लीड्स : भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यामध्ये शुक्रवारी पहिल्या डावामध्ये चहापानापर्यंत २ बाद २१५ धावा केल्या. सलामीवीर यशस्वी जैस्वालने चहापानापूर्वीच शानदार नाबाद शतक झळकावले असून कर्णधार म्हणून पहिलाच सामना खेळणाऱ्या शुभमन गिलने नाबाद अर्धशतक केले आहे. (India Test)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटीस शुक्रवारी सुरुवात झाली. या कसोटीद्वारे करुण नायरने तब्बल ८ वर्षांनी भारतीय संघात पुनरागमन केले. नायर यापूर्वी, २०१७ मध्ये भारतातर्फे अखेरची कसोटी खेळला होता. त्याचप्रमाणे, अष्टपैलू शार्दुल ठाकूरनेही २०२३ नंतर प्रथमच भारतीय कसोटी संघात स्थान मिळवले. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जैस्वाल आणि राहुल या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी रचली. (India Test)
सुरुवातीला सावध फलंदाजी करणाऱ्या या जोडीने नंतर खराब चेंडूवर चौकार वसूल करत धावगतीही वाढवली. ही जोडी उपाहारापर्यंत नाबाद राहणार असे वाटत असतानाच भारताने उपाहारापूर्वी लागोपाठच्या दोन षटकांमध्ये दोन विकेट गमावल्या. ब्रायडन कार्सने राहुलला बाद करून भारताला पहिला धक्का दिला. राहुलने ७८ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह ४२ धावा केल्या. तो स्लिपमध्ये रूटच्या हाती झेल देऊन बाद झाला. या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या साई सुदर्शनला फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्यात आली. मात्र सुदर्शनला या संधीचा लाभ घेता आला नाही. अवघे चार चेंडू खेळून सुदर्शन स्टोक्सच्या गोलंदाजीवर खातेही न उघडता परतला. सुदर्शन बाद झाल्यावर उपाहारासाठी खेळ थांबवण्यात आला. त्यावेळी, जैस्वाल ७४ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह ४२ धावांवर खेळत होता.
दुसऱ्या सत्रावर जैस्वाल आणि गिल यांनी पूर्णपणे वर्चस्व गाजवले. या सत्रातील २५ षटकांमध्ये जैस्वाल-गिल यांनी १२३ धावा वसूल केल्या. एकोणपन्नासाव्या षटकात तीन चौकार खेचत जैस्वालने शतकाला गवसणी घातली. त्याचे हे पाचवे कसोटी शतक ठरले. तो १५५ चेंडूंमध्ये १६ चौकार व एका षटकारासह नाबाद १०० धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी, शुभमननेही अर्धशतक पूर्ण केले. चहापानावेळी शुभमन ७४ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह नाबाद ५८ धावांवर खेळत होता.
धावफलक : भारत – पहिला डाव – यशस्वी जैस्वाल खेळत आहे १००, लोकेश राहुल झे. रूट गो. कार्स ४२, साई सुदर्शन झे. स्मिथ गो. स्टोक्स ०, शुभमन गिल खेळत आहे ५८, अवांतर १५, एकूण ५१ षटकांत २ बाद २१५.
बाद क्रम – १-९१, २-९२.गोलंदाजी – ख्रिस वोक्स १३-२-६०-०, ब्रायडन कार्स १४-४-५८-१, जोश टंग ११-०-४५-०, बेन स्टोक्स ७-१-२२-१, शोएब बशीर ६-२-१९-०.
हेही वाचा :
बांगलादेशची आघाडी दोनशेनजीक
भारत इंग्लंड ट्रॉफीचे ‘बारसे’