Home » Blog » Delhi Sahitya Sammelan नवसमाज निर्मितीत साहित्याला श्रेष्ठ स्थान

Delhi Sahitya Sammelan नवसमाज निर्मितीत साहित्याला श्रेष्ठ स्थान

दिल्लीत १९५४ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ यांनी केलेले भाषण. (Delhi Sahitya Sammelan)

by प्रतिनिधी
0 comments
  • काकासाहेब गाडगीळ

दिल्लीतील महाराष्ट्रीयांतर्फे व या संमेलनाच्या स्वागत-समितीतर्फे मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. दिलदारपणा व खेळाडूवृत्ती महाराष्ट्राच्या नैतिक जीवनाचा कणा आहे. याच वृत्तींवर पूर्ण श्रद्धा ठेवून आम्ही दिल्लीतील मंडळींनी महाराष्ट्र शारदेस आमंत्रण दिले व ते स्वीकारले गेले. आज आपण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींना निवडून व्याकरण व रस, तर्क व प्रवाह यांचा समन्वय घडवून आणला आहे. मांडव आमचा आहे पण कार्य आपले आहे. दिल्ली येथे हे संमेलन बोलविण्यात मायमहाराष्ट्रातील कुठल्याही पुंडलिकाचे दैवत हिरावून घेण्याचा उद्देश नाही. विविध भाषा व त्या बोलणारे यांच्यात असलेले गैरसमज व सांप्रदायिक संघर्ष नाहीसे व्हावेत यादृष्टीने आम्ही आमंत्रण दिले आहे. पवित्र यमुनातीरी, कुरुक्षेत्राच्या परिसरात सत्ययुगापासून कलियुगापर्यंत घडलेल्या इतिहासाच्या गौरवांच्या छायेखाली हा संता सद्धि : संग घडून येत आहे. (Delhi Sahitya Sammelan)

खर्‍या इतिहासाची साक्ष

मराठी भाषा व मराठी संस्कृती याबद्दल खरा इतिहास एकतर्फी साक्ष देत नाही. मराठ्यांचा स्वभाव, त्यांची राहणी, त्यांची भाषा याबद्दल जे लिहिले गेले आहे ते सर्वस्वी खरे आहे असे नाही. तथापि जे लिहिले गेले आहे त्याचा परिणाम झाला आहे. उद्योतनसुरीने आठव्या शतकांत लिहिलेल्या कुवलयमाला या ग्रंथात मराठे कसे दिसतात, बळकट, सुजट, काळवट, अभिमानी, सहनशील व कलहशील बोलतात. दिण्गले गहिले येणेप्रमाणे वर्णन दिले आहे. किंबहूना मरहठ्ठ हा शब्द अहंकाराचा द्योतक त्याकाळी झाला होता. जवळ जवळ असेच वर्णन चिनी प्रवासी याने लिहिले आहे. आणि गेल्या हजार वर्षांच्या कालखंडात हा स्वभाव विशेष काही निराळ्या रितीने दृगगोचर झाला असे नमूद करून ठेवले नाही. किंबहुना प्रसंगी हे दोष गुण समजून आम्ही स्वत:स धन्य मानले आहे.(Delhi Sahitya Sammelan)

याचा परिणाम पुष्कळ वेळा चांगला तसाच वाईटही झाला. अभिमानाला बळी पडून चांगला व अन्यथा कृति झाली. मर्यादेपलिकडे सहनशीलता दाखवून न्यायाचे ते गमावले व त्याचप्रमाणे कलह करून जतन केलेले नष्ट केले. मराठ्यांनी हिंदूंची लाज राखली, प्रौढप्रताप श्री शिवाजी महाराजांनी या देशाचे इस्लामीकरण थांबविले, हिंदू संस्कृति संरक्षिली याची जाणीव कोठेच जागृत नाही. छत्रसालच्या हाकेला ओ देऊन बुंदेलखंडाची व हिंदूची लाज पहिले बाजीराव यांनी राखली. पण या सर्व कर्तृत्वाचा इतिहास डोळ्यांआड झाला आहे. इतकेच नव्हे तर, मराठ्यांबद्दल जितके वातावरण कलुषित होईल तेवढे करण्याचा काहींचा चंग आहे. भारतात राष्ट्रीयत्वाची भावना मराठ्यांव्यतिरिक्त निदान त्यांच्याइतकी इंग्रजी अंमलापूर्वी कुणीच दाखविली नाही. आणि आज त्याच्यावर राष्ट्रीय एकतेच्याविरूद्ध असल्याचा आरोप केला जात आहे. स्वातंत्र्याचा गेल्या दीडशे वर्षांचा इतिहास मराठे अग्रभागी होते हेच दाखवित आहे.(Delhi Sahitya Sammelan)

दिल्लीतच का यावयाचे?

तथापि आजच्या जगात प्रचारात आम्ही मागे पडत असल्याने आमचे कणाचे दोष मनाचे भासविले जात आहेत. गुण अंधारात व अज्ञातवासात वावरत आहेत. यांतून मार्ग निघावा, आपल्या भाषेत व संस्कृतीत, जीवनात व व्यवहारांत, जे व्यापक व विशाल आहे, जे ज्येष्ठ व श्रेष्ठ आहे. जे उत्कट व उदात्त आहे, त्याचे दर्शन महाराष्ट्राबाहेरील भारतीय जनतेला व्हावे हा हेतू पण संमेलन बोलविण्यात आहे.

दिल्ली आज आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचे केंद्र. राज्यकारभाराचे शक्तिस्थान व प्रयत्नांची पायरी आहे. येथे काढलेला आवाज भारतभर घुमतो. दिल्ली भारताच्या जननगरीतील बुलंद दरवाजा आहे. तात्पर्य, आम्हांला जे हवे आहे ते कोणत्याही क्षेत्रातील असो, विचारांचे व दृष्टीकोनाचे वकील येथे असले पाहिजेत.

संयुक्त महाराष्ट्राची मागणी

त्रिभंगलेला महाराष्ट्र हा अखंड महाराष्ट्र व्हावा ही आजची राजकीय भूक आहे. स्वातंत्र्यानंतर त्या स्वातंत्र्याची संघटना करावयाचा प्रश्न उभा राहिला. इतिहास, भूगोल, पंरपरा, आधुनिक राज्यशास्त्राचे सिद्धांत व राज्यकारभारातील संकल्प व संकेत लक्षात घेऊन हे संघटन करावयाचे आहे. विद्यमान राज्यरचना, अनैसर्गिक खर्चाची अशास्त्रीय व जी भावी अर्थव्यवस्था संकल्पिली आहे. त्याला विरोध असल्याने नवी राज्यरचना अपरिहार्य हे जाणूनच राज्यपुर्नरचना मंडळ नेमण्यात आले. त्यापुढे आपण एकमताने आपले म्हणणे मांडले आहे ही खंडित महाराष्ट्र मंडळे एक व्हावीत. राज्यास कष्टकरी प्रजेत संतोष आहे. भारताचे मानचित्र व्यवस्थित, सुशोभित, संघटित करा. हा संदेश आपले महामंत्री यांनी जाहीर केला आहे. आपणही अत्यंत संयमाने, न्यायबुद्धीने आपले निवेदन सादर केले आहे व आता त्यावर निर्णय येईल त्याप्रमाणे आपले पुढचे पाऊल कसे पडेल हे अवलंबून राहील. तथापि जो जागेल तो जगेल हे विसरता कामा नये.(Delhi Sahitya Sammelan)

आज आपल्याला एवढेच सांगावयाचे आहे की राष्ट्रीय ऐक्यासाठी, भारताच्या उज्जवल भविष्यासाठी आर्थिकदृष्ट्या जी नवी व्यवस्था होणार आहे. तिच्यासाठी राज्याची पुर्नरचना अवश्य आहे व याचदृष्टीने आमची संयुक्त महाराष्ट्राची मागणी आहे. कुठलाही राजकीय वास किंवा विसंगती यात नाही. समाजजीवन सुखी व्हावे, संस्कृतीचा उत्कर्ष व्हावा यासाठी राज्यव्यवस्था अनुकूल असली पाहिजे आणि त्यासाठी समाजामधील अर्थव्यवस्था ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते. आजची भारतातील अर्थव्यवस्था विषम आहे. त्यात सामाजिक न्याय नाही. लोकशाही ही केवळ राजकीय क्षेत्रात राहून भागत नाही. सार्वत्रिक व प्रौढ मतदानाने राजकीय समता आली तरी तेवढ्याने लोकशाहीय पूर्णता येत नाही. रस्ता राजरस्ता आहे व कोणीही जावे, एवढयाने प्रत्येकाला वाहन मिळेल असे नाही. म्हणून लोकशाहीला पूर्णता येण्यासाठी सामाजिक क्षमता, आर्थिक क्षमता व सामाजिक न्याय या गोष्टी समाजात आल्या पाहिजेत.

विधानद्वारा क्रांती

आज भारतात नव्या तत्वज्ञानाची नव्या अध्यात्माची जरूरी आहे. उदा. समाजात सामाजिक न्याय सतत राहील, गुणालाच संधी मिळेल, अर्थाच्या जोरावर व्यक्ति अक्षर गट राज्ययंत्र राबवणार नाहीत. जेथे व्यक्तीची पात्रता तिच्या खिशात काय आहे यावर न ठरता तिचे शील, तिचे शिक्षण, तिची नैतिक योग्यता यावर ठरेल जेथे श्रीमंती नसेल व असली तरी मिरवली जाणार नाही, जेथे दारिद्—य नसेल असले तरी तिरस्कृत अडणार नाही असा समाज आज निर्माण करावयाचा आहे व त्यासाठी विद्यमान विधानांचा क्रांतिकारक उपयोग करणे जरूरी आहे. क्रांति नको असेल तर विधानद्वारा क्रांतिकारक असे काहीतरी झाले पाहिजे. (Delhi Sahitya Sammelan)

अमृताला जिंकणारे शब्द

या नवसमाज निर्मितीत सर्वात श्रेष्ठ स्थान साहित्याला आहे. संविधानात कल्पिलेले स्वातंत्र्य आता अनुभवात आणावयाचे आहे. व्यक्तिव्यक्तीने त्याची मागणी केली पाहिजे.राज्या राज्याने याचा मार्ग मोकळा केला पाहिजे हे सर्व घडून येण्यासाठी साहित्याने पुढे आले पाहिजे. मनाचा संकल्प क्रियेची बैठक असते. साहित्य हे जीवनाचे पार्श्वसंगीत आहे. जी ज्याची श्रद्धा तसा तो होतो. जसे समाजाचे साहित्य त्याप्रमाणे समाजाचे जीवन अंतर व ह्या दोन्हीसह नेते ते साहित्य जीवनाव्यतिरिक्त त्याला अस्तित्व नाही. जीवनात निर्माण होऊन जीवनाला बदलणारे हे स्रष्टा व सृजन दोन्ही आहे. शब्द व अर्थ यात विच्छेद नसतो. माझा भारत, माझा महाराष्ट्र एवढे शब्द उच्चारताच अगर ऐकताच केवढी आशयवादी आपल्या डोळ्यापुढे उभी राहते. हे शब्द शुद्ध प्राकृत खरे, परंतू ते प्रतिज्ञेने अमृताला ही जिंकतील हाच निर्णय तुम्ही घ्याल. मृदुपणात सप्तसुरातील आनंदही यापुढे फिका. यांतील छंदाने सुवासालाही मागे टाकलेले तुम्ही पाहाल.

मराठी साहित्याने पुढाकार घ्यावा

नवसमाजाच्या निर्मितीसाठी नव्या युगाच्या आगमनासाठी तयारी करण्याची ही कामगिरी साहित्यावर आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशी विविध क्षमता लोकशाहीचा पिंड आहे. लोकशाही समाज यथार्थतया निर्माण व्हावा म्हणून ‘झाडू संतांचे मारग, आडरानी भरले जग’ या न्यायाने साहित्यिकांनी विनयभावाने काम करावयाचे आहे. हे काम भारतातील सर्वभाषिक साहित्यिकांचे आहे, सर्व भाषिय साहित्याचे आहे. तथापि विद्यमान साहित्यांत मराठी साहित्याला या कामी पुढाकार घेतला पाहिजे अशी स्थिती आहे असे मी म्हटले तर अहंकाराचा आरोप येण्याची शक्यता आहे. तथापि, यांत अहंकार नाही. किंचित अहमहमिका आहे. तशीच थोडी श्रद्धा आहे. कारण वर निर्विष्ठ केलेल्या विविध क्षमतेबाबत मराठी जुने व आधुनिक साहित्य उदासीन नाही. उलट ते तर उत्साहजनक आहे. सामाजिक क्षमतेबाबत मराठी संतांनी केलेली कामगिरी सर्वांपुढे आहे. सत्ता असून धार्मिक अत्याचार मराठे शाहीत झाले नाहीत. धर्माभिमान आणि सहिष्णूता, प्रपंच आणि परमार्थ, विलाप आणि वैराग्य, भोग आणि त्याग इत्यादींचे निवासस्थान, महाराष्ट्रसमाज व संस्कृति प्राचीन काळापासून आहे आणि म्हणून एकांगी विचारधारा महाराष्ट्राच्या मनोभूमीत रूजू शकत नाही.

समाजाची वाड्.मयमूर्ती

पाहा, किती सहज मराठ्यांनी काळाची पावले ओळखून वागणूक केली. ज्या दिवशी इंग्रजांचे निशाण पुण्याच्या वास्तूवर फ डकले त्याच दिवशी त्या निशाणाचे उच्चाटनाचा मुहूर्त नियतीने ठरविला. वाईतील एका प्रसिद्ध घराण्याच्या कागदपत्रांत त्या वेळच्या घटनेबद्दल असा उल्लेख आहे मुली व मामलती या आपल्या नाहीत. सर्व क्षणभंगूर आहेत. आज आलेले जाण्याचे प्रस्थान ठेवूनच आलेले आहेत. ज्यांना त्यांनी जाणावे. आनंदाची गोष्ट की हे जाणले गेले. दीडशे वर्षातील मराठी साहित्य याच गोष्टीची साक्ष देईल. कवींनी, कादंबरींकारांनी, वृत्तपत्रकारांनी व निबंधकारांनी वाड्.मयाच्या सर्व क्षेत्रांत आपल्या प्रज्ञेचा व प्रतिमेचा उच्चतम विलाप केला आहे. (Delhi Sahitya Sammelan)

कोणती प्रेरणा, कोणता विचार व भाषाविलासामागे होता, कोणता हेतू केशवसुतांच्या तुतारी मागे होता. महात्मा फुल्यांची लेखणी कोणाच्या दास्यषमोचनासाठी झिजली, आगरकरांचा आक्रोश का बुलंद झाला, कशासाठी लोकमान्य टिळकांनी गीतासागरात बुड्या मारून गीतारहस्य लिहिले, गोविंदा प्रजादिक कवीची पदावलि कोणत्या दिवसासाठी वाटचाल करीत होती. आजच्या राजकारणांत प्रभावी व प्रगतीपर साहित्य हे चैतन्य आहे. साहित्याने हे जाणले पाहिजे. कोणी साहित्याला राजकारणाचा गुलाम केले. असाहि आरोप करतील. स्वतंत्र राष्ट्रांत राजकारण, समाजकारण व अर्थकारण गोत्र न पटण्याइतके विभिन्न असत नाहीत. शरिरांत ज्याप्रमाणे त्रिदोष समप्रमाणात असले म्हणजे शरीर सुदृढ राहते तसेच ही तिन्ही ‘कारणे’ समतोलत असली म्हणजे ते राज्य तो समाज सुस्थित व सुदृढ राहतो. या कामी प्रत्येकाला असें कांही कर्तव्य आहे. नागरिकाला साहित्यिकाला सैनिकाला व पंडिताला पण ! साहित्य हेतुशून्य असते हे खरे नाही. साहित्य म्हणजे समाजाची वाङ्ममूर्ति समाज-पुरुषाचा बाणीविलास होय.

या प्रयत्न यज्ञांत सर्वे या

समाजाला सोडून साहित्य नसल्याने समाजाचा हेतू हाच साहित्याचा हेतु ठरतो. समाजाच्या वैचारिक चलनांतच साहित्याची मूल्ये मोजली जातात. साहित्य हे शस्त्र व शास्त्र आहे म्हणून ते स्वयमेव प्रचारक असतें. कवि अगर साहित्यिक कितीहि व कसाहि दावा करोत, त्यांचा हृदयस्थ हेतु आपल्या भावनांचा आविष्कार जगापुढे यावा हाच असतो. केवळ निरपेक्ष असे मन काही कल्पूच शकत नाही. निर्गुण-निराकार, शुद्ध-बृद्ध, ब्रह्म दिशानेच वर्णावें लागते. जेथून शब्द परततात स्वापुढे काय आहे हि सांगण्यापाठी शब्द व त्यातही हेतु आलाच! कविश्रेष्ठ तुलसीने ‘स्वतिः सुखाय’ जरी रघुनाथ गाथा भाषा- प्रबंध रचून मंजुळ केली तरी त्यांचे स्वांतःसुख म्हणजे जनतेचें सुख होतें. जलाबरोबर द्रवता, आकाशाबरोबर अनंतत्व, इतकें साहचर्य साहित्य व समाज यांत असून त्यांच्यांतील अन्योन्य संबंध हेतुव्दाराच कार्यान्वित होतात. दलित व दडपलेल्या उदासीन व उपेक्षिलेल्या जनतेची दुःखे अपार आहेत. वर्जित व वंचित जनता रावणाप्रमाणे -उन्मत्त झालेल्या लक्ष्मीधराच्या गुलामगिरींत सीतेप्रमाणे झुरत आहे. आपल्या विमोचनाची वाट पाहत आहे.

कौचमिथुनातील एकास काममोहित निषादाने मारले व पहिले काव्य आद्य मुखावाटे बाहेर पडले. आज हजारों नरनारी क्षणाक्षणाला मानव निर्मित विषमतेला कायम ठेवणार्‍या ये निषादांकडून मारली जात आहेत. वााल्मिकीच्या साहित्यिक वारसांनो! कुठेच नाही तुमची प्रतिभा जनमनाला उसळून लावणारा तुमचा काव्यप्रबंध कोठे आहे ? भावी समाजाचें चित्र नाव्यरूपाने उभे करून अथांग प्रयत्नांना प्रेरणा करणारी तुमची सृजन शक्ति कोठे आहे या प्रयत्न-यज्ञांत सर्वे या. जे मागच्यांनी ठेवले त्यात भर घाला. जे मी कोही बोललो आहे ते केवळ ज्ञानेश्वरांच्या अनुपम शब्दांत सांगाव याचे म्हणजे ‘का अफाटा समीरता । आपलेपण शाहाणा केले जैसे विंजणा। निर्मूनियां ॥

गगनव्यापी वायूला अल्पशा पंख्याने धरण्याचा हा प्रयत्न आहे. तथापि यामुळे तुमची मनें किंचित् सुखावली गेली तर जीवनांतील एक मोठा आनंद मला प्राप्त होणार आहे.

विचारांची शीळ घुमवा

मराठी साहित्याला केवढे उज्ज्वल भविष्य आहे. भविष्य निर्माण ही त्याची पदवी आहे. मराठी साहित्याचे धारिदृष्टच चढावयाचे आहे. विद्यमान मायावी जगात मूलतत्त्व ओळखून वागण्याची शिकवणूक आज जनतेला द्यावयाची आहे. येथे निःस्पृहता पाहिजे. महत्ता असल्याशिवाय होणार नाही. ‘केवळ महाराष्ट्रासाठी ही संकुचित वृत्ति सोडली पाहिजे, आपलें वैशिष्ठ्यसुद्धा व्यापकतेतच अधिक राहते. दिल्लीस आता तक्त फोडावयाचे नाही; कारण आता तक्तच नाही. आता प्रजा राजा झाली आहे म्हणून त्या सार्वभौम प्रभुत्वपूर्ण तक्तशीन प्रजेचे राज्यकार्य चांगले चालावे म्हणून चांगल्या अर्थाने पेशवाई करावयाची आहे. या नव्या प्राप्त होणार्‍या योग्यतेसाठी साहित्यिकांनी जनमने तयार करावयास पाहिजेत.

आपल्या क्षेत्रांत व सबंध भारतात जे आपण विचाररूपाने सांगू ते चालू चलन झालें पाहिजे. ही विचारांची शीळ भारतातील रानावनांतून ऐकली गेली पाहिजे. दिल्लीला कबरींचे शहर म्हणतात, येथे नव्या जगाचे शिलेदार आज तुम्ही जमलेले आहांत. अतीतीचा अभिमान व भविष्याची महत्वाकांक्षा जोगणारे तुम्ही यत्नदेव आहांत. भीमातीरीचीं तट्टे, भीमातीर, कृष्णातीर, गोदावरीतीर यांवरील महाराष्ट्र मंडळी’ येथे जमला आहांत. ती लूट लुटण्यासाठी नव्हे तर आमच्या साहित्यांतील कांदा-भाकर, हुरडा व चटणी यांतील अमृताची गोडी अन्य भाषा-साहित्यिकांबरोबर । प्रेमाने चाखण्यासाठी, किंबहुना ही सारस्वताची पेठ येथे उतरली आहे. येथे महाराष्ट्रांतील सर्व साहित्य-पेठांतून निवडक व किंमती सणगे आली आहेत. क्षणभर मराठ्यांनी आपली प्रेरणा, भावना, भक्ति, ज्ञान सर्व कांही संपत्ति येथे आणली आहे.

‘कबरीयाचे नगरीं। ये मराठी वैखरी । जन पावो राजद्वारी । वैभवातें ॥ हाच हेतु आहे.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
    -
    00:00
    00:00