कोल्हापूर; प्रतिनिधी :
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून मंगळवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी नाट्यमयरित्या माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसला विशेषत: विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांना जबर धक्का बसला आहे. या मतदार संघातून सुरूवातीला राजेश लाटकर यांना काँग्रेसची अधिकृत उमेदवारी मिळाली होती. मात्र अनेक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उमेदवारी बदलण्याची नामुष्की काँग्रेसवर आली होती. लाटकर यांच्याऐवजी मधुरिमाराजे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र माघारीच्या शेवटच्या दिवशी खासदार शाहू महाराज आणि माजी आमदार मालोजीराजे यांच्यासह येत मधुरिमाराजे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे केवळ काँग्रेसची पुन्हा एकदा जोरदार धक्का बसला आहे.
अर्ज माघारी घेण्याच्या भूमिकेबद्दल आ. सतेज पाटील यांनी खासदार शाहू महाराज यांच्याकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ‘दम नव्हता तर उभं राहायचं नव्हतं, मी पण दाखवली असती माझी ताकद,’ असा संतापही त्यांनी व्यक्त केला. नाईलाजास्तव आम्ही माघार घेतली, अशी भूमिका खासदार शाहू महाराज यांनी पत्रकारांशी बोलतांना मांडली.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची आज अंतिम तारीख होती. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातीस काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी आपला उमेदवारी अर्ज नाट्यमयरित्या मागे घेतला. काँग्रेससाठी हा आणखी एक धक्का मानला जात आहे. यामुळे आता उत्तर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नाही. त्यामुळे या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर आणि अपक्ष राजेश लाटकर यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसमधून राजू लाटकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु, काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी राजू लाटकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. यामुळे काँग्रेसने मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी जाहीर केली होती. काँग्रेसने उमेदवार बददल्याने नाराज लाटकरांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर महायुतीमधून इच्छुक उमेदवार सत्यजित कदम यांनी राजेश क्षीरसागर यांना पाठिंबा दिला होता. यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये तिरंगी लढत होण्याचे चित्र होते. परंतु, आता मधुरिमाराजेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कोल्हापूर उत्तरमध्ये राजेश विरूद्ध राजेश लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.