ गडी गमावून विंडीज संघाने ८ बाद ९८ धावा केल्या.
कुलदीपकडून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब
रवींद्र जडेजाने चौथा बळी मिळवला तो लेनचा. त्याने सिराजकडे झेल. नववा गडी बाद झाल्यावर शेवटचा गडी बाद करुन औपचारिकता संपवली ती कुलदीप यादवने त्याने ४६ व्या षटकात पहिल्याच चेंडूवर सील्सला झेलबाद करत भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. (India’s big win)