मुंबई : प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर शक्ती चक्रीवादळ घोंघावणार आहे. सात ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाकडून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे. पुढील चार दिवसात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीवर भागांवर वादळाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. (Cyclone ‘Shakti’)
४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे
आयएमटी ट्रॅपिकल सायक्लोन अडव्हायजरी क्रमांक तीन नुसार महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना चक्री वादळाचा धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा देण्यात आला आहे. शनिवारी आणि रविवारी महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ४५ ते ५५ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तसेच झंझावती वारे ६५ किलो मीटर प्रतितास वेगाने वाहू शकतात. चक्रीवादळाची तीव्रता वाढली तर या वाऱ्यांचा वेग आणखी वाढू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पाच ऑक्टोबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांना या कालावधीत समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Cyclone ‘Shakti’)
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रिय
चक्रीवादळामुळे राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही भाग, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर कोकणात अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांना सक्रिय राहण्याचे आदेश जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत. किनारपट्टी व सखल भागातील नागरिकांच्या स्थलांतरासाठी योजना तयार ठेवण्यास सांगितले आहे. नागरिकांनी समुद्र प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Cyclone ‘Shakti’)