वेगवान गोलंदाज आकाश दीप याने पहिल्या डावात चार आणि दुस-या डावात सहा बळी घेऊन बर्मिंगहॅम येथील इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना जिंकण्यात प्रमुख भूमिका बजावली. आकाश दीपने गेल्यावर्षी इंग्लंडविरुद्धच कसोटीत पदार्पण केले. २३ फेब्रूवारी २०२४ रोजी रांची येथे झालेल्या चौथ्या कसोटीत त्याने बेन डकेट, ओली पोप आणि जॅक क्रॉली या आघाडीच्या तीन फलंदाजांना बाद करून आपली दहशत निर्माण केली होती. तीच दहशत कायम ठेवत त्याने इंग्लंडमध्ये इंग्लंडच्या फलंदाजांना जेरीस आणले. (Akash deep)
-डॉ. विजय चोरमारे
आकाश दीप याचा प्रवास अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी आहे. कौटुंबिक आणि इतर पातळ्यांवरही त्याच्या मार्गात अनेक अडचणी आणि अडथळे आले, परंतु तो खचला नाही. डगमगला नाही.
त्याचे वडील रामजी सिंग बिहारच्या सासाराम येथे सरकारी शाळेत शिक्षक होते. अभ्यास सोडून क्रिकेट खेळत असल्याबद्दल पालकांकडून आणि शेजाऱ्यांकडून त्याला बोलणी खावी लागत होती. (Akash deep)
बिहार क्रिकेट असोसिएशनचे निलंबन झाल्यानंतर बिहारमधील नवोदित क्रिकेटपटूंना योग्य व्यासपीठ उरले नव्हते. तोही त्या निर्णयाचा एक बळी होता. त्याचे क्रिकेटचे अति वेड पाहून काही पालक आपल्या मुलांना त्याच्यापासून लांब राहायला सांगत.
त्याच्या वडिलांना वाटत होते की मुलाने सरकारी नोकरी करावी. पण त्याला क्रिकेट सोडायचे नव्हते. वडिलांनी त्याला बिहार पोलिस कॉन्स्टेबलच्या परीक्षेला बसण्याचा सल्ला दिला. तो ऐकला नाही तेव्हा किमान राज्य सरकारच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याच्या नोकरीसाठी प्रयत्न करण्याचा सल्ला दिला. परंतु त्याचे स्वप्न मोठे होते. त्या स्वप्नाला गवसणी घालण्यासाठी त्याला कुटुंबापासून ते समाजापर्यंत अनेक पातळ्यांवर अडथळ्यांचा सामना करावा लागला. सहा महिन्याच्या अंतराने त्याचे वडील आणि मोठ्या भावाचा मृत्यू झाला. त्याच्यावर आभाळ कोसळलं. दोन बहिणी होत्या. त्यांच्यासह कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आली. तत्काळ काही काम शोधण्याशिवाय त्याच्यापुढे पर्याय नव्हता. (Akash deep)
त्याच्या जवळच्या मित्राने त्याला दुर्गापूरमधील क्रिकेट क्लबमध्ये सामील होण्यास मदत केली. जेणेकरून त्याचा दैनंदिन खर्च भागेल. त्याने दुर्गापूरमध्ये टेनिस-बॉल सामने खेळायला सुरुवात केली. त्यासाठी दररोज ६०० रुपये मिळू लागले. टेनिस-बॉल सामने खेळून तो महिन्याला सुमारे १८/२० हजार रुपये कमवत असे.
२०१० मध्ये तो बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या युनायटेड क्लबमध्ये सामील झाला. सुरुवातीला स्थानिक अकादमीमध्ये फलंदाज म्हणून प्रवेश केला. पण प्रशिक्षकांच्या विनंतीनुसार, तो जलद गोलंदाजीकडे वळला. व्हिजन २०२० कार्यक्रमांतर्गत बंगालचे माजी जलद गोलंदाज रणदेब बोस यांच्यासोबत काम केले आणि एका वर्षातच तो बंगालच्या अंडर-२३ क्रिकेट संघासाठी निवडला गेला. त्याचसुमारास त्याला पाठदुखीचा त्रास सुरू झाला. त्याला बंगालच्या अंडर-२३ संघाचे मुख्य प्रशिक्षक सौराशीष लाहिरी यांच्याकडून त्या काळात मार्गदर्शन आणि मदत मिळाली.
त्याने ९ मार्च २०१९ रोजी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालसाठी टी २० पदार्पण केले. २५ डिसेंबर २०१९ रोजी रणजी ट्रॉफीमध्ये बंगालसाठी पदार्पण केले.
तिथून त्याची गाडी सुसाट सुटली. मधल्या काळात रणजीसह आयपीएलमध्येही खूप काही घडले. (Akash deep)
२०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने त्याला आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यासाठी संघात समाविष्ट केले. २०२२ आणि २०२३ मध्ये त्याने RCB साठी ७ सामन्यांत ६ विकेट्स घेतल्या. त्याला विराट कोहलीकडून आयपीएल पदार्पणाची कॅप मिळाली. आयपीएलच्या ताज्या हंगामात तो लखनौकडून खेळला.
बुमराहच्या गैरहजेरीत इंग्लंडमध्ये कसोटीत दहा बळी घेऊन त्याने आपले श्रेष्ठत्व सिध्द केले. भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
आकाश दीप हा त्याच्या मोठ्या भावाच्या दोन मुली, आरोही आणि आर्या, यांचा सांभाळ करतो.
आकाश दीपची बहीण गेले काही आठवडे कर्करोगाशी झुंज देतेय. आजचा विजय त्यानं आपल्या कर्करोगाशी लढणाऱ्या बहिणीला समर्पित केलाय.
आकाश दीप याच्या प्रवासात आर्थिक अडचणी, कौटुंबिक दुःख आणि सामाजिक विरोध यांसारख्या अडथळ्यांचा सामना करावा लागला. तरीही, त्याने आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने बंगालच्या क्रिकेटपासून ते भारतीय कसोटी संघापर्यंत मजल मारली. त्याची कहाणी ही संघर्षातून यशाकडे जाण्याचा एक प्रेरणादायी प्रवास आहे, ती अनेक तरुणांना प्रोत्साहन देते.