जयसिंगपूर : प्रतिनिधी : राज्यातील आंबा उत्पादक शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि अवकाळी पावसाच्या संकटामुळे उद्ध्वस्त झाला असताना, राज्य सरकारने जाहीर केलेली हेक्टरी २२ हजार रुपयांची मदत म्हणजे ‘उंटाच्या तोंडात जिरे’ अशीच आहे. ही तुटपुंजी मदत जाहीर करून सरकारने आंबा बागायतदारांच्या जखमेवर मीठ चोळले असून, त्यांच्या तोंडाला पाने पुसली असल्याची खरमरीत टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली. (Government rubbed salt into the mango growers’ wounds)
एका हेक्टरवर आंबा बागेची मशागत, औषध फवारणी आणि खतांसाठी शेतकऱ्याला वर्षाकाठी किमान चार ते साडेचार लाख रुपये प्रत्यक्षात खर्च येतो. अशा परिस्थितीत केवळ २२ हजार रुपये देऊन सरकार शेतकऱ्यांचे काय साध्य करू इच्छिते? कोकणातील हापूस आणि राज्यातील केसर आंबा उत्पादक जागतिक स्तरावर राज्याचे नाव उंचावत आहेत. मात्र, संकटकाळी त्यांना वाऱ्यावर सोडण्याचे पाप हे सरकार करत आहे. ही मदत म्हणजे मदतीच्या नावाखाली केलेली क्रूर थट्टा आहे. (Government rubbed salt into the mango growers’ wounds)
एकीकडे गरजेचा नसलेला शक्तीपीठ महामार्ग करण्यास दरिद्री फडणवीस सरकारकडे एक लाख १५ हजार कोटी आहेत , मागील कुंभमेळा २५ हजार कोटी रूपये खर्चून करण्यात आला होता मात्र यंदाच्या नाशिकच्या कुंभमेळ्याला २५ हजार कोटी खर्च करत आहेत. देवेंद्र फडणवीस ही उधळपट्टी फक्त टक्केवारीसाठी करत आहेत. राज्यात १ लाख २४ हजार हेक्टर आंबा पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र आंबा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लाख रूपये प्रमाणे मदत करण्यासाठी ६ हजार कोटी रूपये सरकारकडे नाहीत ही कृषीप्रधान राज्याची शोकांतिका असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे. (Government rubbed salt into the mango growers’ wounds)
कोकणातील शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी गेल्या दोन महिन्यांपासून रस्त्यावर उतरला असून ही मदत म्हणजे त्यांच्या संघर्षावर मीठ चोळल्यातील प्रकार झाल्याने लवकरच मुंबई येथील मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचा विराट मोर्चा काढणार असून येत्या दोन दिवसात या मोर्चाची तारीख जाहीर करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले. (Government rubbed salt into the mango growers’ wounds)