बीड : बँकेत ठेवलेली ११ लाखाची ठेवत परत मिळत नसल्याने बँकेच्या दाराला गळफास लावून शेतकऱ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. गेवराई येथील छत्रपती मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या दारात ही घटना घडली. सुरेश आत्माराम जाधव (वय ४६) असे दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे. मुलांचे शिक्षण, मुलीच्या विवाहासाठी जाधव यांना ठेवीची रक्कम परत हवी होती. (Gevrai sucide case)
गेवराई तालुक्यातील खळेगाव येथील सुरेश आत्माराम जाधव हे अल्पधारक शेतकरी असून त्यांची साडेतीन एकर शेती होती. तीन एकर शेती विकून त्यातून मिळालेले साडेअकरा लाख रुपये २०२० मध्ये गेवराईच्या छत्रपती मल्टिस्टेट बँकेत पाच लाख रुपये, ज्ञानराधा मल्लिस्टेट बँकेत मुदत ठेव ठेवी होती. मुलगी साक्षी (वय २१) आणि मुलगा शुभम (१८) यांच्या भविष्याच्या तरतुदीसाठी त्यांनी ठेव ठेवली होती. साक्षीचा विवाह ठरला असून नीटची परिक्षाही उत्तम गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. मुलगा सीईटीची तयार करत होता. मुलीचा विवाह आणि शिक्षणासाठी त्यांना मुदत ठेवीची रक्कम हवी होती. (Gevrai sucide case)
गेल्या दोन वर्षापासून सुरेश जाधव रक्कम परत मिळवण्यासाठी बँकेत खेटे मारत होते. परंतु बँक प्रशासन त्यांना टोलवत होते. बँकेच्या कारभाराला कंटाळून त्यांनी सहा महिन्यापूर्वी विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तेव्हा बँकेने अडीच लाख रुपये दिले होते. शिल्लक नऊ लाख रुपये परत मिळावेत यासाठी सुरेश जाधव बँकेला विनवणी करत होते. पण बँकेने टोलवाटोलवी सुरू केली होती. (Gevrai sucide case)
बँक व्यवस्थापकाला मेसेज करुन आत्महत्या
छत्रपती मल्टिस्टेटच्या बँकेच्या प्रशासनाला कंटाळून मंगळवारी शाखा व्यवस्थापक ज्योती क्षीरसागर यांना व्हॉटस अपवर मेसेज केला. मेसेज मध्ये त्यांनी असे म्हटले होते की, ‘माझ्या मुलांच्या शिक्षणाचे वाटोळे केल्याबद्दल धन्यवाद! एवढा अंत एकाद्याचा बघू नये. खरी परिस्थिती जाणून घ्यायला हवी होती. मी तुमच्यासमोर आत्महत्या करत आहे. हा निरोप चेअरमन भंडारी यांना द्या’. त्यानंतर त्यांनी विमनस्क अवस्थेत बँकेच्या गेटला गळफास लावून आत्महत्या केली.
गेवराईमध्ये खळबळ
बँकेच्या गेटलाच सुरेश जाधव यांनी गळफास लावून आत्महत्येच्या वार्तेने गेवराईसह बीड जिल्ह्यात खळबळ उडाली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. बँकेचे संचालक मंडळ आणि व्यवस्थापनावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी बँकेचे अध्यक्ष संतोष भंडारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
पैसाही गेला, बापही गेला
सुरेश जाधव यांची मुलगी साक्षी नीटची परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिला बीएचएमएसला प्रवेश मिळण्याची शक्यता होती. तसेच भाऊही सीईटीची तयार करत आहे. त्यासाठी पैसे हवे होते. आम्ही बँकेत चकरा मारल्या. परंतु तेथील व्यवस्थापकांनी अपमनास्पद वागणूक दिली. बँकेतून हाकलून दिले. पैसेही मिळाले नाहीत आणि बापाचे छत्रही हरवले. आमच्या भविष्यासाठी वडिलांनी जमीन विकली. आता एक एकरच जमीन शिल्लक आहे. त्यावर आम्ही तिघांचे पोट कसे भरणार, असा सवाल साक्षीने केला.