( विजय चोरमारे यांनी दि. २२ जून २०२३ रोजी अजितदादा पवार यांची मुलाखत त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी घेतली होती. मुलाखत घेतली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध होती. मुलाखतीनंतर दहा दिवसांनी म्हणजे दोन जुलै २०२३ रोजी अजितदादा पवार यांनी शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.)
बालपण, शिक्षण बारामतीमध्ये Ajit Pawar Life Story
आम्ही लहानाचे मोठे काटेवाडीमध्ये झालो. काटेवाडी आणि बारामतीमध्ये आमचं बालपण गेलं. बारामतीमध्येच माझं पहिलीपासून दहावीपर्यंतचं शिक्षण झालं. शिक्षणाकरता बालविकास मंदिर आणि एमईएस हायस्कूलमध्ये होतो. सुट्टी असेल तेव्हा गावाकडं जायचो. आई-वडिल शेतावर राहायचे. वडिलांना आम्ही तात्यासाहेब म्हणायचो, आईला आईच म्हणतो. तात्यासाहेब हयात नाहीत. आईचं वय ८५ वर्षे आहे. सगळ्या पवार परिवाराची शेती आधी आजी, आजोबा बघायचे. नंतर माझे वडील आणि आई बघायला लागले. बाकीचे सगळे काका आपल्या वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये.
आजोबा गोविंदराव पवार आणि आजी शारदाबाई पवार– त्यांना सगळे आबा आणि बाई म्हणायचे. आजींना सगळा परिसर बाई नावानं ओळखायचा. म्हणजे त्यांची मुलंपण त्यांना बाईच म्हणायची, त्यांची नातवंडं बाईच म्हणायची. गावातले लोकही बाईच म्हणायचे. नातेवाईक पण बाईच म्हणायचे. आणि आबांना सगळेजण आबाच म्हणायचे. तर आबा-बाईंनी एक गोष्ट केली सुरुवातीपासून, ती म्हणजे सर्व मुलांना त्यांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या क्षेत्रात काम करायला प्रोत्साहन दिलं. त्यांचे मोठे चिरंजीव म्हणजे स्वर्गीय वसंतराव पवार हे वकील व्यवसायात. मग त्यांनी वकिली बघायची. त्यांच्यानंतर आप्पासाहेबकाका. त्यांनी अॅग्रीकल्चरचं शिक्षण पूर्ण केलं. मग ते साखर कारखानदारीमध्ये, तिकडं त्यांनी स्वतःला झोकून दिलं अन् ती जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे जे आमचे काका, बाळासाहेब पवार म्हणजे बाळकाका हे परदेशामध्ये निघून गेले. ते इंजिनीअर झाले, परदेशात गेले. बापूसाहेब पवार आज हयात नाहीत. परंतु ते डिप्लोमा झाले आणि डिप्लोमा होवून ते परदेशातून आल्यावर त्यांनी फाऊंड्री काढली. अजय मेटाकेम, भारत फाउंड्री उत्तमपणे चालवून चांगल्या पद्धतीनं त्यांनी उद्योग क्षेत्रात नाव कमावलं. त्याच्यानंतर त्यांच्याच बरोबर प्रतापकाका काम करायला लागले. प्रतापकाकांनी पुढं ती जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पाडली. ते सकाळ समूहाचे प्रमुख झाले. त्यांनी चांगल्या पद्धतीनं वृत्तपत्र चालवलं. आज अनेक वेगवेगळ्या संस्थांशी त्यांचा संबंध येतो. तर ती जबाबदारी ते पार पाडताहेत. त्याच्यामध्ये माझे वडील होते ते शेतीची जबाबदारी पार पाडत होते. अशी ही सगळी भावंडं. चार आत्या आहेत, त्या चार आत्या वेगवेगळ्या ठिकाणी. एक जगतापांना दिलेली आहे. एक एन. डी. पाटलांच्या घरात दिलेली आहे. एक जगदनेंच्या घरात एक सासनेंच्या घरात. असा हा सगळा परिवार. आणि या परिवारामध्ये काम करीत असताना आम्ही सगळे एकत्रच लहानाचे मोठे झालो. त्याच्यामुळं तशी आमची म्हणायला गेलं तर एकत्र फॅमिली. सण, वार सगळेजण एकत्र साजरे करतो. सुट्टीला एकत्र जमतो. मात्र, व्यवसाय म्हटलं तर प्रत्येकाचे वेगवेगळ्या प्रकारचे. प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीनं, त्याच्या संदर्भानं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं निर्णय घेण्याची मोकळीक. अशा या सगळ्या वातावरणामध्ये आम्ही लहानाचे मोठे होत झालो.
प्राथमिक शाळा, हायस्कूल किंवा कॉलेज अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर शिक्षण घेत असताना बहुतेक आम्ही मुलं काकांच्याकडं एकमेकांकडं शिकायला असायची. म्हणजे बारामतीहून पुण्यात आल्यावर काही प्रतापकाकांकडं, काही बापूसाहेब काकांच्याकडं. मुंबईला आल्यानंतर काही पवार साहेबांच्याकडं. असं वेगवेगळ्या काका लोकांच्याकडं आमच्यातल्या मुलांचं शिक्षण झालं. आबा-बाई आणि त्यांचं त्या काळातलं काम, त्यांनी त्यांच्या मुला-मुलींवर केलेले संस्कार, अभ्यासाला दिलेलं महत्त्व विशेष उल्लेखनीय होते. शिक्षण सगळ्यांनी पूर्ण करुन जे काही व्यवसाय करायचे असतील तर ते व्यवसाय पुढं नेत वाटचाल चालू ठेवायची याबाबत ते आग्रही होते. हे सगळं लहानपणापासूनच आम्ही बघत आलेलो असल्यामुळं साधारण ते संस्कार आम्हा लोकांच्यावर झाले आणि त्याच्यातूनच आम्ही लहानाचे मोठे झालो. आमच्याकडं लोकं साहेबांना भेटायला, आबा-बाईंना भेटायला यायची. वडिलांना भेटायला यायची. आप्पासाहेब काकांना भेटायला यायची. मग आल्यानंतर ते कसे बोलताहेत, कसे वागताहेत, कशी त्यांची कामं करताहेत, कसं त्यांना मार्गदर्शन करताहेत हे आम्ही बघायचो. आणि एक बघितलेलं आहे, परिवारामध्ये जी जबाबदारी घ्यायची, ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडायची. ती अर्धवट सोडायची नाही. ती धसास लावायची. हातात घेतलेलं काम धसास लावायचं. त्याच्याकरता वाट्टेल ते किंमत मोजायची वेळ आली तरी चालेल. परंतु ते पूर्णत्वाला न्यायचं अशा प्रकारे साधारण आबा-बाईंचा कल असायचा. आणि तशाच पद्धतीनं त्यांची मुलं, त्यांच्या मुली… त्यांचाही आम्ही काळ पाहिला. त्यांची कामाची पद्धत बघितली. आणि नंतर आमची तिसरी पिढी आली. तशाच पद्धतीनं मग आम्ही स्वतःला घडवण्याचा प्रयत्न केला. आता कितपत घडलो, की नाही घडलो हे जनतेनं ठरवायचं आहे.
बारामती कालची आणि आजची
आमच्या काळातली आर्थिक, सामाजिक अतिशय सोसो होती. मी साधारणपणे एकोणीसशे सदुसष्ट ते एकोणीसशे पंच्याहत्तरचा काळ तुम्हाला सांगतोय. आत्ता जे काही आमूलाग्र बदल झालेले दिसतात, सुधारणा दिसतात त्यातले त्या काळात काहीही नव्हते. शिक्षणाच्या सुविधाही जेमतेमच होत्या. आमच्या लहानपणी तर आमच्या बारामतीमध्ये इंग्रजी माध्यमाची शाळादेखील नव्हती. इंग्रजी माध्यमाची शाळा आमच्याकडं साधारण पंच्याहत्तरला निघाली. त्यावेळी बारामतीमध्ये छत्रपती, माळेगाव, सोमेश्वर असे तीन सहकारी साखर कारखाने होते. या तीन सहकारी साखर कारखान्यांमध्ये लोकांचा ऊस जायचा. त्या लोकांचं पेमेंट झालं, तरच बाजारपेठेमध्ये थोडा उठाव यायचा. नाहीतर तोपर्यंत दुधाचा धंदा नव्हता. आता जो मोठ्या प्रमाणावर वाढलेला पाहायला मिळतो, तो दुधाचा धंदा किंवा इतर शेतीपूरक जोडधंदेही फारसे नव्हते. हॉर्टिकल्चर इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्हतं. आता का वाढलं तर रोजगार हमी योजनेशी निगडीत हॉर्टिकल्चरची योजना पवार साहेबांनी राबवली. नंतर ती राष्ट्रीय फलोत्पादन योजना म्हणूनपण राबवली. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर त्याचा प्रसार झालेला आहे. आज पाण्याची उपलब्धता जेवढी आहे, तेवढी नव्हती. पूर्वी आमच्याकडं ड्राय एरिया जास्त होता. आमच्या लहानपणी, आमच्याकडं त्रेसष्टच गावं होती, बारामतीमध्ये. २१ गावं बागायती, ४२ गावं जिरायती. असं ते त्रेसष्ट गावांचं कार्यक्षेत्र. २१ गावं बागायती ही पूर्णपणे नीरा डावा कालव्यावर अवलंबून असणारी. नीरा डावा कालव्यावर दोनच धरणं. एक भाटघर आणि वीर. भाटघर आणि वीर भरलं, तर नीरा डावा कालवा चांगला चालणार. तिकडं फलटण, माळशिरस, सांगोला… तिकडं जाणारा उजवा कालवा चांगला चालणार. आणि त्याच्यातून काही प्रमाणात आलेली सुबत्ता. पण ती सुबत्ता अतिशय मर्यादित. नंतर मग पवार साहेबांनी, अप्पासाहेब काकांनी अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट स्थापन केला. विद्या प्रतिष्ठान स्थापन केलं. शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार व्हावा, सुविधा व्हाव्यात, त्याकरता विद्या प्रतिष्ठानची निर्मिती केली. कृषी विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग होऊ लागले. कशा प्रकारे ठिबक असलं पाहिजे, पाट पद्धत म्हणजे काय, मडक्याला चिंधी लावून ते ठिपका पद्धत म्हणजे काय, मायक्रो स्प्रिंकलर म्हणजे काय, स्प्रिंकलर म्हणजे काय… मग लॅटरल आल्या. असे अनेक जे आमूलाग्र बदल होत गेले, त्याची सातत्याने प्रात्यक्षिकं ठेवली जात. त्याचे सातत्याने मेळावे, परिसंवाद होत. दुधाच्या, पोल्ट्रीच्या व्यवसायासंदर्भात परिसंवाद घेतले जात. हॉर्टिकल्चरच्या बद्दल मार्केटिंग कसं करायचं, कुठल्या फळांना मार्केट आहे, मग द्राक्षं, मग डाळींब, मधल्या काळात बोर पण होतं. पण बोर एवढं चाललं नाही. पण तो सुंदरपैकी मार्केट खेचेल अशा प्रकारची कुठली द्राक्षं, मग इथं आमची ग्रेप इंडस्ट्री आहे. त्या ग्रेप इंडस्ट्रिला कोणत्या प्रकारची द्राक्षं चालतात… त्यानुसार वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होत गेले. आणि मग ह्याच्यातनं शेतकऱ्यांना दोन पैसे मिळायला लागले. आमची बाजारपेठ वाढायला लागली. आर्थिक सुबत्ता नांदायला लागली. इरिेगेशन वाढायला लागलं. बंधारे व्हायला लागले. कोल्हापूर टाइपचे बंधारे नीरा उजव्या कालव्यावर, नीरा नदीवर झाले. कऱ्हा नदीवर झाले. कऱ्हा नदीचं पूर्ण पावसावर अवलंबून राहायचं. पण नीरा नदीला जरा बरं पाणी राहायचं. आजही राहातंय. आणि मग त्याच्यातनं उपसा सिंचन योजना झाल्या. जराई उपसा सिंचन योजना. शिरसाई उपसा सिंचन योजना, नंतर पुरंदर उपसा सिंचन योजना. मी राजकारणात आल्यानंतर त्याला मी गती देण्याचा प्रयत्न केला. अशा या सगळ्या गोष्टींनी आमच्या इथं सुबत्ता आली.
शिक्षणाच्या सोयी झाल्या. पूर्वी बारामतीतली मुलं शिक्षणाकरीता बऱ्याचदा पुण्याला जायची. आजुबाजूच्या भागात जायची. बेळगावला जायची. तिकडं कर्नाटकामध्ये जायची. अशा वेगवेगळ्या भागामध्ये जायची. आणि त्यामुळं मुलं… मुलींना विशेषतः बाहेर पाठवलं जायचं नाही. आता मात्र बारामतीमध्ये केजी टू पीजीच्या अनेक संस्था आहेत. तुम्हाला मराठी मीडियमध्ये जायचं असेल, इंग्लिश मीडियम, सीबीएससी, एसएससी, कुठलंही शिक्षण पाहिजे असेल तर ते आता बारामतीमध्ये उपलब्ध आहे. तिथं मेडिकल कॉलेज नव्हतं. ते आता मेडिकल कॉलेज झालेलं आहे. आयुर्वेदिक कॉलेज नव्हतं. तेही यंदापासून सुरू झालेलं आहे. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन सेंटर, इन्क्युबेशन सेंटर, अॅग्रीकल्चर कॉलेज, लॉ कॉलेज, इंजिनीअरिंग कॉलेजच्या सगळ्या फॅकल्टीज, आर्किटेक्चर कॉलेज, डीएड, बीएड, एमएड असं सगळ्या प्रकारचं शिक्षण तिथं मिळायला लागलं. कृषी विज्ञान केंद्र अतिशय उत्तम पद्धतीनं चालवलं जातं. या सगळ्यात आमूलाग्र बदल झाल्यामुळं मात्र आता आर्थिक सुबत्ता आली आणि लोकांचं राहाणीमान बदललं. डेव्हलपमेंट झालेली आहे. रस्ते सुधारणा होताहेत. रिंग रोड होताहेत, उद्यानं होताहेत, क्रीडांगणं झालेली आहेत. अजून काही होताहेत. स्वच्छतेला महत्त्व देतोय आम्ही. झाडं लावतोय. वेगवेगळ्या आणखीन काही मुलांना, मुलींना, ज्येष्ठांना आकर्षित होतील, अशा काही सुविधा देतोय… असं ते सगळं चाललेलं आहे.
मी बाईंचा लाडका नातू
बाईंना जेवढी नातवंड होती, त्यांची मुलं, मुली. आणि त्यांना झालेली मुलं, मुली म्हणजे बाईंची नातवंडं. त्याच्यामध्ये माझं नशीब चांगलं. सगळ्याच मुलांच्यामध्ये जर बाईंचं कोण लाडकं नातवंड होतं तर ते मुलांच्यामध्ये अजित होतं. मुलींच्यामध्ये माझी मोठी बहीण विजया होती, नंतर सुप्रिया. आमच्यानंतर बऱ्याच वर्षांनी सुप्रियाचा जन्म झाला. माझा जन्म… ५९ चा. सुप्रियाचा ६९ चा. आम्ही नातवंडं कितीही लाडकी असलो तरी, जिथं जिथं शिस्त असली पाहिजे, तिथं शिस्तही असायची. म्हणजे उगाच लाडकं आहे म्हणून कसंही वागून चालायचं नाही. पण इतरांच्यापेक्षा जरा झुकृतं माप सगळ्या बाबतीमध्ये मला मिळायचं. माझा ओढा खेळाकडं जास्ती असायचा ते त्या समजून घ्यायच्या. खेळ म्हणजे विटी दांडू, भोवरा, गोट्या, पतंग, सूरपाट्या, लगोर, क्रिकेट हे अशा प्रकारचे खेळ आमच्या काळामध्ये चालायचे. शिवाय कबड्डी, खो-खो. हे सगळे खेळ चालायचे. माझ्या गोट्या तर ठेवायला बाईंकडंच असायच्या. काही खायला पाहिजे असेल तर बाईंकडे जायचं. ते मला अधिक हक्कानं मिळायचं. माझ्यासाठी बाईंची मूठ जरा मोठीच असायची. माझे जरा जास्ती लाड चालायचे.
बाईंनी लोकल बोर्डाच्या माध्यमातून राजकारणात मोठं काम केलं आहे. परंतु लोकल बोर्डाचं काम आम्हाला लहानपणी माहीत नव्हतं. माहीत असण्याचं कारणही नव्हतं. कारण त्या जेव्हा लोकल बोर्डावर होत्या तेव्हा आमचा जन्मही झालेला नव्हता. साधारणपणे पंचाहत्तरनंतरचा काळ माझा थोडाफार कळतेपणाचा काळ होता. आम्हाला कळायला लागण्याच्या सुरुवातीच्या काळातच बाई गेल्या. पंचाहत्तरमध्ये. त्यांना ती कावीळ झाली, ती पोटात उतरली, त्याच्यामध्ये त्यांचं दुःखद निधन झालं. त्यावेळी पवारसाहेब मंत्री होते. माझे वडिल अठ्ठ्याहत्तर जानेवारीमध्ये गेले. आजोबा अठ्ठ्याहत्तर ऑक्टोबरमध्ये गेले. ती दोन-तीन वर्षे आमच्या दृष्टीनं फार अडचणीची गेली. ज्यांच्यावर आमचं, संपूर्ण घराचं अवलंबित्व होतं, तीच जीवाभावाची माणसं किंवा ज्यांनी आमच्यावर संस्कार केले, ती माणसं गेली. त्यामुळे आम्ही भावनिकदृष्ट्या खचल्यासारखे झालो. लहानपणी आम्ही बाईंच्या सगळ्या गोष्टी बघायचो. बाईंचा एक दरारा होता. आजोबांच्यापेक्षा बाईंचा अधिक दरारा होता. त्यामुळे बाईंना सगळेजण घाबरून असायचे. म्हणजे बाईंचा मूड बघून, रागरंग बघूनच त्यांना काही सांगायला जायचे. हा दरारा त्यांनी आपल्या कर्तृत्वानं कमावला होता. प्रत्येक गोष्टीमध्ये कष्ट घेण्याची त्यांची तयारी असायची. ते लहानपणापासून बघत असल्यामुळं आम्हाला त्या गोष्टीची सवय व्हायला मदत झाली.
कौटुंबिक गाठीभेटी
आमची सगळ्यांची लग्नं झालीत, प्रत्येकांना मुलं झालीत. आता काहींना जावई आलेत. काहींना सुना आल्यात. म्हणजे माझी धाकटी बहीण आहे तिला सून आली. माझी मोठी बहीण आहे नीताला सून आली. विजया पाटलांना दोन जावई आलेत. माझा श्रीनिवास धाकटा भाऊ आहे, त्याची मिथिला म्हणून मुलगी आहे, त्याला जावई आलेला आहे. अजून बाकीच्या मुलांची लग्नं व्हायची आहेत. त्यामुळं अजून काही सुना घरामध्ये येणं बाकी आहे. रोहितचं लग्न झाल्यामुळं सून आलेली आहे. बाकीच्या बहिणींची मुलं, मुली यांची लग्नं झालेली आहेत. तिथंही नातवंड वगैरे आलेली आहेत. आम्ही सगळी भावंडं, कधी ना कधी वर्षभरात एकत्र भेटण्याचा प्रयत्न करतो. माझ्या आईच्या वाढदिवस १८ मार्चला. श्रीनिवासचा १९ मार्चला. त्यावेळी आम्ही एकत्र भेटण्याचा प्रयत्न करतो. कधी माझ्या वाढदिवसाला एकत्र भेटण्याचा प्रयत्न करतो. दिवाळीत आम्ही एकत्र भेटत असतो. आणखी कुठली महत्त्वाची सुट्टी असेल, तर कधी परदेशात जाण्याचा प्रयत्न करत असतो. अशा पद्धतीनं आमचा प्रयत्न चालू असतो. त्याच्यातनं एक जवळीकपण वाढते. आपली सुख-दुःखं एकमेकाला सांगता येतात. त्याच्यातून मनाला एक समाधान मिळतं.
आई-वडिलांनी शेती फुलवली
माझ्या वडिलांना थोडंसं सिने इंडस्ट्रीचं आकर्षण होतं. ते मुंबईला आलेही होते. काही ठिकाणी त्यांना महत्त्वाचा नाही, पण साईडरोल मिळालेला होता. परंतु त्या क्षेत्रात ते इतके यशस्वी झाले नाहीत. मग ते परत बारामतीला आले. बारामतीला आल्यानंतर बाई आणि आबांनी सांगितलं की, आता तुम्ही व्यवसाय बघा. आपली मोठी शेती आहे तिकडं लक्ष द्या. आजोबा नीरा कॅनॉल खरेदी विक्री संघामध्ये मॅनेजर म्हणून काम करीत असताना, त्यांनी मोठ्या प्रमाणावर शेती खरेदी केली होती. ती शेती सगळं बघणं गरजेचं होतं. आजोबांनी त्या काळामध्ये दीडशे-पावणेदोनशे एकर जमीन खरेदी केलेली होती. म्हणजे जिरायत आणि बागायत धरून. ती शेती आता कुणीतरी, पुढच्या पिढीतल्यांनी बघितली पाहिजे, म्हणून त्यांनी आमचे वडील तात्यासाहेब यांच्यावर ती जबाबदारी दिली. आणि ते शेती बघायला लागले. शेती बघत बघत स्थानिक राजकारण, तिथला साखर कारखाना यातही लक्ष घालू लागले. छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे फाऊंडर डायरेक्टर बोर्ड जे होतं, त्याच्यामध्ये माझे आजोबा होते. आजोबांच्या नंतर माझे वडील तिथे डायरेक्टर झाले. वडील डायरेक्टर असतानाच आप्पासाहेब काकापण तिथं डायरेक्टर बोर्डात आले. मग आप्पासोकाका चेअरमन झाले. साधारण ७८च्या काळामध्ये आप्पासोकाका तिथं चेअरमन होते. नंतर मी तिथं डायरेक्टर झालो चौऱ्याऐंशीला. वडिलांनी डेअरीही सुरू केलेली होती. चांगल्या पद्धतीनं केली होती. आजही आमची डेअरी आहे. वडिल शेती चांगली करायचे. नवनवीन पिकं घेण्याचा प्रयत्न करायचे. आम्हाला सुट्टीला ट्रीपला घेवून जायचे. सगळेजण दिवाळीला आले तर सगळ्यांचं अतिशय चांगल्या प्रकारचं आदरातिथ्य करायचे. मुलांना, मुलींना फटाके, कपडे वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी हौसेनं करायचे. मी तरी बघतो तसं पन्नास वर्षे आमची दिवाळी आम्ही एकत्र साजरी करतोय. त्याच्या आधीपासूनच सगळे करत आलेले आहेत. पण पन्नास वर्षं तर त्या गोष्टीचा मी साक्षीदार आहे.
सगळ्या पवारांना राग आळशीपणाचा
वडील अठ्ठ्याहत्तरला गेले. त्यावेळी मी साधारण अठरा वर्षांचा होतो. ते गेल्यावर आईवरची जबाबदारी वाढली. नंतर आमच्या वडिलांच्या नावची शेती फक्त आई बघायला लागली. बाकीची शेती जी होती, सगळ्या भावंडांची, जी पूर्वी वडील बघायचे, ती नंतर आप्पासोकाका बघायला लागले. आणि आमची आमची शेती आई बघायला लागली. मग आई डेअरीकडंही लक्ष द्यायची. शेती बघायची. आम्ही कॉलेजला, मी कोल्हापूरला होतो. मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. धाकटी बहीण शिकत होती…. असा सगळा तो काळ. पण वडील अठ्ठ्याहत्तरला गेले, त्याच्याआधी वडिलांचाही काळ बघितला. वडिलांचा एक दरारा असायचा. वडिलांची आजुबाजूच्या लोकांना आदरयुक्त भीती असायची. त्यांचा एक करारी बाणा असायचा. ते असे लेचेपेचे नव्हते. म्हणजे कुणी अरे म्हणलं तर… अरेला का रे म्हणून मोकळे. कुणी जर हात उगारला तर हे पण हात उगारायला मागंपुढं बघायचे नाहीत. त्या पद्धतीनं त्यांचा काळ गेला. त्यांचं हार्ट अटॅकनं दुःखद निधन झालं. नंतर मात्र आईनं ते सगळं बघितलं. आणि मग मी वडिल गेल्यावर कोल्हापूरहून कॉलेज सोडून आल्यावर मी डेअरी वाढवली. पोल्ट्री वाढवली. शेती बागायती करण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळी पिकं घेण्याचा प्रयत्न केला. असं करत करत डायरेक्टर झालो. लग्न व्हायच्या आधीच डायरेक्टर झालो, चोवीसाव्या वर्षी. नंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आम्ही सगळे तिथं काटेवाडीलाच राहायचो. नव्वदमध्ये मला पहिला मुलगा झाला. ब्याण्णवला दुसरा. नव्वदला मुलगा झाला तेव्हा मी डायरेक्टरशीपला उभा राहिलो बँकेच्या. बँकेला डायरेक्टर झालो एक्याण्णवला. डायरेक्टर झाल्यावर तिथं मला सगळ्यांनी चेअरमन केलं. मोठी बँक… पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आजपण अतिशय उत्तम बँक चालते. तिथं डायरेक्टर झाल्यावर, चेअरमन झाल्यावर अचानक लोकसभेच्या निवडणुका लागल्या. १९८९ ची निवडणूक पाच वर्षाकरता झालेली होती. पुढची निवडणूक १९९४ ला लागायला पाहिजे होती. परंतु मध्यावधी निवडणुका आल्या १९९१मध्ये. त्यावेळी सगळे म्हणाले की, अजितला खासदारकीचं तिकीट द्या. पवार साहेबांनी, राजीव गांधींनी मला खासदारकीचं तिकीट दिलं. माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं की मी राजकारणात येईन. तिकीट मिळालं, मी खासदार झालो. प्रचंड मताधिक्यानं निवडून आलो. त्याच्या आधीपासूनच १९८७ पासूनच लोकांची किरकोळ कामं करायचो. काही कुणाचं बीडीओचं. मामलेदारचं, पीआयचं, पीडब्ल्यूडीचं, इरिगेशनचं… प्रांत अशी काही कामं करायचो. थोडीशी आवड लागली आणि आवड लागली ती वाढत गेली. काम येत गेलं… मी काम करत गेलो. त्याच्यातनं लोकांची कामं होत गेली. लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला. ९१ ला खासदार झाल्यावर काही राजकीय स्थित्यंतरं घडली. पवारसाहेबांना संरक्षण मंत्री म्हणून दिल्लीत बोलवलं. त्यासाठी पवारसाहेबांना खासदार व्हायचं होतं. मलासुद्धा सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्रिपद मिळालं. परंतु आमदार व्हायचं होतं. म्हणजे मी खासदार असताना महाराष्ट्रात राज्यमंत्री झालो, आणि पवारसाहेब आमदार असताना केंद्रात संरक्षणमंत्री झाले. पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान होते. ते उत्तम मराठी बोलायचे. त्यांनी सांगितलं की, पहिला विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर तू राजीनामा द्यायचा. तुझ्याजागी पवारसाहेब येतील. पवार साहेबांच्या जागी तू जायचं. तू तिकडं काम करायचं महाराष्ट्रात. साहेब इकडं दिल्लीमध्ये काम करतील. अशा पद्धतीनं माझी सुरुवात झाली. आम्हीपण साहेबांचं राजकारण, समाजकारण लहानपणापासून बघितलेलं असल्याकारणामुळं आळस हा आमच्या फॅमिलीमध्ये कधीच नाही. सगळ्या पवारांना आळशीपणाचा राग. कुणी आळशी राहायचं नाही, दुपारी झोपायचं नाही, सकाळी लवकर उठायचं. कामाला लागायचं. वायफळ खर्च, वायफळ वेळ घालवायचा नाही. निर्व्यसनी राहायचं… अशा सगळ्या गोष्टीचे संस्कार पहिल्यापासून असल्यामुळं मी निर्व्यसनी राहिलो. म्हणतात ना सुपारीच्या खांडाचंही व्यसन नाही, तसंच मला कसलंही मला व्यसन नाही. काही काहींनी कधीतरी सिगारेट ओढून बघितली असेल. कधी गुटखा खावून बघितला असेल. टेस्ट तरी कशाची तरी बिअरची, काय ते वेगवेगळे ब्रँडी, व्हिस्की -बिस्की… पण तसली टेस्टपण नाही घेतली आणि सिगारेटपण ओढली नाही. तंबाखूपण नाही आणि काहीच नाही. एक ठरवलं की त्याला हात लावायचा नाही.
काकांपासून चार हात लांब
आमचे सगळे काका कर्तबगार. अशा कर्तबगार काकांचा सहवास आम्हाला मुलांना कसा लागला, याबाबत अनेकांना कुतूहल असतं. आम्ही लहानाचे मोठे होत होतो. दुर्दैवाने आम्ही लहान असतानाच, सगळ्यात थोरले काका हे वारले. आप्पासाहेबकाका बाहेरच होते. बापूसाहेबकाका बाहेर होते. बाळकाका बाहेर होते. प्रतापकाका शिकायला पिलानीला होते. त्यामुळे ह्या कुणाचा आमचा फार असा संबंध आला नाही. आत्या कधी सुट्टीला यायच्या तर तेवढ्यापुरता संबंध. पवारसाहेब बारामतीला यायचे. १९६७ मध्ये ते आमदार झाले. त्याच्याआधी विद्यार्थीदशेत बासष्टपासून त्यांनी राजकीय कामाला त्यांनी सुरुवात केली होती. आमचं पवार घराणं शेतकरी कामगार पक्षाचं. टोटल. आबा-बाई आणि त्यांची सगळी मुलं. परंतु एकटे पवारसाहेब काँग्रेसच्या विचारांचे. यशवंतरावांना त्यांनी गुरू मानलेलं होतं. त्यांच्या नेतृत्वाखाली ते काम करत होते. त्यामुळं माझा जरासा संबंध आला तो पवार साहेबांशी. कारण ते बारामतीला यायचे. तिथे असले की लोकांना आम्ही चहा वगैरे द्यायचो. पूर्वी बघा, घरातलीच मुलं हाप पँट घालून चहा दे, पाणी आणून दे अशी कामं करायची. घरात कुणी आलं तरी जा रे पाणी नेऊन दे. चहा दे. पोहे नेवून दे असं सांगितलं जायचं. अशी कामं मुलांनाच करावी लागायची. आता ते जरा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढलयं. शिपाई… वगैरे वगैरे.
आम्हाला राजकारणातल्या काहीही गोष्टी कुणी शिकवल्या नाहीत. आम्हाला कुणी भाषण कसं करायचं तेही कधी सांगितलं नाही. आम्ही पाहात गेलो, आम्हाला कुठंतरी आमचं मन म्हणत होतं की, जर आपल्याला याच्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल, तर वेगवेगळे वक्ते काय विचार मांडतात, विचार मांडण्याची पद्धत काय, त्याच्यामध्ये कुठलं सांगितल्यानंतर लोकांना तुम्ही आपलंसं कराल, सभा कशी जिंकाल, अशा सगळ्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. जमेल तिथे आम्ही त्या बघत गेलो आणि त्याच्यातनं शिकत गेलो. काही गोष्टी तुम्हाला उपजत असल्या पाहिजेत. तुम्ही असं शिकून… जेवढं शिकवलं, तेवढंच तुम्हाला येणार. पण काही तुमच्यात उपजतच असेल तर तो अॅडिशनलचा बेनिफिट तुम्हाला त्याच्यामध्ये मिळतो. पवार साहेबांशी आम्ही तसं घाबरुनच असायचो. सगळ्या काका लोकांच्यापासून दोन हात दूर असायचो. आम्ही कधी या लोकांच्या पुढे गेलो नाही. एक त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आम्हाला असायची. आमच्या घरातल्या मुली मात्र त्यांच्याजवळ जावून बसणं… त्यांच्याशी गप्पा मारणं… बिनधास्तपणे करायच्या. मुलं म्हणाल तर कुणीच नाही. मला जसं कळतयं, तसं आमच्या जनरेशनमध्ये कुणीही नाही. उलट काका आले की त्यांना दिसणार नाही, असं लांब राहायचं. तो काळच असा होता, की लहान मुलं मोठ्या माणसांच्या वा-याला फिरकायची नाहीत.
सख्खं, चुलत असं कधीच नाही
शालेय जीवनात, हायस्कूलच्या जीवनात आणि कॉलेज… ह्या तिन्ही फॅक्टरमध्ये कधी सगळेजण आम्ही एकत्र दिवाळीला वगैरे जमायचो, सुट्टीला जमायचो. लग्नकार्य वगैरे असेल तर तिथे जमायचो. सुख-दुःखात जमायचो असं सगळं होत होतं. सुप्रियापण सुट्टी लागली की, दिवाळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत काटेवाडीला येणार. गोठ्यात जाणार, शेतात जाणार, गाईवर बसणार, घोड्यावर बसणार, पोहायला जाणार… वगैरे वगैरे. म्हणजे ते तिकडं एकरुप होणार. सगळेच म्हणजे पुण्याची, मुंबईची मुलं वगैरे यायची. आणि त्या वेळेस असं कधी चुलत, सख्खं असलं आमच्या घरात कधी आम्हाला जाणवलंच नाही. आम्ही सगळेच सख्खे आहोत या भावनेतनं आम्हाला लहानाचं मोठं केलं गेलं. त्याच्यानंतर एकेका बहिणीची लग्नं होत गेली. तसं त्या संसाराला लागल्या. माझे मोठे बंधुराज राजेंद्र पवार, त्यांचं लग्न झालं, वहिनी आल्या. तो त्याच्या व्यवसायाला लागला. लग्न झाल्यावर जबाबदारी वाढते. लग्न झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी येते. मुलांची जबाबदारी येते. त्याची शाळा, त्याचं भवितव्य वगैरे… वगैरे. अशा प्रकारच्या त्या सगळ्या गोष्टी. पण एकमेकांच्या पायात पाय नाही. प्रत्येकाचे बिझनेस वेगळे आहेत. शेतीचंच उदाहरण घ्या. शंभर एकर शेती आहे. तू ५० एकर कर, तू ५० एकर कर… असं झालं नाही. किंवा ५० एकर शेती आहे, २५-२५ करा असंही नाही. ज्याची त्याला मुभा. पण सगळे एकत्र बसल्यानंतर चर्चा निघाली आणि कुणी विचारलं, की बाबा हे… हे याच्यात काय केलं पाहिजे, तर मग मात्र चांगल्या भावनेनं आपल्याला योग्य वाटतो तो सल्ला एकमेकांना द्यायचा. त्याच्यात कुठंही वेगळी भावना मनामध्ये ठेवायची नाही.
माईआत्या, एनडीमामांचं घर
आम्ही लहान होतो, त्यावेळेस मुंबईमध्ये आमच्या पवार परिवाराचं एकही घर नव्हतं. आम्ही लहान असताना मुंबईला जुहू चौपाटीला यायचं असेल, मुंबई पाहायला यायचं असेल, किंवा ते म्हातारीचा बूट… हँगिंग गार्डनला ते म्हातारीचा बुट म्हणायचे. ते बघायला यायचं असेल, किंवा मत्स्यालय मरीन ड्राइव्हचं, जे काही मुंबईत बघण्यासारखं… गेटवे वगैरे… तर आम्हाला एकमेव घर… ते म्हणजे ईस्ट विलेपार्लेचं हनुमान रोडचं एन. डी. पाटील साहेबांचं घर. ते इतकं छोटं होतं, पण तिथं एनडीमामा, माईआत्या, त्यांची दोन मुलं… सुहास, प्रशांत… आणि आम्ही तिघं, चौघंजण. एवढेजण त्या दोन खोल्यांत राहायचो. म्हणजे आम्ही सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. आमची जी जनरेशन आहे, म्हणजे सुप्रिया वगैरे नाही, आमची तिच्या आधीची. म्हणजे साधारण ६५च्या – ६३ च्या आधी जन्माला आलेले. आमच्या इथं सुरुवात झाली ५६ पासून. पहिली बहीण ५६ची. घरातली. पवार परिवारातली. पहिल्या दोन बहिणी ५६ च्या. नंतर ५८ ला दोन. एक बहीण-भाऊ झाले. मग ५९ ला मी झालो. असे अनेक जण… साठ वगैरे वगैरे. तो जो ग्रुप आहे, त्यांनी सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. साधेपणाने राहाणं बघितलेलं आहे. कसं शेतकरी कुटुंबामध्ये राहायचं असतं, कसं मर्यादित पैशामध्ये संसार करायचा असतो, कुटुंब चालवायचं असतं वगैरे. ते आम्ही अनुभवलं नाही, पण डोळ्यांनी पाहिलंय. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू परिस्थिती सुधारत गेली. कारण सगळेजण धंदापाण्याला लागले. मग आर्थिक सुबत्ता येत गेली. त्याच्यामुळं नंतरच्या पिढीला यातलं सगळं काही पाहायला मिळालं नाही. ते त्यांच्या परीनं नशीबवान आहेत. आमच्या नंतरची पिढी तर फारच नशीबवान आहे.
दहावीला नापास
माझं शिक्षण बारामतीला बालविकास मंदिरामध्ये झालं. आमच्या सगळ्या भावंडांचं शिक्षण बालविकास मंदिरमध्येच झालं. आम्ही चार भावंडं आणि आमची मोठी बहीण रजूअक्का. आम्ही पाचजण तीथं एकत्र असायचो. रजूअक्काचे वडील लवकर गेल्यामुळं आमच्या मोठ्या काकी त्या आमची सगळ्यांची शिक्षणाची किंवा जेवणाची, नाष्ट्याची वगैरे काळजी घ्यायच्या. आज्जी-आजोबा असायचे. बारामतीचा बंगला ५१ -५२ साली, माझ्या जन्माच्या दहा-बारा वर्ष आधी बांधलेला. तिथं आम्ही लहानाचे मोठे झालो. प्राथमिक शिक्षण आमचं सगळ्यांचं बालविकास मंदिरमध्ये झालं. हायस्कूलचं शिक्षण महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, एमईएस हायस्कूल… पार पवारसाहेबांच्या सगळ्या भावंडांचं तिथंच झालं. १९११ साली शाळा निघालेली ती शाळा आहे. त्यामुळं आमच्या आधीची पिढी तिथंच शिकली. आमच्या आत्याबित्या पण तिथेच शिकल्या. आम्हीपण बारामतीत जे होतो, त्यांचंपण शिक्षण तिथंच झालं.
दहावीला मी इकडं मुंबईला आलो. विल्सन हायस्कूलला गिरगावमध्ये माझी अॅडमिशन घेण्यात आली. परंतु दुर्दैवाने दहावीमध्ये मी फेल झालो. एक विषय माझा राहिला. पवार साहेब इथे होते, सुप्रिया इथे होती, तर काका, काकी म्हणाले, अजितला आम्ही घेवून जातो. किंवा आज्जी म्हणाल्या असतील, मला नेमकं माहीत नाही. मला सांगितलं की आता तुला तिकडं मुंबईला जायचंय. आलो. परंतु त्यावेळी मुंबई मला काही मानवली नाही. आणि त्यात माझं दहावीचं अपयश. एक विषय राहिलेला मी पुढच्या वर्षी सोडवला. दिल्यानंतर माझं मन थोडं नाराज झालं. आपल्या बरोबरची बॅच पुढं निघून गेली. मग काय करायचं, तर मी कोल्हापूरला शहाजी कॉलेजला अॅडमिशन घेतली. आणि मग मी कोल्हापूरला तिकडं गेलो.
अभ्यासात सगळेच सोसो
आमच्या घरामध्ये आमची मोठी बहीण रजूअक्का अतिशय हुशार. ती डॉक्टर झाली. सगळ्यात थोरले काका वसंतराव पवारांची मुलगी. माझी मोठी बहीण विजया पाटील, ज्या सकाळच्या सरव्यवस्थापिका होत्या. ती अतिशय हुशार. आम्ही चार भावंडं. त्यात सगळ्यात हुशार ती. पहिल्यापासून मेरीटची. मी कधी कधी लहानपणी झोपल्यानंतर… तिला न कळता तिच्या डोक्याला डोकं लावून झोपायचो. धाकटी बहीण नीता किंवा श्रीनिवास म्हणायचे, `कशाला दादा ते`? मी म्हणायचो, `जरा तिची बुद्धी आपल्यात येऊदे, डोक्याला डोकं लागलं तर`. इथपर्यंतचा फालतूपणा करायचो आम्ही तेव्हा. पण आम्ही अभ्यासात सोसो. नीता, श्रीनिवास पण अभ्यासात सोसो. सुप्रिया त्यातल्या त्यात बरी. म्हणजे सुप्रियाला कधी गॅप नाही पडला. मी गॅप घेतला. नीताने गॅप नाही घेतला. श्रीनिवासने गॅप नाही घेतला. सुप्रियाने गॅप नाही घेतला. मग आमचे मोठे बंधू राजेंद्र पवार, त्यांनी गॅप घेतला.
मी कॉमर्सला प्रवेश घेतला होता, पण मी बीकॉम पूर्ण झालो नाही. माझी एक सेमिस्टर राहिली. एक सेमिस्टर राहिल्यानंतर मग एसवायबीकॉम लिहिता येत नाही. मग आपल्याला ट्वेल्थच लिहावं लागतं. त्यामुळं माझा फॉर्म भरताना मी पदवीधर म्हणून कधीच उल्लेख करीत नाही.
नीटनेटकेपणाची सवय
आपल्यामध्ये एक म्हण आहे, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तशाच पद्धतीनं का कुणास ठाऊक, मला जसं समजतंय, तसं माझी पुस्तकं व्यवस्थित, माझ्या वह्या व्यवस्थित, कपाटातील जो काही कप्पा असेल, तो व्यवस्थित. माझ्या कपड्याच्या घड्या व्यवस्थित. म्हणजे जे काही चप्पल, बूट असेल तर ते व्यवस्थित. मला ती आवड पहिल्यापासून आहे. गाडी व्यवस्थित असली पाहिजे. घड्याळाची आवड आहे मला. पेनची आवड आहे. कपड्यांची आवड आहे. गॉगलची आवड आहे… सनग्लासेसची. जे आहे ते आहे. मला ती आवड असल्यामुळं मी जोपासलेली आहे. जोपासण्याइतपत माझी परिस्थिती चांगली असल्यामुळं मी ते आजपर्यंत टिकवलेलं आहे. आणि त्याचं कारण मला माहिती नाही, एखाद्याला असतं… आता कुणाच्यामुळं ही आवड निर्माण झाली, परमेश्वरालाच माहिती.
अजित ते अजितदादा
आमच्या लहानपणी पवारसाहेब ज्यावेळेस पहिल्यांदा निवडणुकीला उभे होते, त्यावेळी बारामती शहराची मतदारांची संख्या १७ हजार होती. म्हणजे आता एखाद्या चांगल्या ग्रामपंचायतीचं पण मतदान तेवढं असतं. आणि १७ हजार मतदारांमध्ये एकेका घरात पाच लोकं जर धरली, तर… म्हणजे दोघं मतदार आणि तिघं लहान मुलं… त्याच्यामध्ये धरलं तर १७ दुणे ३४… पन्नास एक हजार लोकसंख्या असेल. पन्नास हजार लोकसंख्या म्हटल्यावर गावातनं जाताना कोण कुणचा मुलगा हे लोकांना ठाऊक असायचं. त्यामुळं लगेचच काही झालं तर घरी कंप्लेंट जायच्या की असं असं हे करताहेत. पण जसं आपण मोठं होत जातो, तसं… थोडसं आमच्या घरात काय झालं… आमच्यामध्ये, सगळ्या घरात पहिली आमच्या जनरेशनमध्ये प्रफुल्लअक्का. प्रफुल्लता भोसले म्हणून आहेत त्या. नंतर रजनी इंदूलकर, रजूअक्का. नंतर विजया पाटील. तिला अक्का म्हणतो आम्ही. पहिल्या तिन्ही मुली झाल्या. त्याच्यानंतर राजेंद्र पवार, रोहितचे वडील. त्यांना राजूदादा बोलतो. आणि पाचवा, सगळ्या फॅमिलीत मी झालो अजित. त्याच्यामुळं आपल्या जुन्या काळात बहिणीला अक्का म्हणायचं. मोठ्या भावाला दादा म्हणायचं. धाकटी बहीण असली तर तिला ताई म्हणायचं. आणि धाकटा भाऊ असेल तर त्याला अण्णा, बापू असं काहीतरी म्हणायचं… बाळ असं ते असायचं. सुरुवातीच्या काळात, आमच्या आजोबांच्या काळात कुटुंबनियोजन अजिबात नव्हतं. सगळ्यांना त्यावेळी आठ मुलं, मुली… दहा मुलं… मुली, बारा मुलं मुली… आमच्याही आजी-आजोबांना बारा मुलं… मुली. नंतरच्या आमच्या वडलांच्या काळात ते चारवर आलं. चार असताना दोन तर मुलगे असावेत. त्याच्यामुळं चार मुलं, मुली व्हायला लागली. आमच्या पुढच्या पिढीत ते दोनवर आलं. आणि आता एकवर आलंय. असं ते झालं. फक्त पवार साहेब मात्र सदुसष्ट साली एका सुप्रियावर ते थांबले. ती त्यांची त्या काळातली दूरदृष्टी कौतुकास्पदच आहे. त्याच्यातनं ते घरात दादा दादा दादा…म्हणायला लागले. घरी कामवाल्या बाई, झाडूवाले, दूध आणणारे, पेपर आणणारे… हे सगळे दादा म्हणायचे. आणि शेतावर गेलं की तिथं एक पद्धत होती… मालक. म्हणजे शेतावर गडी माणसं आम्हाला मालक म्हणायची. त्यामुळं आम्हाला शेतावर जायला फार आवडायचं. तिथं गेल्यावर आपल्याला मालक म्हणतात. मोठेपण देतात…अहो मालक या. अहो-जाहो. त्याच्यामुळं तिथं गंमत वाटायची. पण ती एक पद्धत होती त्याकाळात. आजही सोलापूर जिल्ह्यात अनेकांना मालक म्हणतात. राजन पाटलांचंच उदाहरण आहे. परिचारक साहेब वारले, पण त्यांनाही मालक म्हणायचे. अनेकांना तिथं मालक म्हणतात. तसं इथं. इथं बारामतीत राहाणाऱ्या भावंडांच्यात मुलगा म्हणून मीच मोठा. त्याच्यामुळं दादा. म्हणजे अजितदादा असं नाव पडलं.
शेती, पोल्ट्री आणि दुग्धव्यवसाय
उमेदीच्या काळात मी बरेच व्यवसाय केले. या व्यवसायांमधून खूप काही शिकता आलं. मी कुठलाही व्यवसाय करतो त्यावेळेस मन लावून, झोकून देवून काम करतो. करायचं तर त्याच्यात रिझर्ल्ट ओरिएंटेडच काम करायचं. ज्यावेळेस वडिलांची डेअरी होती, त्या डेअरीच्यामध्ये काम करत होतो. दुग्धव्यवसायात होतो. तिथं एखादी गाय व्यायला झाली, रात्री विणार असेल तर तिथं बाहेर बाज टाकायची अन् बाजेवर बसायचं. गोठ्यामधली, ज्यांच्यावर दूध काढायची वगैरे जबाबदारी, चारा टाकायची जबाबदारी असायची ती गडीमाणसंही तिथंच असायचे. तर वासरू सुखरूपपणे बाहेर येईपर्यंत सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक करायचो. बैलगाडी चालवली आहे, सुट्टीच्या दिवशी रानात, म्हणजे बैलगाडीवाला तिथं गडी असायचा. पण त्याच्याबरोबर खत टाकायला जायचो. ट्रॅक्टरमधनं, ट्रॅक्टर ट्रेलरमधनं किंवा बैलगाडीतनं खतं टाकायला जायचं. नांगरट चालू असेल तर नांगरटीला जायचं. या असल्या आवडी असायच्या. कारण आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं. त्यामुळं शेती हा तसा आवडीचा. तसं ते दुधाचाही व्यवसाय उत्तम पद्धतीनं केला. गीर गाई वडिलांनी आणल्या होत्या. त्याला क्रॉसब्रीड करणं, त्याच्यातनं नवीन कालवडीची पैदास होवून ते वाढवणं. दुधाचा धंदा वाढवणं. त्याच्यातनं दोन पैसे कसे मिळतील हे पाहायचो. पोल्ट्रीसाठी लोन काढलं, युनायटेड वेस्टर्न बँकेचं. मोठी पोल्ट्री केली. साधारण रोज चाळीस हजार अंडी निघायची. मग ती अंडी पाठवणं. दोन दिवसाला, अडीच दिवसाला एक आयशर कँटर भरुन जायचा मुंबईला. असे सगळे धंदे केले. आणि त्या धंद्यात कधी कमीपणा वाटू दिला नाही. गडीमाणसं काम करीत असतील तर आपणपण त्यांच्याबरोबर अंडी गोळा करायची. घरातली सगळी मिसेसबिसेस सगळे गोळा करायचे. अशा पद्धतीनं आम्ही ते केलं. सगळे बारकावे, आम्हाला माहिती असल्यामुळं काय लोकांची अडचण असती, अन् गरीब माणसाला जगण्याच्या करता किती हाल-अपेष्टा सहन कराव्या लागतात, हे उघड्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. काही काळ अनुभवलेलं पण आहे. वडील वारले तेव्हा एकदम थोडीशी आर्थिक ओढाताण सुरू होती, पण त्याच्यातनं आम्ही सावरलो.
शेती फुलवण्याचं स्वप्न
आत्ताच्या मुलांचं जशा पद्धतीनं स्वप्न असतं, त्या काळात फार काही स्वप्न कुणी बघत नव्हतं. मी सांगतोय तो काळ १९६५ ते १९७५ चा काळ. त्या काळामध्ये स्वप्न म्हणजे काय, की आपण चांगलं, जसे आपले काका लोकं आहेत, तशा पद्धतीनं आपल्याला जमलं पाहिजे. एक जबाबदार नागरीक म्हणून आपण तयार झालो पाहिजे. आपल्याकडं चांगल्या भावनेनं लोकांनी बघितलं पाहिजे वगैरे. नंतर नंतर मात्र कळायला लागल्यावर आपण एक शेतकरी बनावं, आधुनिक पद्धतीची शेती करून त्याच्यातनं नवीन नवीन प्रयोग करावेत असं वाटायला लागलं, आणि मी केले. मी टोमॅटो घ्यायचो, डाळिंब घ्यायचो. वेगवेगळ्या प्रकारची पिकं आम्ही घ्यायचो. हे सगळं करत असताना नंतर मी राजकारणात ओढला गेलो. इकडं राजकारणात आलो. पण शेतीत लक्ष घातल्यानंतर बारामतीला कृषी विकास प्रतिष्ठानचा सात दिवसांचा पोल्ट्रीचा कोर्स केला. डेअरीचा कोर्स केला, सात दिवसांचा. की साधारण तुम्हाला तो व्यवसाय करत असताना प्राथमिक, या मुलभूत गोष्टी माहिती असल्या पाहिजेत. म्हणून आम्ही ते केलं. आणि त्याचा उपयोग होतो. आणि त्याचा उपयोग झाला. आणि त्याच्यातून नंतर असं वाटायचं की आपण, आपलं व्यवसायपाणी चांगलं असावं, आपल्या मुलांना शिक्षण, आपल्याला पुण्याला शिक्षण घेता आलं नाही, आपल्या मुलांना पुण्यामध्ये चांगल्या पद्धतीनं फ्लॅट वगैरे घेवून शिक्षण देता आलं पाहिजे. इंग्रजी माध्यमामध्ये टाकलं पाहिजे. ती चांगल्या पद्धतीनं शिकली पाहिजेत, वगैरे वगैरे…हे जे काही कॉमन मॅनचं किंवा मीडलक्लासचं जसं स्वप्न असतं, तशा पद्धतीनं स्वप्न होतं.
गाड्यांचे नंबर तोंडपाठ
तुम्ही सायकलपासून अशा काही गाड्या कुठल्या कुठल्या वापरल्यात. त्याची काही नंबर वगैर…
– नाही. नाही. सुरुवातीला शाळेमध्ये जायला आमचा बारामतीमध्ये आमराई भागात रहायचो आणि कॅनॉल ओलांडून आम्हाला पलिकडे एमईएस हायस्कूलमध्ये जावं लागायचं. त्याच्यामुळं चालत जायला लांब पडायचं म्हणून मग लहानपणीच वडिलांनी सायकल घेवून दिलेली होती. मला माझ्या पाच वर्षाच्या काळामध्ये दोन सायकली मिळाल्या. कारण आमच्याकडे, पाचवीत सायकल मिळाली. आणि दहावीपर्यंत अशा दोन सायकली. एकदम माझी सुरुवातीची सायकल लाल होती. एकदम चांगली. आणि नंतरची निळी होती. आणि मला तेव्हापासून ते शौक, चांगली सायकल ठेवायची, हे करायचं वगैरे. तर ते तेव्हा सायकलवर जायचो. नंतर मग मोटरसायकल घेतली. मोटरसायकल वापरली. ती एसडी नाही, पहिल्यांदा राजदूत होती. राजदूत होती ती १९६५ नंबरची. ती वापरली. मग श्रीनिवासला ९००९ची एसडी घेतली. तिचा ९००९ नंबर होता. ते सुरुवातीच्या काळात घेतलेलं असल्यामुळं ते नंबर आजदेखील पाठ आहेत. आमची गाडी, साहेब, तात्यांनी गाडी घेतली… तिचा नंबर एमएचएच ६८६८ होता, फियाट. दुसरी गाडी घेतली एमटीपी ९९९९. ही दुसरी गाडी घेतली. नंतर गाड्या खूप आल्या. त्याच्यामुळं इतकं नंबर माहिती नाहीत. पण हे त्या काळात गाडी येणं, त्या काळात मोटरसायकल असणं, त्या काळातलं जे कुतूहल… ते आता काय… नवीन पिढीला काय त्याचं कौतुक राहिलं नाही.
पवारसाहेबांची पहिली निवडणूक
तुमचं आयुष्य आता बघितलं तर निवडणुकांचाच खेळ झालाय. तर तुम्ही हे शाळेत असताना काही कधी निवडणुका लढवल्यात. म्हणजे वर्ग प्रतिनिधीच्या किंवा आणखी काही…
– शाळेत असताना नाही. मी ६७ साली पवारसाहेब पहिल्यांदा उभे होते, बैलजोडी खूण होती, तेव्हा आपलं शाळेतली पोरं घेवून… इकडून आला काँग्रेसवाला… तिकडून आला काँग्रेसवाला… असं काय काय घोषणा द्यायचो. व्होट फॉर काँग्रेस, वुई वाँट शरद पवार आणि फेरी काढायचो, आपापल्या पद्धतीनं जवळच्या भागातनं. असलं काय काय लहानपणापासनं करायचो. गणपती उत्सवात, गणेशोत्सवात गणपती बसवायचो. मग आम्ही आमच्या इथली क्रिकेटची टीम असायची. गणपती उत्सवात गणपती बसवला की पवार साहेबांना भेटायला समजा, विजयराव आले तर पावती पुस्तक घेवून… विजयराव दोन रुपयांची पावती द्या ना. दोन रुपये म्हणजे फार हं. पाच रुपये दिले म्हणजे त्यांच्यायला त्यांच्यासारखा माणूस नाय. रुपया, दोन रुपये… रुपया, दोन रुपये…, शंभर एक रुपये वर्गणी झाली तरी त्याच्यात गणपती, आरती बिरती सगळं… प्रसाद सगळं चालायचं. तेव्हा फार पैशाला महत्व होतं. फार म्हणजे फार महत्व होतं. आता पैशाला महत्व राहीलं नाही.
तुम्ही कुठं शाळेत असताना, किंवा कॉलेजला असताना निवडणूक.
– नाही. नाही. आमच्या एरियामध्ये क्रिकेटची टीम, मग त्याच्यात मीच कॅप्टन. किंवा ह्या बाकीच्या संदर्भात अशा काही गोष्टी असायच्या. ज्यावेळी आमच्यामध्ये रपारप्पी किंवा असं काही खेळ असेल, तर टीम वाटून घेत असताना त्याच्यामध्ये सुरुवातीला आम्हाला घ्यायचे. कारण आम्ही जरा खेळात-बिळात जरा अॅग्रेसिव्ह असायचो. चपळ असायचो… वगैरे, वगैरे.
मग हीच तुमची आवड तुम्हाला क्रीडा संघटनांकडे घेवून गेली य़ तुमचं एकूण योगदान विचार करता त्यावेळी राजकारणाइतकंच खेळातल्या बाबतीत.
– शंभर टक्के. कारण, काय झालं खेळांमध्ये आम्ही असल्यामुळं कब्बडी असोसिएशनचा मला प्रमुख केलं. खो-खो असोसिएशनचा प्रमुख केलं. नंतर तुमच्या ऑलिम्पिक असोसिएशन महाराष्ट्राचा प्रमुख केलं. आणि मला ज्यावेळेस संधी मिळते राज्य सरकारमध्ये काम करायची, त्यावेळेस, मी त्या क्रीडा क्षेत्राला जेवढं काही देता येईल, साहित्य, क्रीडा संस्कृती या गोष्टीला कसं महत्त्व देता येईल, पर्यटनाला कसं प्रोत्साहन देता येईल, हा माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. आणि इथून पुढं जोपर्यंत माझं काम चालेल, तोपर्यंत मी तो चालूच ठेवीन.
पहिली निवडणूक विकास सोसायटीची
तुमची पहिली निवडणूक कुठली तुमच्या आयुष्यातली. अगदी छोट्या पातळीपासून. सुरुवातीची. निवडणूक म्हटली तर…
– पहिली निवडणूक विविध कार्यकारी सोसायटीची. विकास सोसायटी. गावामध्ये जे तुम्हाला पिक कर्ज देते, काटेवाडीतली. बारामती शहराचं ठिकाण. त्याच्यामुळं तिथं सोसायटीचा प्रश्नच नाही. गावच्या सोसायट्या असतात. एक आहे बारामतीमध्ये काशी-विश्वेश्नर सोसायटी. आमच्याच लोकांच्या ताब्यामध्ये. पण, काटेवाडी आणि तिथे ढेकळवाडीमध्ये आमची सोमेश्वर विकास सोसायटी होती. वडील तिथं थोडंबहूत बघायचे. जाचक परिवार बघायचे. बलवंत परिवार बघायचा. तर तीथं मग मला… पंच कमिटी असती, त्याच्यात मला सदस्य म्हणून घेतलेलं होतं. नंतर मला चेअरमन केलं. मग मी बँकेचा प्रतिनिधी म्हणून तिथनं गेलो. बँकेमध्ये. सोसायटीचा प्रतिनिधी म्हणून बँकेचा मतदार असतो तो. आणि साखर कारखान्याची निवडणूक लागली. तेव्हा आप्पासाहेब काकांनी आणि गुरव **** साहेबांनी मिळून एक पॅनल केलेलं होतं… भवानीमाता पॅनल. आणि मग त्या पॅनलमध्ये… माझं लग्नही झालेलं नव्हतं… मला घेण्यात आलं. मग ती निवडणूक पहिली केलेली. ती गोष्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशीची. ८४ ची निवडणूक केली. त्या पॅनलमध्ये २१ उमेदवार आम्ही होतो. त्याच्यातले १८ उमेदवार आम्ही निवडून आलो. आणि ३ आमच्या समोरचं पॅनल होतं, त्यांचे आले. ही पहिली ८४ ची निवडणूक. दुसरी निवडणूक ९१ ची. बँकेमध्ये डायरेक्टर पदाला उभा राहिलो. बारामतीचा प्रतिनिधी म्हणून. तालुक्याचा एक एक प्रतिनिधी असतो. डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेला. तिथं उभा राहिलो. तिथं निवडून आलो. मग तिथं चेअरमन झालो. त्याच्यानंतर मग ९१ ला तिकीट मिळालं खासदारकीचं. मग खासदार झालो, प्रचंड मतानं झालो. एक नंबरने देशात आले राम विलास पासवान. मग काँग्रेसमध्ये एक नंबरनी आणि देशात दोन नंबरने मी आलो. आणि त्यावेळेस मला एकूण मते पडली होती, साडेचार लाख. आणि माझ्या विरोधी होते, प्रतिभाताई लोखंडे, त्यांना पडली होती एक लाख. साडेतीन लाखांच्या मताधिक्यानं त्या काळात मी निवडून आलो.
घरच्यांसाठी वेळ
तुम्ही एवढं राजकारणात व्यग्र असता, अशा परिस्थितीत तुम्ही घरच्यांसाठी, कुटुंबासाठी किती आणि कसा वेळ देता. एकत्र कुटुंब वेगळं. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी.
– मी सांगितलं ना, ज्या वेळेस सुट्टी… त्याच्यासंदर्भात घरी आल्यानंतर जर घरी सगळे असतील तर एकत्रपणे रात्री जेवायला टेबलवर बसायचं. त्यानिमित्तानं हे करता येतं. सकाळी ब्रेकफास्ट… आता मी ब्रेकफास्ट करत नाही. पण त्यावेळेस ब्रेकफास्ट करायचो तर ब्रेकफास्ट करताना, त्या वेळेस. दुपारचा डबा तर ऑफिसलाच. जिथं ऑफिस असेल तिथं खावा लागायचा. तो यायचा घरनं. अशा पद्धतीनं ते…
फिरायला वगैरे जाणं… कौटुंबिक सहल….
– नाही, नाही. इथं मुंबईला असले तर कुठल्या तरी हॉटेलला जेवायला जायचं, कधी चित्रपट पहायला जायचं. कधी नाटक पाहायला जायचं अशा पद्धतीनं.
लग्न कसं ठरलं?
तुमचं लग्न ठरतानाची प्रक्रिया कशी होती, म्हणजे वधू संशोधन हे कसं झालं अन् तुमचा निर्णय तो कुणाचा होता, लग्नासंदर्भात.
– नाही… त्याच्यामध्ये… आपल्यामध्ये कसं असतं, एखादा लग्नाची मुलं, मुली असली तर कुणीतरी सांगतं की ह्यांच्या घरात लग्नाचा मुलगा आहे, कुणी सांगतं… आमचं काही लव्ह मॅरेज नाही. लव्ह मॅरेज असलं की ते सांगायचा प्रश्न येत नाही. त्याच्यामुळं… पवार साहेबांचे आणि पद्मसिंह पाटलांचे संबंध. मला काही स्थळं आली होती. काही मी बघितली होती. आणि मग नंतर हे स्थळ आलं. जे मी पसंत केलं ते सुनेत्राला. आणि ते स्थळ आल्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला. तो इथं मुंबईमध्येच त्याठिकाणी करण्यात आला. कारण पद्मसिंहांचे ते अजितबाबा म्हणून त्यांचे बंधू आहेत, डॉक्टर. त्यांच्या फ्लॅटवर. कुलाब्यामध्ये राहातात. आणि बघण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर मग बाकीचं… आमच्या प्रतिभाकाकी आहेत, त्यांनी ते पुढाकार घेतला. आणि मग ती चर्चा झाली. आणि तशा पद्धतीनं लग्न ठरलं. मग लग्नामध्ये साहेब, काकालोक सगळे वेलकम करायला होते. आणि त्या पद्धतीनं. त्यांच्याकडंपण घरात राजकारण पद्मसिंह पाटलांच्या. आमच्याही घरात राजकारण. त्याच्यामुळं ज्यांच्या घरात जे चालू असतं, तिथल्या त्या घरातली मुलगी, मुलगा एकमेकाच्या घरात द्यायला इतकी अडचण येत नाही. एखाद्या राजकारणी माणसाच्या घरात, ज्यांच्या घरात राजकारण नसणारी व्यक्ती आली, तर ते जुळायला जरा वेळ लागतो.
राजकारणात नसतो तर…
तुम्ही असा काही विचार करता का, तुम्ही राजकारणात आला नसता तर काय, कुठल्या क्षेत्रात असता.
– मी राजकारणात आलो नसतो तर चांगल्या पद्धतीनं, उत्तम आधुनिक पद्धतीची शेती केली असती, नी त्याच्याच बरोबर व्यवसाय केला असता. आणि उद्योगपती झालो असतो. मला ते लोकांना व्यवस्थितपणे न्याय देणं, बिझनेस चांगला करणं, त्याच्यातनं उलाढाल चांगली होऊ देणं, त्याच्यातनं त्या भागाला डायरेक्ट, इनडायरेक्ट मदत करणं, ह्या गोष्टी मला आवडतात.
वारसा…
– नाही. मी असा काही विचार केलेला नाही. असा विचार करण्यात अर्थ नसतो. ज्याच्यात कर्तृत्वगुण, नेतृत्वगुण ज्याच्यामध्ये या गोष्टी सगळ्या असतात, ते पुढं जात असतात. आणि राजकीय लोकांच्या परिवारामध्ये पुढच्या पिढीला सगळ्यांनाच राजकारणात आवड असते असं नाही. आता आमची एवढी मोठी फॅमिली. पण, त्या सगळ्या फॅमिलीमध्ये, भावंडांच्यात राजकारणात आवड कुणाला होती… शरदराव पवारांना. पहिल्या पिढीची. पहिल्या आबा-बाईंची धरली तर दुसरी पिढी. तिसरी पिढी जर आमची धरली… तिसऱ्या पिढीत आम्ही एवढी भावंड, बहिणी सगळीजणं. जवळपास नऊ बहिणी आम्ही आणि सहा भावंडं. पंधराजण आहोत. पंधराजणात आवड कुणाला होती अजित पवारला. तो आला. आता तिसऱ्या पिढीत, रोहितला आवड होती, रोहित पुढं आला. आवड. मी पुन्हा सांगतो आवड. असं असतं ते. सुप्रियाला आमच्या पिढीत आवड होती. ती माझ्याबरोबर… माझ्यानंतर ती आली.
महाराष्ट्र की दिल्ली..?
लोकसभेत गेला असताना महाराष्ट्रात आला. कधी मनात आलं का की दिल्लीत …
– कधीच नाही. मला पक्षाने सांगितलं तरी मी म्हणेन की ठिक आहे, तुम्ही दुसऱ्या कुणाला द्या. त्याला पाठवण्याच्याकरीता आपण सर्वस्व पणाला लावू. परंतु विजयराव मी तिथलं राजकारण बघितलेलं आहे. ते जरा वेगळ्या प्रकारचंच राजकारण आहे. महाराष्ट्रातलं राजकारण वेगळं आहे. आम्हाला सकाळपासून माणसं, आता तुम्ही बघत होता, मला माणसं, त्यांची कामं करणं, त्यांचं समजावून घेणं… काही स्पष्ट भूमिकेमध्ये आपली मतं मांडणं, वगैरे या गोष्टी आवडतात. त्यामुळं मला महाराष्ट्राच्या राजकारणात रस आहे. मला दिल्लीच्या राजकारणात रस नाही.