मुंबई : विशेष प्रतिनिधी : नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची महाराष्ट्र सरकारने लिलावात जिंकलेली तलवार सोमवारी (११ ऑगस्ट) लंडन येथे जाऊन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ताब्यात घेतली. सोमवारी (१८ ऑगस्ट) ही तलवार मुंबईत दाखल होणार आहे. (Firang Sword)
ही ऐतिहासिक तलवार लिलावात निघाल्याची माहिती गेल्या २८ एप्रिलला समजल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन ही तलवार शासनाला मिळावी, या दृष्टीने नियोजन करण्यात आले. त्यांच्या सूचनेनुसार शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला. हा लिलाव जिंकला होता त्यांना लंडन येथे प्रत्यक्ष भेटून त्याच्या कायदेशीर बाबी पूर्ण करुन शेलार यांनी ही तलवार ताब्यात घेतली. अशा प्रकारे परदेशात गेलेली ऐतिहासिक वस्तू लिलावात जिंकून मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दौऱ्यात महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे उपसंचालक हेमंत दळवी हेही सहभागी झाले आहेत. (Firang Sword)
दरम्यान, सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन ही तलवार सोमवारी, दि. १८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय मुंबई विमानतळावर दाखल होईल. स्वतः सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत बाईक रॅली काढून वाजतगाजत ही तलवार दादरच्या पु. ल. देशपांडे कला अकदमीमध्ये आणण्यात येणार आहे. तर याच दिवशी ऑगस्टला मान्यवरांच्या उपस्थितीत “गड गर्जना” हा कार्यक्रम होणार आहे.
तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व
रघुजी भोसले प्रथम (१६९५ ते १४ फेब्रुवारी १७५५) हे नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार होते. रघुजी भोसले यांचे शौर्य आणि युद्धनीती यांवर प्रसन्न होवून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही पदवी दिली होती. रघुजी भोसले प्रथम यांनी १७४५ आणि १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला. याचबरोबर रघुजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांदा, छत्तीसगढ, संबळपूर याही प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचाही पराभव करून दक्षिण भारतात आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला. नागपूर भोसलेंच्या भौगोलिक सीमांमध्ये लोखंड, तांबे यांच्या खाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या. यांचा वापर वस्तूंसोबतच शस्त्रे बनवण्यासाठीही केला जात असे. नागपूरकर भोसले घराण्यातील राजशस्त्रे निर्मिती आणि सौंदर्य यांचा अजोड मिलाफ आहेत. रघुजी भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या ‘फिरंग’ पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून पात्याच्या खजान्याजवळ पाते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातल्या उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती. पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ हा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे. पात्यावरील लेख ही तलवार रघुजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती. (Firang Sword)
नागपूरकर भोसलेंची १८१७ मध्ये सीताबर्डी येथे ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढाई झाली. या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाल्यावर कंपनीने नागपूरकर भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली. यामध्ये अनेक मौल्यवान वस्तू, दागिने तसेच शस्त्रांचाही समावेश होता. नागपूरचे संस्थान खालसा झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीला वेळोवेळी नजराणे आणि भेटीही मिळाल्या होत्या. रघुजी भोसलेंची तलवार युद्धानंतरच्या लुटीमध्ये अथवा ब्रिटिशांना दिलेल्या भेटींमध्ये देशाबाहेर गेली असण्याची शक्यता जाणकार व्यक्त केली जात आहे.