Home » Blog » भाजपचे एकतर्फी वर्चस्व, अजितदादांना धक्का, कोल्हापूर-लातूरमध्ये काँग्रेसची झुंज

भाजपचे एकतर्फी वर्चस्व, अजितदादांना धक्का, कोल्हापूर-लातूरमध्ये काँग्रेसची झुंज

by प्रतिनिधी
0 comments
A setback for Ajit Pawar

भारतीय जनता पक्ष यंत्रणांचा गैरवापर करतोय, सत्तेच्या माध्यमातून मुजोरी करतोय, प्रचंड प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. निवडणुकीमध्ये पैशाचा होणारा अमाप वापर हे त्याचेच निदर्शक आहे. तरीसुद्धा लोक भारतीय जनता पक्षाला निवडून देताहेत. हे चित्र पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला भस्म्या रोग झाला आहे का, असा प्रश्न निर्माण झाल्यावाचून राहात नाही.

विजय चोरमारे

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमधील बहुतांश महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वर्चस्वाला भाजपने मोठा हादरा दिला आहे. राज्यात फक्त लातूर आणि कोल्हापूरमध्ये काँग्रेसने भाजपशी लढत दिली, त्यापैकी लातूरमध्ये सत्ता मिळवण्यात यश मिळवले. वसई-विरारमध्ये हिंतेद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने आपले वर्चस्व राखले आहे. अहिल्यानगरमध्ये संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने लक्षणीय यश मिळवले आहे. (A setback for Ajit Pawar)

नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने घवघवीत यश मिळवले होते. त्याचवेळी राज्यातील निवडणुकांची दिशा काय असू शकेल, हे स्पष्ट झाले होते. महापालिका निवडणुकीच्या काळात तर कहर झाला. भारतीय जनता पक्षाने ४४ उमेदवार बिनविरोध निवडून आणले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनेही २० उमेदवार बिनविरोध निवडून आणले.  त्यामुळे महापालिका निवडणुकांचा कलही स्पष्ट झाला होता. जिथे विरोधी उमेदवार विकत घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा वापर केला, तिथे मतदारांना विकत घेण्यासाठीही तोच प्रयोग होणार हे स्पष्ट होते. मतदारांना विकत घेण्यासाठी विरोधी उमेदवार विकत घेणे सोपे आहे, हे या निवडणुकीत दिसून आले आहे. त्यामुळे पुढच्या निवडणुकीत हा प्रयोग व्यापक प्रमाणावर राबवला जाण्याची शक्यता आहे. (A setback for Ajit Pawar)

राजकीय चारित्र्य कसेही असू द्या, मतदारांना पैशांनी विकत घेता येते, याबाबत भाजपचा आत्मविश्वास जबर आहे. पैशाची मस्ती, सत्तेचा नंगानाच, बेशरमपणे केलेली फोडाफोड वगैरे कोणतेच मुद्दे आपल्या विरोधात जाऊ शकत नाहीत याबद्दल भाजपच्या नेतृत्वाला खात्री आहे. भाजपचे हे वास्तव असतानाही त्यांच्याविरोधात उद्धव आणि राज ठाकरे मुंबईत उभे राहिले, हे विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या हिंमतीला दाद द्यायलाच पाहिजे. खरेतर काँग्रेसने अधिक ताकदीने लढायला पाहिजे होते. मुंबईत काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीशी आघाडी केली. तशी ती लातूरमध्येही केली होती. त्या आघाडीचा फायदा दोघांनाही झाला. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचितचे जसे मनोमीलन झाले होते, तसे मुंबईत झाले नव्हते. आघाडी झाल्यानंतरही विसंवाद कायम होता. त्यामुळे अपेक्षित यश मिळाले नाही. (A setback for Ajit Pawar)

मोठ्या प्रमाणावर मतदार विकला जातोय, हे खरे असले तरी विकला न जाणारा मतदारही लक्षणीय आहे. भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीव्यतिरिक्त अन्य पक्षांना मिळालेली मतांची टक्केवारी ही आशादायक आहे. याच टक्केवारीचा विश्वास कायम ठेवून ती वाढवण्यासाठी भविष्यात नियोजनबद्धरीतीने प्रयत्न व्हायला हवेत. कारण सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणी आलेला नसतो. कधीतरी लोकांची विवेकशक्ती जागृत होते. लोकसभेला तो अनुभव आपण घेतला आहे. चारशेपारच्या गप्पा झोडणा-या भाजपला दोनशे चाळीसवर रोखण्याचे काम भारतीय मतदारांनी केले होते. त्यात महाराष्ट्राने भाजपला रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे सगळेच संपले आहे, असे म्हणता येणार नाही.

महायुतीतले पक्ष प्रत्येक महापालिकेत वेगवेगळ्या पद्धतीने लढत होते. ‘जीत भी मेरी पट भी मेरी’ अशातला हा प्रकार होता. विरोधी पक्षांची जागा बळकावण्याचा हा प्रयत्न होता. त्यात ब-यापैकी महायुतीला यश आलेले दिसते.

भाजपने आपल्या महायुतीतल्या मित्रपक्षांच्या दोन्ही नेत्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. नवी मुंबईत गणेश नाईक यांच्यामार्फत एकनाथ शिंदे यांचे वस्त्रहरण करण्यात आले. आणि पिंपरी चिंचवडमध्ये महेश लांडगे यांच्यामार्फत अजितदादांचे वस्त्रहरण करण्यात आले. राज्याचे नेते म्हणून मिरवणा-या या दोन्ही नेत्यांना भाजपने या निवडणुकीत लोकल पातळीवर आणून सोडले. हाही भाजपचा एक नवा डाव म्हणता येईल.

नवी मुंबईत गणेश नाईकांचा जो प्रभाव होता, तो कायम राहिलेला आहे. नवी मुंबईच्या विकासाशी गणेश नाईक यांचा थेट संबंध आहे. शहरांचे मोठ्या प्रमाणावर बकालीकरण होत असताना नवी मुंबईचे सौंदर्य टिकवण्यात गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न झाले. त्याचमुळे गणेश नाईक शिवसेनेत असोत, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असोत किंवा भाजपमध्ये. त्यांनी आपला गड कायम राखला आहे. यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यापुढे आव्हान उभे केले होते. परंतु तेही मोडून काढून त्यांनी सत्ता कायम राखली.

You may also like

error: Content is protected !!
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00