जमीर काझी : नागपूर : रणांगणात लढण्यासाठी विरोधकांकडे सेनापती ( विरोधी पक्षनेता) नसल्याने अधिवेशनातील लढाई पूर्णपणे एकतर्फी होईल, अशी सत्ताधाऱ्यांना वाटत असलेली आशा दुसऱ्याच दिवशी पूर्णपणे फोल ठरली.
मुख्यमंत्र्यांकडून स्वपक्षीय आमदाराची कानउघाडणी
पाशवी बहुमतामुळे महायुतीच्या मंत्र्याबरोबरच आमदार, पदाधिकाऱ्याच्या वर्तनात आलेल्या निर्ढावलेपणा आता त्यांना अडचणीचा ठरणार असल्याची उदाहरणे वारंवार समोर येत आहेत. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा नोटाच्या बंडलासमवेतचा कथित व्हिडीओचा कॅश बॉम्ब आणि सत्ताधाऱ्याकडून एखाद्या म्हणीप्रमाणे लाडकी बहिणीचा वारंवार केल्या जाणाऱ्या उल्लेखामुळे दस्तरखूद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त होऊन स्वतःच्या आमदाराला उघडपणी केलेली दरडावणी दुसऱ्या दिवशी चर्चेंची बाब ठरली. (Fadnavis’ understanding with Abhimanyu Pawar)
रायगडमधील शिवसेना, राष्ट्रवादीमधील वाद तीव्र होणार
पावसाळी अधिवेशना अखेरीस राज्याचे समाजकल्याण मंत्री व शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांच्या टॉवेल गुंडाळून नोटांनी भरलेली बॅग घेऊन बसलेल्या फोटोमुळे मोठी खळबळ उडाली होती. यावेळी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी सकाळीच ‘एक्स’वर नोटांची भरगच्च बंडले घेऊन बसलेल्या एका व्यक्तीचा फोटो शेअर करीत मोठा ‘कॅश बॉम्ब’ फोडला. कोणत्याही आमदाराचे नाव न घेता त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा’ बंडल’बाज कोण?, अशी विचारणा केली होती. त्यावर व्हिडीओतील व्यक्तीच्या शरीरयष्टी व पेहरावावरून अलिबागचे आमदार महेंद दळवी यांनी स्वतः च हा मी नसून ‘एआय’ च्या माध्यमातून मॉब करून मला अडकवले जात असल्याचा आणि त्यामागे महायुतीतील एका पक्षाकडून सुपारी दिली गेली असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे एकीकडे महायुतीत सर्वकाही आलबेल असल्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत असलेतरी प्रत्यक्षात अंतर्गत त्यांच्यात बरेच फाटत चालले असल्याचे समोर आले आहे. उरणचे आमदार महेंद्र थोरवे यांनीतर यामागे खासदार सुनील तटकरे यांचाच हात असल्याचे सांगून वादाची ठिणगी आणखी भडकवली आहे. त्यामुळे आगामी काळात रायगड जिल्ह्यात झेडपी आणि अन्य निवडणुकात राष्ट्रवादीचे तटकरे विरोधात शिंदेच्या सेनेची लढाई आणखी पुढचे टोक गाठणार आहे. (Fadnavis’ understanding with Abhimanyu Pawar)
दळवी प्रकरणाने महायुतीवर आणखीन एक ठपका
या ‘कॅशबॉम्ब ‘ची दिवसभर चर्चा रंगलीच शिवाय विधान परिषदेत शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित करीत सत्ताधाऱ्याकडून निवडणुकीत केल्या जात असलेल्या पैश्याच्या वापराबद्दल हल्लाबोल केला. हा आमदार कोण आहे, आणि त्याच्याकडे इतकी कॅश कोणाकडून जमा झाली, याबद्दल सरकारने तपास करण्याची मागणी केली. भलेही अन्य प्रकरणाप्रमाणे यामध्येही आमदार दळवी यांना ‘क्लीनचिट’ मिळण्याची दाट शक्यता आहे. मात्र’ बुंद से गयी वो हौदसे नही आती’ प्रमाणे महायुतीवर आणखी एक ठपका पडला आहे. (Fadnavis’ understanding with Abhimanyu Pawar)
मुख्यमंत्र्यांची सर्व सताधाऱ्यांना चपराक?
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पारड्यात भरघोस मतदान पडण्यामागील एक मुख्य कारण असल्याचे जे सांगितले जाते त्या लाडकी बहिण योजनेमुळे हा शब्द एखाद्या वाक्यप्रचाराप्रमाणे प्रत्येक विषयात वापरला जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पदाच्या तिसऱ्या सीजनमध्ये ‘देवाभाऊ’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या मुख्यमंत्री फडणवीस त्यामुळे वैतागून गेले आहेत. काहीसे चिडल्याचे दिसून आले. त्यांनी या मुद्द्यावरुन त्यांचे पूर्वीचे स्वीय सहाय्यक आणि भाजप आमदार अभिमन्यू पवार यांचे सभागृहात जाहीरपणे कान टोचले. प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण आणू नका, लाडक्या बहिणींच्या विरोधात जाऊ नका, अन्यथा घरी बसावे लागेल, असा इशारा दिला. त्यामुळे आपल्या भागातील अवैध दारुविक्रीचा मुद्दा सभागृहात पोटतिडकीने मांडणाऱ्या पवाराची अवस्था’ आ बैल मुझे मार ‘ अशी झाली. त्यांनी लाडक्या बहिणींची सगळ्यात मोठी समस्या अवैध दारु ही आहे. आमच्या महिला भगिनी अवैध दारुविक्रीबाबत विचारणा करतात. आपल्या लाडक्या बहिणींचं हे दु:ख आहे. त्यामुळे याबाबत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे. विधानसभा अध्यक्षांनी याबाबत बैठक घेतली होती. त्यानंतर गृह विभाग, अन्न औषध प्रशासनाला निर्देश देण्यात आले होते. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी निर्देश देऊनही कारवाई झाली नाही, असे सांगणाऱ्या आमदार अभिमन्यू पवार यांच्यासकट सर्व सत्ताधाऱ्यांना चपराक बसली आहे.