ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात समुद्र किनाऱ्यावर ज्यू माणसं हनुक्का सणाचा आनंद लुटत होते. दोन माणसांनी दुरवरून त्यांच्यावर बंदुक चालवली. ४० जणं जखमी झाले, १५ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका कारमधे आयईडी स्फोटकं सापडली.बाप आणि मुलगा अशी हल्लेखोरांची जोडी होती. बाप १९९८ मधे ऑस्ट्रेलियात स्थलांतरीत होऊन नागरीक झाला होता, २४ वर्षाचा त्याचा मुलगा ऑस्ट्रेलियात जन्मल्यानं जन्मजात नागरीक झाला होता. त्यांच्या घरी असलेल्या आणि त्यांनी वापरलेल्या म्हणून ६ बंदुका त्यांच्याकडं होत्या. या बंदुका लष्करी उपयोगासाठी तयार केलेल्या प्रभावी दर्जाच्या होत्या.शक्यता दाट आहे पण अजूनही गाझामधल्या युद्धाबद्दलची चीड व्यक्त करण्यासाठी वरील हल्ला झाल्याचं सिद्ध झालेलं नाही.
निळू दामले
या घटनेची बातमी आणि रील्स घटना घडल्यापासून चौथ्या पाचव्या मिनिटालाच जगभर पसरल्या. लगोलग पोलीस घटनास्थळी पोचले, धरपकड झाली, चौकशी सुरु झाली. एक हल्लेखोर मेला होता, एक हल्लेखोर गंभीर जखमी अवस्थेत पोलिसांच्या हाती पडला होता. अजून तपास सुरु व्हायचा होता.
इस्त्रायलकडून राजकारण करण्यास सुरुवात
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी आणि पोलिस प्रमुखांनी घटना जगासमोर ठेवली आणि शांततेचं आव्हान केलं, अजून पर्यंत त्यांच्याजवळ कोणतीही माहिती वा पुरावे गोळा झाले नव्हते. पण इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू आणि अध्यक्ष हरझोग यांनी हा हल्ला दहशतवाद्यानी केला आहे असं सांगून टाकलं. तेवढ्यावर दोघे थांबले नाहीत. ऑस्ट्रेलियामधे ज्यूविरोध (अँटीसेमिटिझम) बोकाळला असून सरकार त्यावर प्रभावी कारवाई करत नाही असा आरोप दोघांनी केला. अजून कोणतेही पुरावे नसतांना दोघांनी राजकारण करायला सुरवात केली. (Jews attacked while celebrating Hanukkah in Australia)
ऑस्ट्रेलियाकडून गाझामध्ये चाललेल्या युद्धाचा निषेध
ऑस्ट्रेलियातले लाखो नागरीक इस्रायलनं गाझामधे चालवलेल्या युद्धाचा निषेध करण्यासाठी अनेक वेळा रस्त्यांवर आले होते. विद्यार्थी आणि तरूण इस्रायल निषेधात आघाडीवर होते. ऑस्ट्रेलियन सरकारनं इस्रायलचा निषेध केला होता; युद्ध थांबवा अशी विनंती केली होती; पॅलेस्टाईन देश स्थापन करा असा ठराव मांडला होता. युनायटेड नेशन्सनं इस्रायलच्या युद्धखोरीचा निषेध केला होता; इस्रायल व पॅलेस्टाईन अशी दोन राष्ट्रं निर्माण व्हावीत असा ठराव केला होता, ऑस्ट्रेलियानं त्या ठरावाला पाठिंबा दिला होता. नेतान्याहूंनी ऑस्ट्रेलियन सरकारवर या निर्णयाबद्दल टीका केली होती. (Jews attacked while celebrating Hanukkah in Australia)
वेस्ट बँक या पॅलेस्टाईनच्या विभागात इस्रायल बेकायदा वसाहती बांधत आहे यावर युनायटेड नेशन्स आणि ऑस्ट्रेलियानं टीका केली होती. टीकेला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल सरकारनं ऑस्ट्रेलियन राजदूतांचे व्हिसा रद्द केले होते.
गाझाच्या प्रश्नांवरुन इस्त्रायल, ऑस्ट्रेलियात तणाव
ऑस्ट्रेलियन जनता इस्रायली कारवाईवर टीका करतेय याचा फायदा घेऊन इराणी सरकारनं ऑस्ट्रेलियातल्या ज्यूं विरोधात दंगली धडवण्याचे प्रयत्न केले होते. ऑस्ट्रेलियन सरकारनं इराणी राजदूतांचे व्हिसे रद्द केले होते. इस्रायलचं धोरण आपल्याला मंजूर नसलं तरी इस्रायली आणि ज्यू माणसं ऑस्ट्रेलियात सुरक्षीत आहेत, त्यांची पुरेपूर काळजी आपण घेत आहोत असं ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी वारंवार स्पष्ट केलं होतं.गाझाच्या प्रश्नावरून इस्रायल आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तणाव होता आणि आहे. ज्यूंवर झालेल्या हल्ल्याला ही पार्श्वभू्मी आहे. (Jews attacked while celebrating Hanukkah in Australia)
अमेरिकेत इस्त्रायलचा निषेध करण्यासाठी ज्यु विद्यार्थीही रस्त्यांवर
काही दिवसांपूर्वी इंग्लंडमधल्या एके सिनेगॉगवर (ज्यूंचं मंदिर) एका माणसानं हल्ला केला होता. गाझामधे चाललेल्या युद्धाचा निषेध आपण करतो असं त्या माणसानं जाहीरपणे सांगितलं होतं. अमेरिकेतही ज्यूवर हल्ले झाले आहेत.अमेरिकेतल्या युनिव्हर्सिट्या आणि कॉलेजमधून लाखो विद्यार्थी रस्त्यावर आले, त्यांनी इस्रायलचा निषेध केला. या निषेध करणाऱ्यांमधे अनेक ज्यू विद्यार्थीही होते. अमेरिकन सरकारनं, अमेरिकन उत्पादकांनी इस्रायलला शस्त्रं व माल पुरवणं बंद करावं अशी मागणी झाली.
अमेरिकेच्या बळावर इस्त्रायलची मस्ती
इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स इत्यादी युरोपीय देशांतही लोकांमधे इस्रायलबद्दल तीव्र चीड आहे. आखाती देशांबद्दल, मुसलमान बहुसंख्य असणाऱ्या देशांबद्दल तर बोलायलाच नको. इस्रायलनं चालवलेल्या अमानुष आणि क्रूर युद्धाबद्दल तिथली जनता अस्वस्थ आहे. आज फक्त अमेरिका इस्रायलसोबत आहे, बाकीचं सारं जग इस्रायलच्या विरोधात आहे. केवळ अमेरिकेच्या बळावर इस्रायलची मस्ती चाललीय. तरीही युरोप अमेरिकेतल्या जनतेनं संयम पाळला आहे, ज्यूंना त्रास दिलेला नाही.
मध्यस्तीनंतरही इस्त्रालयकडून हल्ले
इस्रायलला विरोध म्हणजे ज्यूंना विरोध नव्हे असं जगभरच्या लोकांनी ठासून सांगितलेलं आहे. लोक अँटीसेमेटिक नाहीत, अँटी इस्रायल आहेत. हमासनं इस्रायलवर केलेला हल्ला ही भयानक चूक आहे असं सारं जग म्हणतं. पण म्हणून दोन वर्षं गाझावर लढाई लादून लाखापेक्षा जास्त माणसं मारणं, तीन चतुर्थांश गाझा जमीनदोस्त करणं बरोबर नाही असं सारं जग म्हणतंय. खुद्द इस्रायलमघले लोक म्हणत आहेत की नेतान्याहू अतिरेक करत आहेत. इस्रायलमधल्या कित्येकांनी उघडपणे आरोप केलाय की डळमळीत झालेल्या सत्तेवर ताबा टिकवण्यासाठी नेतान्याहूनी युद्ध उचकवलं आहे. हमास या संघटनेला धडा शिकवण्याच्या नादात लाखभर निष्पाप नागरिकांना मारणं हे अमानुष कृत्य आहे असं जग आणि इस्रायलमधले लोकही म्हणत आहेत. ओलीस इस्रायलला परत केल्यानंतर ट्रंप यांची मध्यस्थी दोन्ही बाजूनी मान्य केल्यानंतरही अजूनही इस्रायलं दररोज शेकडो माणसं मारतंय आणि शेकडो घरं जमीनदोस्त करतंय. (Jews attacked while celebrating Hanukkah in Australia)
सिडनीत मेलेले १५ ज्यू निष्पाप होते. ते ज्यू गाझात बाँब टाकत नव्हते. त्यांना गोळ्या घालणं अगदीच चूक आहे. पण तोच न्याय इस्रायलनं गाझातल्या हज्जारो निष्पाप लोकांनाही लावायला हवा. तसं होतांना दिसत नाहीये.
नेतान्याहू राक्षसासारखे वागत आहेत.शिक्षा त्यांना, त्यांच्या राजकीय सहकाऱ्यांना आणि लष्करी अधिकाऱ्यांना व्हायला हवी, जगभर पसरलेल्या ज्यूना नाही.सत्तांध झालेली सरकारं आणि जनता यांच्यात दुही असते असं जगभर दिसतंय. इस्रायलमधेही तसंच घडतय.ऑस्ट्रेलियात किवा कुठंही कोणीही ज्यूंचे खून करता कामा नये आणि कोणीही मुसलमानांचे खून करता कामा नये. हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा.