नागपूर; विशेष प्रतिनिधी : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा ज्या पद्धतीने उल्लेख केला तो अत्यंत आक्षेपार्ह आहे. भाजपाला देशाच्या संविधान निमार्त्याबद्दल किती राग आहे तेच बाहेर आले असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल भाजपाचा खरा चेहरा जनतेच्या समोर आला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (दि.१८) केली. (Nana Patole)
विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या विधानाचा काँग्रेस पक्ष जाहीर निषेध करत आहे. त्यांनी सर्वांना जगण्याचा, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला, त्यामुळेच आपण सर्वजण स्वाभिमानाने आपल्या देशात नांदत आहोत. भारतीय जनता पक्षाच्या मनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल जी खदखद आहे. तीच त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झाली आहे. अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केल्याने त्यांनी देशाची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही पटोले यांनी केली.
विधानसभा अध्यक्ष व विधान परिषद सभापती यांची निवड बिनविरोध करण्याची परंपरा महाराष्ट्रात राहिली आहे. विधानसभेचा उपाध्यक्ष, परिषदेचा उपसभापती विरोधी पक्षांचा करण्याची परंपरा आहे. ती खंडीत झालेली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे भूमिका मांडली आहे. ते याबाबत सकारात्मक आहेत. सभागृह चालवण्यासाठी विरोधी पक्षनेता नाही अशी व्यवस्था योग्य नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात विरोधी पक्ष नेता असला पाहिजे, त्यावर विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे, असेही पटोले म्हणाले. (Nana Patole)
हेही वाचा :
- अमित शहांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘मविआ’ आमदारांचे ‘वॉक आऊट’
- lead in turmeric : तुम्ही वापरताय ती हळद रंग तर नाही ना?
- रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती