- विजय चोरमारे
अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. शरद पवार यांचा राजकीय वारसा समर्थपणे पुढे नेताना अल्पावधीत त्यांनी स्वतःची कार्यशैली निर्माण केली. स्वतःची ओळख निर्माण केली. साडेतीन दशकांच्या राजकीय प्रवासात अजित पवार यांनी विविध पदांवर विविध जबाबदा-या पार पाडल्या आहेत. त्या पार पाडताना सत्तेचा वापर सर्वसामान्य माणसांसाठी करावयाचा असतो, याचा विसर त्यांनी कधी पडू दिला नाही. आमदार, राज्यमंत्री, विविध खात्यांचे मंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे नेते अशा भूमिकांमध्ये त्यांनी समरसून काम केले. त्यांच्या संसदीय राजकारणाची सुरुवात खासदारकीपासून झाली, परंतु ती कारकीर्द अगदीच अल्प आणि मूल्यमापन करण्याजोगती नव्हती. परंतु विधिमंडळ सदस्य म्हणून कारकीर्द सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा काही काळ गेल्यानंतर त्यांनी जी गती घेतली, ती अचंबित करणारी आहे. शरद पवार यांचे पुतणे अशी प्रारंभीच्या काळातील ओळख पुसून त्यांनी अजितदादा पवार अशी स्वतंत्र ओळख निर्माण केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द अनेक अर्थांनी महत्त्वाची ठरली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून प्रारंभीच्या काळातील त्यांची कामगिरीही लक्षणीय होती. (Ajit Pawar Rational Secular Leader)
सामान्य माणसासाठी सत्ता
राजकीय नेत्याच्या आयुष्यात अनेक चढउतार असतात. अजित पवार यांची वाटचालही त्याला अपवाद नव्हती. राजकीय नेत्याला आपल्या प्रवासात हार आणि प्रहार दोन्ही झेलावे लागतात. त्यांचे प्रमाणही ठरलेले असते. परंतु अजित पवार यांच्या वाट्याला कौतुकाचे क्षण फार कमी आले. तुलनेने टीका खूप सहन करावी लागली आणि त्यांच्या चांगल्या कामाची उपेक्षाही करण्यात आली. हार कमी प्रहारच जास्त सोसावे लागले. अर्थात त्यासाठी वर्तमान व्यवस्था कारणीभूत आहे, तेवढाच त्यांचा स्वभावही कारणीभूत आहे. अलीकडच्या काळात केलेल्या आणि न केलेल्या कामाचे मार्केटिंग करून प्रतिमा निर्मितीचे काम राजकीय क्षेत्रात करून घेतले जाते. त्यासाठी अनेक यंत्रणा कामाला लावल्या जातात. अजित पवार यांना मात्र या नव्या संस्कृतीशी जुळवून घेता आलेले नाही. त्यामुळे त्यांनी केलेली चांगली कामेही लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. किंबहुना ती पोहोचवण्यासाठी ते स्वतः प्रयत्न तर करीत नाहीतच, परंतु कुणी आपणहोऊन त्यासंदर्भातील माहिती घ्यायची म्हटले तरी ती देण्यासाठी त्यांच्याकडून फारसा उत्साह दाखवला जात नाहीत. परिणामी कानोकानी व्हायरल झालेल्या गोष्टीच बातम्या म्हणून लोकांपर्यंत पोहोचतात. वस्तुस्थिती वेगळीच असते. मंत्रिपदावर असताना त्यांनी जनता दरबारच्या माध्यमातून अक्षरशः हजारो माणसांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. पक्ष, गट, प्रांत न बघता जो माणूस आला, त्याची समस्या सोडवण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. सामान्य माणसासाठी सत्ता कशी राबवायची असते, याचा वस्तुपाठच अजित पवार यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून घालून दिला आहे. परंतु त्याची त्यांनी कधीच जाहिरात केली नाही. गवगवा केला नाही. (Ajit Pawar Rational Secular Leader)
कोविड काळातील जोखीम
महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री होते. सरकार सत्तेवर आले आणि काही कालावधीतच करोनाचा कहर सुरू झाला. उद्धव ठाकरे सत्तेच्या राजकारणात नवे होतेच, शिवाय त्यांचे प्रकृतीचे काही प्रश्न होते. त्यामुळे लोकांच्यात मिसळणे, मंत्रालयात येणे त्यांच्यासाठी जोखमीचे होते. कुणी कितीही म्हटले तरी राज्याचा कारभार घरात बसून हाकणे एवढे सोपे नसते. स्वाभाविकपणे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांनी सूत्रे घेतली. नुसती सूत्रे घेतली नाहीत, तर संवेदनशील काळात कारभार किती जबाबदारीने करावयाचा असतो याचे दर्शन घडवले. या काळात सकाळी नऊ वाजता मंत्रालयात येणारे अजित पवार संध्याकाळी उशिरापर्यंत काम करायचे. शुक्रवारी पुण्याला जाऊन तीन दिवस पालकमंत्री म्हणून पुण्याचे प्रश्न मार्गी लावायचे. सबंध कोविड काळात अविरतपणे न थकता ते काम करीत राहिले. कोविड काळातील विविध घटकांनी केलेल्या कामाच्या कथा चर्चेत होत्या. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांच्या कामाचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक झाले. वृत्तपत्रांतून, मासिकांमधून, डिजिटल मीडियामधून त्यांच्या कामासंदर्भात अनेक लेख छापून आले. तुलनात्मकदृष्ट्या विचार केला तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदावरून महाराष्ट्रात केलेले काम त्यांच्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक होते. परंतु त्यांच्या कामाची कुणी स्वतंत्रपणे चार ओळींचीही नोंद घेतली नाही, हे इथे मुद्दाम नमूद करावेसे वाटते. अजित पवार यांचे माध्यमांशी फटकून राहणे त्याला कारणीभूत असले तरी, माध्यमांचा पक्षपातीपणाही त्यातून दिसून येतो. एरव्ही अजित पवार यांच्यासंदर्भातील नकारात्मक बातम्या हिरिरीने चालवणा-या महाराष्ट्रातील माध्यमांनी अजित पवार यांनी एका कठीण कालखंडात केलेल्या कामाची, राज्याला दिलेल्या नेतृत्वाची घोर उपेक्षा केली. कोविडकाळात राजकोषीय तूट तीन टक्क्यांहून कमी ठेवल्याबद्दल कॅगच्या अहवालात अर्थमंत्री अजित पवार यांचे कौतुक करण्यात आले. अजित पवार यांनी अर्थमंत्री म्हणून केलेल्या कामाची पावती त्यातून मिळाली. कोविड काळात त्यांनी व्यापक पातळीवर केलेल्या कामाची नीट दखल घेतली गेली नाही, परंतु कॅगच्या अहवालातील कौतुकामुळे त्यांच्या एकूण कामाला उजाळा मिळाला. (Ajit Pawar Rational Secular Leader)
प्रकल्पग्रस्तांचे कैवारी
अजित पवार सामान्य माणसांचा, तळागाळातल्या घटकांचा किती आस्थापूर्वक विचार करतात आणि त्यांच्यासाठी सत्ता राबवताना किती किती कर्तव्यकठोर होतात, हे प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांवरून लक्षात येते. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर आणि सहका-यांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी अनेक लढे दिले. परंतु ज्या ज्या वेळी अजित पवार यांच्या कार्यकक्षेतील विषय आला, तेव्हा मात्र अजित पवार यांनी सरकारी यंत्रणेच्या मर्यादांवर मात करून प्रकल्पग्रस्तांच्या हिताचे निर्णय दिल्याचे त्यांनी अनेकदा जाहीरपणे सांगितले आहे. (Ajit Pawar Rational Secular Leader)
कोकणातल्या तिलारी प्रकल्पाचे उदाहरण आहे. हा प्रकल्प आंतरराज्यीय प्रकल्प आहे. त्यामुळे त्या प्रकल्पाला महाराष्ट्राचा पुनर्वसन अधिनियम लागू नाही. मग पुनर्वसन कसे करायचे हा प्रश्न निर्माण झाला. पुनर्वसनाचे नाव काढायला कुणी अधिकारी तयार नव्हते. लोकांना विस्थापित करण्याची जोरदार तयारी चालू होती. डॉ. भारत पाटणकर आणि सहका-यांना हे समजल्यावर त्यांनी धरणावर जाऊन धरणाचे काम बंद पाडले. त्यानंतर संबंधित खात्याचे मंत्री असलेल्या अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक लावली. सर्वांगानी चर्चा करून मार्ग काढण्यासाठी आंदोलकांनी काही पर्याय मांडले. त्यानुसार अजित पवार यांनी निर्णय घेतला. लाभ क्षेत्रात जमीन देऊन पुनर्वसन आणि स्लॅब लाऊन सुद्धा पुनर्वसनासाठी जमीन मिळणार नसेल तर जमिनी विकत घेण्यासाठी निधी देण्याची तरतूद करण्याचे ठरले. महाराष्ट्राने निर्णय घेतल्यामुळे गोवा सरकारला सुद्धा भरघोस निधी देणे भाग पडले. केवळ अजित पवार असल्यामुळेच असा निर्णय होऊ शकला. (Ajit Pawar Rational Secular Leader)
रत्नागिरी जिल्ह्यातील कुडप धरणाच्या उदाहरणावरून अजित पवार यांची धडाडी दिसून येते. पुनर्वसनासाठी पर्यायी जमीन मिळाल्याशिवाय काम सुरू न करण्याचा संघर्ष सुरू झाला. लाभक्षेत्रातल्या लोकांना जमिनीला पाणी पाहिजे होते पण जास्त जमीन धारकांची स्लॅब लाऊन जमीन देण्याची तयारी नव्हती. संघर्ष निर्माण झाल्यावर अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली. जर लाभक्षेत्रातील लोक जमीन देत नसतील तर त्यांना शेतीला पाणी मिळावे असे म्हणण्याचा हक्क राहू शकत नाही, असा निर्णय घेतला. त्यामुळे धरण रद्द करण्यात यावे, ही चळवळीची आणि पुनर्वसन अधिनियमातली भूमिका अंतिम झाली. अजित पवार यांनी हेलिकॉप्टरने खास जाऊन शेतकऱ्यांची सभा घेतली आणि जमीन न देण्याची भूमिका कायम राहिल्याने कुडप धरण रद्द करण्याची घोषणा त्यांनी केली. अशा प्रकारचा निर्णय इतिहासातील एकमेव असावा. अशी जिगर फक्त अजित पवारच दाखवू शकतात.
बदनामीची मोहीम
अजित पवार यांनी जलसंपदा मंत्री म्हणून घेतलेल्या अशा ऐतिहासिक निर्णयांची चर्चा कधीच झाली नाही. किंबहुना ती करण्यात कुणालाच रस नव्हता. परंतु सिंचन घोटाळ्याच्या नावाखाली दशकभरात त्यांची यथेच्छ बदनामी करण्यात आली. ७० हजार कोटी रुपयांचा घोटाळा असा अपप्रचार केला गेला, आणि त्याचे पतंग प्रसारमाध्यमे वर्षानुवर्षे उडवत राहिली. गोबेल्स पद्धतीने प्रचार करून महाराष्ट्राच्या एका धडाडीच्या नेत्याला राजकारणातून उठवण्याचे प्रयत्न झाले. राज्य सहकारी बँकेमध्ये डझनावारी संचालक असताना आणि त्यात सर्वपक्षीय मंडळी असताना तिथेही एकट्या अजित पवार यांच्याभोवतीच संशयाचे धुके निर्माण करून त्यांच्याभोवतीच चर्चा सुरू ठेवण्यात आली. सिंचन प्रकरणामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काडी टाकली आणि भारतीय जनता पक्षाने त्यांचा कार्यक्रम पुढे नेला. सततची चर्चा आणि आरोपांना वैतागून अजित पवार यांनी तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. सरकारने त्यासंदर्भात श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली. जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांची समिती नेमली. त्यातून काही निष्पन्न झाले नाही. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, रावसाहेब दानवे वगैरे मंडळींनी बैलगाडीभर पुरावे घेऊन मोर्चा काढला. या आरोपांवर स्वार होऊन भाजपची सत्ता आली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील पाच वर्षांच्या सत्तेत सिंचन घोटाळ्यासंदर्भात कारवाई करता आली नाही. या सगळ्यातून राजकीय आरोप आणि वस्तुस्थिती यातील फरक स्पष्ट होतो. एका कर्तृत्ववान नेत्यावर सातत्याने आरोप करून भ्रष्ट नेता अशी त्याची प्रतिमा निर्माण करण्याचे नियोजनबद्ध रितीने प्रयत्न करण्यात आले. परंतु अशा सगळ्या हल्ल्यांवर मात करून अजित पवार निर्धाराने वाटचाल करीत राहिले.
राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यानतर सुरुवातीच्या काळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे दिल्ली दौरे आणि मुख्यमंत्र्यांचे देवदर्शन दौरे सुरू असताना विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार पायाला भिंगरी लावून चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरत होते. पूरग्रस्तांच्या समस्या, अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालेल्या शेतक-यांच्या समस्या स्वतः जाणून घेत आहेत. अधिवेशनादरम्यान दोन दिवस सुट्टी असताना त्यांनी थेट मेळघाट गाठले आणि आदिवासींच्या समस्या समजून घेतल्या. कुपोषणाच्या प्रश्नाबाबत विधानसभेत आवाज उठवला. शरद पवार यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी व्यापक सामाजिक भान ठेवून वाटचाल सुरू केल्याचेच हे निदर्शक होते. (Ajit Pawar Rational Secular Leader)
अजित पवार हे धडाडीचे नेते आहेत. सकाळी सात वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत अखंड काम करणारे नेते आहेत. इतके काम करूनही आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ते सातत्याने चर्चेत असतात आणि अनेकदा त्यामुळे वादातही सापडतात.
यशवंतरावांची आठवण
यशवंतराव चव्हाण यांनी एके ठिकाणी लिहिलंय – ‘राजकारणाचा प्रपंच करताना दुसऱ्याचं अंतःकरण जाणावं लागतं. अडचणीत न सापडण्याची खबरदारी घ्यावी लागते. समय ओळखावा लागतो. प्रसंगी नम्र व्हावे लागते. लोकांची पारख करावी लागते. प्रामाणिक आणि फितूर, दोन्ही गृहीत धरावी लागतात. दोष आढळला, तर तो अवगुण मानावा लागतो. वेळप्रसंगी त्याकडे काणाडोळा करावा लागतो. विरोधकांशी त्यांच्याच शस्त्राने लढावे लागते. तसे करणे कित्येकदा आवश्यकच असते. दूरदर्शीपणाने काही कयास बांधावे लागतात आणि पुन्हा सर्वांना बरोबर घेऊन पुढे जावे लागते.’ (Ajit Pawar Rational Secular Leader)
अजित पवार यांना एका व्यापक ध्येयाकडे जाताना यशवंतरावांचे हे विचार आत्मसात करावे लागतील. तरीसुद्धा त्यांची वाटचाल खडतरच राहणार आहे. पवार कुटुंबाचा वारसा, विज्ञाननिष्ठ भूमिका यामुळे इथल्या सनातनी यंत्रणा त्यांचे दोष शोधून त्यावर प्रहार करण्याची संधी सोडणार नाहीत. अनवधानाने एक चुकीचे वक्तव्य केल्यानंतर त्याबद्दल तीनतीनदा माफी मागितल्यानंतरही प्रसारमाध्यमे अजित पवार यांची पाठ सोडायला तयार नव्हती, हे महाराष्ट्राने पाहिले आहे.
लाल महालातील घाव
अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीत एका घटनेचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. ती घटना म्हणजे लाल महालातील दादोजी कोंडदेव यांचा पुतळा कापण्याची.
पुण्यातील लाल महालात दादोजी कोंडदेव आणि राजमाता जिजाऊ यांचे शिल्प होते. या शिल्पाची संकल्पना ज्यांच्या डोक्यातून आली त्यांनीच पुढे जेम्स लेनपर्यंतची सगळी कारस्थाने घडवून आणली. संभाजी ब्रिगेडसह मराठा संघटनांचा या शिल्पाला आक्षेप होता. हे शिल्प हटवण्यासाठी मोठी आंदोलनेही झाली. एकूण जनमताचा रेटा पाहून रात्रीत दादोजींचे शिल्प कापून काढले आणि अज्ञात स्थळी हलवण्यात आले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि पुणे महापालिकेत सत्ता असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून अजित पवार यांनी घेतलेला हा निर्णय होता. अजित पवार यांचा हा घाव अनेकांच्या वर्मी लागला. त्यामुळे दुखावलेले घटक अजित पवार यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत असतात. त्याची मोठी किंमत अजित पवार यांना चुकवावी लागली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान बाळगणाऱ्या मराठा समाजासह इतरही सर्व समाजघटकांनी अजित पवार यांचे हे ऐतिहासिक योगदान लक्षात घ्यायला हवे.(Ajit Pawar Rational Secular Leader)
आजही अजित पवार ज्या झपाट्याने काम करतात ते थक्क करणारे आहे. लोकांसाठी उपलब्ध असलेला असा नेता दुसरा दाखवता येत नाही. मात्र त्याची दखल न घेता चुकीच्या कारणांसाठी त्यांचे दाखले देऊन आणि निमित्त सापडले की त्यांची कोंडी करून सूड उगवला जातो. एका चांगल्या नेत्याला सतत आरोपीच्या पिंज-यात उभे केले जाते. या सगळ्याची कारणे राजकारणापेक्षाही इथल्या सांस्कृतिक संघर्षात आहेत. अजित पवार यांचे राजकीय निर्णय अनेकांना पटलेले नसणे स्वाभाविक आहे. त्यापलीकडे जाऊन विचार करावयाचा तर ते महाराष्ट्राचे आजचे आणि उद्याचेही नेतृत्व होते. विज्ञाननिष्ठ नेतृत्व होते. पुरोगामी नेतृत्व होते, त्यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राचे अपरिमित नुकसान झाले आहे.